पणजी :गोवा सरकारने जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ यासह राज्यातील १५ पुरातत्त्वीय स्थळांना संरक्षित स्मारके म्हणून घोषित करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. या सर्व स्थळांना अंतिम मान्यता देण्यापूर्वी नागरिकांकडून सूचना आणि आक्षेप मागवण्यात आले आहेत.
१५ पुरातत्त्वीय स्थळांना संरक्षित स्मारकाचा दर्जा
पुरातत्त्व खात्याने गोव्यातील सात तालुक्यांमधील १५ पुरातत्त्वीय स्थळांना संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यासाठी हा मसुदा प्रसिद्ध केला आहे. या मसुद्यावर आक्षेप किंवा सूचना नोंदवण्यासाठी इच्छुक व्यक्तींना दोन महिन्यांची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर ही सर्व स्थळे संरक्षित स्मारके म्हणून अधिकृतपणे घोषित केली जातील.
तिसवाडीतील महत्त्वाच्या स्थळांचा समावेश
या मसुद्यात तिसवाडी तालुक्यातील जुने गोवे येथील हातकातरो खांब, मळार व शिरदोण येथील होवरी, चिंबल येथील माउंट कार्मेल सायबिणीच्या कॉन्व्हेंटचे अवशेष आणि गोवा वेल्हा येथील गोपाकापट्टण बंदराचे अवशेष यांचा समावेश आहे.
तसेच, सांगे तालुक्यातील नेतुर्ली गावातील जाकीची होवरी या स्थळाचाही यात अंतर्भाव करण्यात आला आहे.
डिचोली, मुरगाव आणि सासष्टीतील स्थळे
डिचोली तालुक्यातील कुडणे येथील सूर्य मंदिराचे अवशेष व थडगी, दाबोळी-मुरगाव येथील दगडात कोरलेली टाकी आणि मडगाव-सासष्टी येथील श्री दामोदर मंदिराची टाकी यांचा या मसुद्यात समावेश आहे.
११ स्थळे खासगी जागेत
या एकूण १५ स्थळांपैकी ११ स्थळे खासगी जागेत असून उर्वरित ४ स्थळे सरकारी जागेत आहेत. त्यामुळे अंतिम अधिसूचनेपूर्वी या स्थळांबाबत नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या सूचना व आक्षेपांकडे लक्ष राहणार आहे.


