गोव्याच्या महिलांचा सौराष्ट्रवर १६ धावांनी थरारक विजय

सिनियर वनडे ट्रॉफी : पूर्वा भाईडकरची ७२ धावांची झुंजार खेळी, गोव्याची ‘एलिट’ गटात झेप

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
गोव्याच्या महिलांचा सौराष्ट्रवर १६ धावांनी थरारक विजय

रांची : येथील टॉरियन वर्ल्ड स्कूल मैदानावर खेळवण्यात आलेल्या सिनियर वनडे ट्रॉफी एलिट स्पर्धेत गोव्याच्या महिला संघाने अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन करत सौराष्ट्रचा १६ धावांनी पराभव केला. या विजयासह गोव्याचा संघ 'क' गटात ८ गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
पूर्वा-श्रेया जोडीने सावरला गोव्याचा डाव
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गोव्याची सुरुवात आश्वासक झाली. हर्षिता यादव (३४) आणि पूर्वजा वेर्लेकर (५१ धावा, ७ चौकार, १ षटकार) यांनी ४८ धावांची सलामी दिली. त्यानंतर तेजस्विनी दुरगाडने (३४) संघाला शतकी टप्पा गाठून दिला. मात्र, मधल्या फळीत ठराविक अंतराने विकेट्स पडल्याने गोव्याची स्थिती ६ बाद १४७ अशी बिकट झाली होती. अशा वेळी पूर्वा भाईडकरने ७३ चेंडूंत ७ चौकारांसह ७२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. श्रेया परबने ४५ चेंडूंत संयमी ४२ धावा करत पूर्वाच्या सोबतीने गोव्याचा डोलारा सावरला. दरम्यान, प्रेशा नाईकच्या नाबाद १८ धावांमुळे गोव्याने निर्धारित ५० षटकांत ८ बाद २७२ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. सौराष्ट्रच्या टी. धरणीने ४ बळी घेतले.
सौराष्ट्रची झुंज अपयशी
२७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सौराष्ट्रला उमेश्वरी जेठवा (४७) आणि रिद्धी रुपारेल (८२) यांनी ९६ धावांची भक्कम सलामी दिली. ही जोडी प्रेशा नाईकने फोडली आणि तिथून सामन्याचे चित्र पालटले.
गोलंदाजीत गोव्याची चमक
हर्षिता यादव आणि पूर्वा भाईडकर यांनी फलंदाजीनंतर गोलंदाजीमध्येही प्रत्येकी २ गडी बाद करत सौराष्ट्रवर दबाव कायम ठेवला. अखेरच्या षटकांत आयुषी (नाबाद ४४) आणि मोधवाडिया (नाबाद २२) यांनी फटकेबाजी करून प्रयत्न केला, मात्र गोव्याच्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे सौराष्ट्रला ५० षटकांत ६ बाद २५६ धावांपर्यंतच मजल मारता आली.
गुणतालिकेत प्रगती
या महत्त्वाच्या विजयामुळे गोव्याच्या संघाने गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले असून, खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर सांघिक कामगिरी हे गोव्याच्या या यशाचे वैशिष्ट्य ठरले.
संक्षिप्त धावफलक
गोवा  : ५० षटकांत ८ बाद २७२ (पूर्वजा वेर्लेकर ५१, हर्षिता यादव ३४, तेजस्विनी दुरगाड ३४, तनिशा गायकवाड ०, दिक्षा आमोणकर ४, पूर्वा भाईडकर ७२, विनवी गुरव ४, श्रेया परब ४२, प्रेशा नाईक नाबाद १८, मेताली गावंडर नाबाद ३, अवांतर १०, टी. धरणी ४८-४, एन. छावडा ६८-२, पी. मोधवाडिया ३९-१, हिरवा व्ही. ४२-१) विजयी वि.
सौराष्ट्र : ५० षटकांत ६ बाद २५६ (उमेश्वरी जेठवा ४७, रिद्धी रुपारेल ८२, शिफा शेलात १२, सरस्वती के. ५, हिरवा व्ही. २८, आयुषी पी. नाबाद ४४, एन छावडा १, पी. मोधवाडिया नाबाद २२, अवांतर १५, हर्षिता यादव ४३-२, पूर्वा भाईडकर ४५-२, श्रेया परब ४७-१, प्रेशा नाईक ८-१.