कूच बिहार चषक : गोव्याचे सामन्यात शानदार पुनरागमन

बंगालला ३२५ धावात रोखले; चिगुरुपती व्यंकटचे ५ बळी

Story: क्रीडा प्र‌तिनिधी। गोवन वार्ता |
10th December, 12:15 am
कूच बिहार चषक : गोव्याचे सामन्यात शानदार पुनरागमन

चिगुरुपती व्यंकट

पणजी : कूच बिहार चषक (Cooch Behar Cup) एलिट क्रिकेट स्पर्धेतील (Elite Cricket Tournament) बंगालविरुद्धच्या सामन्यात गोवा संघाने (Goa team) दुसर्‍या दिवशी शानदार खेळ करत झोकात पुनरागमन केले. कल्याणी येथील बंगाल क्रिकेट अकादमी मैदानावर हा सामना सुरू आहे. बंगालचा पहिला डाव ५ बाद २९३ धावांवरून ३२५ धावांत संपवल्यानंतर गोवा संघाने दुसर्‍या दिवसअखेर आपल्या पहिल्या डावात ६ गडी गमावून २०१ धावा केल्या आहेत. गोव्याचा संघ अजून १२४ धावांनी पिछाडीवर आहे. तसेच सामन्याचे दोन दिवसही बाकी आहेत. बंगालला आपल्या पहिल्या दिवसाच्या धावसंख्येत केवळ ३२ धावांची भर घालता आली.
गोवा संघाला पहिल्या डावात आदित्य कोटा (१८) व सार्थक भिके (३०) यांनी ५१ धावांची सलामी दिली. शांतनू नेवगी (१४) व दिशांक मिस्किन (१) अपयशी ठरल्याने गोव्याची ४ बाद ८६ अशी घसरगुंडी उडाली. कर्णधार यशने जबाबदारी सांभाळताना ४७ चेंडूंत ५ चौकारांसह ३९ धावांची खेळी केली. जम बसलेला यश व यानंतर यष्टिरक्षक साई नाईक (१६) माघारी परतल्याने गोव्याचा संघ ६ बाद १५१ असा अडचणीत आला होता. यामुळे फॉलोऑनचा धोका देखील निर्माण झाला होता. परंतु, आराध्य गोयल (नाबाद ३६) व चिगुरुपती व्यंकट (नाबाद २६) यांनी सातव्या विकेटसाठी ५० धावांची अविभक्त भागीदारी करत गोव्याला दोनशेपार नेताना फॉलोऑन टाळला. बंगाल संघाकडून रोहित दास व रोहित यांनी प्रत्येकी २ तर शिवम भारती व अगस्त्य शुक्ला यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला आहे.
चिगुरुपती व्यंकटची भेदक गोलंदाजी
पहिल्या दिवसाच्या चुकांची भरपाई करताना गोव्याच्या गोलंदाजांनी बंगालच्या शेपटाला लगाम लावला. बंगालला आपल्या पहिल्या दिवसाच्या धावसंख्येत केवळ ३२ धावांची भर घालता आली. गोवा संघाकडून पहिल्या डावात चिगुरुपती व्यंकट याने भेदक मारा करत ५१ धावांत ५ गडी बाद केले. तर शिवेन बोरकर २, यश कसवणकर, मिहीर कुडाळकर आणि समर्थ राणे यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.