भारताची विजयी सुरुवात

सूर्यकुमारची कप्तानी खेळी : अमेरिकेची झुंज पडली अपुरी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
57 mins ago
भारताची विजयी सुरुवात

मुंबई : टी-२० विश्वचषक २०२६ मधील पहिल्याच सामन्यात भारताने अमेरिकेवर २९ धावांनी विजय मिळवत विजयी सलामी दिली. सामना चांगलाच अटीतटीचा झाला होता. अमेरिकेने भारताला सहज विजय मिळवू दिला नाही. मात्र कर्णधार सूर्यकुमार यादवच्या शानदार नाबाद खेळीने आणि भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध कामगिरीने भारताने अखेर बाजी मारली.
भारताने पॉवरप्लेमध्ये ३ विकेट्स गमावले आणि इथून टीम इंडिया १४० धावा करेल का अशी शंका दिसत होती. पण एकट्या सूर्याने संघाचा डाव उचलून धरला आणि दुसऱ्या डावात भारताच्या गोलंदाजांनी संघाचा विजय सोपा केला.
भारताने दिलेल्या १६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेची सुरूवात खूपच खराब झाली. मोहम्मद सिराज व अर्शदीप सिंग यांनी सलामीवीरांना दुसऱ्या व तिसऱ्या षटकात माघारी धाडले. तर कर्णधार मोनांक पटेलला अर्शदीपने शून्यावर बाद केले. यानंतर मिलिंद कुमार व संजय कृष्णमूर्ती यांनी चांगली फलंदाजी करत ५८ धावांची भागीदारी रचली. पण भारताच्या फिरकीपटूंनी मिलिंदला ३४ धावांवर तर संजयला ३७ धावांवर झेलबाद करत अमेरिकेच्या आशांवर पाणी फेरले.मिलिंद बाद झाल्यानंतर संजयने संघाचा डाव सावरला होता. पण अक्षर पटेलने त्याला माघारी धाडले. अक्षरने १६व्या षटकात सलग दोन विकेट्स घेत अमेरिकेला बॅकफूटवर टाकले. हरमीत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात गोल्डन डकवर झेलबाद झाला.
यानंतर शुभम रांजणे वादळी फलंदाजी केली. पायाला दुखापत झालेली असतानाही, चालायला त्रास होत असताना त्याने चांगली फटकेबाजी केली. शुभम रांजणेने २२ चेंडूत २ चौकार व ३ षटकारांसह ३७ धावांची खेळी केली. यासह २० षटकांत अमेरिकेचा संघ फक्त ८ बाद १३२ धावा करू शकला. भारताकडून अर्शदीप सिंग, अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स, वरूण चक्रवर्तीने १ विकेट तर मोहम्मद सिराजने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
अमेरिकेने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आणि भारताची सुरूवात प्रचंड खराब झाली. अभिषेक शर्मा गोल्डन डकवर बाद झाला. यानंतर तिलक वर्मा व इशान किशन यांनी ३७ धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. पण इशान, तिलक व शिवम दुबे पॉवरप्लेमधील अखेरच्या षटकात बाद झाले. यानंतर रिंकूने थोडावेळ सूर्याची साथ दिली. पण तोदेखील ६ धावांवर बाद झाला. यानंतर हार्दिक पंड्या ५ धावांवर माघारी परतला.अक्षर पटेल व सूर्यकुमार यादवने २६ धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. पण अक्षर झेलबाद होत माघारी परतला. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने शेवटच्या षटकापर्यंत नाबाद राहत संघाचा डावाची जबाबदारी घेतली. कर्णधार सूर्यकुमार यादवने या सामन्यात ४९ चेंडूत १० चौकार व ४ षटकारांसह ८४ धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला १६१ धावांवर नेऊन ठेवले. या खेळीच्या बळावर त्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. सूर्यकुमार यादवने भारताचा कर्णधार म्हणून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या आहेत. असा पराक्रम करणारा तो चौथा भारतीय कर्णधार ठरला आहे. हा पराक्रम त्याने ४१ व्या डावात करून दाखवला आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याच्या रेकॉर्ड हा भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करताना ६२ सामन्यांमध्ये १९०५ धावा केल्या. या यादीत भारताचा माजी कर्णधार विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे. विराट कोहलीच्या नावे ५० सामन्यांमध्ये १५७० धावा करण्याची नोंद आहे. तर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने ७२ टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करताना १११२ धावा केल्या होत्या. या यादीत सूर्यकुमार यादव चौथ्या स्थानी पोहोचला आहे.
टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा कर्णधार म्हणून एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. २०२४ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकात रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९२ धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादव आता या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. टी-२० विश्वचषकात पहिल्यांदाच कर्णधार म्हणून टीम इंडियाकडून खेळणाऱ्या सूर्याने या यादीत आधी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या विराट कोहलीला मागे टाकले आहे.
विराट कोहलीने २०२१ च्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ५७ धावांची खेळी केली होती. आता सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून अमेरिकाविरूद्ध सामन्यात ८६ धावांची खेळी करत विराट कोहलीला मागे टाकत दुसरे स्थान गाठले आहे.
सूर्यकुमार यादवने अमेरिकेविरुद्ध नाबाद ८४ धावा करत बाबर आझमला मागे टाकले. टी२० विश्वचषकात कर्णधार म्हणून पदार्पणात कोणत्याही खेळाडूने केलेली ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. २००९ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८८ धावांची खेळी करून ख्रिस गेल या यादीत अव्वल स्थानावर आहे. सूर्यकुमार यादव या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर आहे.
टी-२० विश्वचषकात पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारे कर्णधार
ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) – ८८ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२००९)
सूर्यकुमार यादव (भारत) – ८४ धावा विरुद्ध अमेरिका (२०२६)
बाबर आझम (पाकिस्तान) – ६८ धावा विरुद्ध भारत (२०२१)
महेला जयवर्धने (श्रीलंका) – ६५ धावा विरूद्ध केनिया (२००७)
मोहम्मद अशरफुल (बांगलादेश) – ६१ धावा विरूद्ध वेस्ट इंडिज (२००७)
एका टी-२० विश्वचषक सामन्यात सर्वाधिक धावा करणारे भारतीय कर्णधार
रोहित शर्मा – ९२ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०२४)
सूर्यकुमार यादव – ८४ धावा विरुद्ध अमेरिका (२०२६)
विराट कोहली – ५७ धावा विरुद्ध पाकिस्तान (२०२१)
एमएस धोनी – ४५ धावा विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२००७)
टी-२० विश्वचषकात (भारत) सर्वाधिक सामनावीर पुरस्कार
८ – विराट कोहली (३५ टी-२० सामने)
४ – सूर्यकुमार यादव (१९ सामने)
३ – युवराज सिंग (३१ सामने)
३ – आर. अश्विन (२४ सामने)
३ – रोहित शर्मा (४७ सामने)
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (भारत) सर्वाधिक सामनावीर पुरस्कार
१७ – सूर्यकुमार यादव (१०५ टी-२० सामने)
१६ – विराट कोहली (१२५ सामने)
१४ – रोहित शर्मा (१५९ सामने)
८ – अक्षर पटेल (८८ सामने)
टी-२० विश्वचषकातील सलग सर्वाधिक विजय
९ सामने – भारत (२०२४–२६)
८ सामने – दक्षिण आफ्रिका (२०२४)
८ सामने – ऑस्ट्रेलिया (२०२२–२४)
७ सामने – भारत (२०१२–१४)
टी-२० विश्वचषकातील पहिल्या १५ सामन्यांनंतर सर्वाधिक विकेट्स
३० विकेट्स – अ‍ॅनरिक नॉर्टजे
२९ विकेट्स – वनिंदू हसरंगा
२९ विकेट्स – अर्शदीप सिंग