वडिलांचा 'तो' एक 'कॉल' अन् वैभव सूर्यवंशीने हरारेत उडवला इंग्लंडचा धुव्वा

केवळ ८० चेंडूत ठोकल्या १७५ धावा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
वडिलांचा 'तो' एक 'कॉल' अन् वैभव सूर्यवंशीने हरारेत उडवला इंग्लंडचा धुव्वा

हरारे (झिम्बाब्वे): मैदानात धावांचा पाऊस पाडणारा बॅटचा कडकडाट आणि सहाव्यांदा विश्वविजेतेपदाचा गुलाल उधळणारी भारतीय युवा ब्रिगेड! हरारेच्या मैदानावर भारतीय अंडर-१९ संघाने इंग्लंडचा १०० धावांनी धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय नोंदवला. या विजयाचा महानायक ठरला अवघ्या १४ वर्षांचा 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशी. पण, या मैदानावर १७५ धावांच्या खेळीपूर्वी वैभव एका वेगळ्याच मानसिक लढाईला सामोरे जात होता.



वडिलांचा तो 'शब्द' अन् दडपण पळाले दूर! 

आयपीएलपासून घरगुती क्रिकेटपर्यंत प्रत्येक स्पर्धेत शतकांचा रकाना भरणारा वैभव या विश्वचषकाच्या फायनलपर्यंत चाचपडत होता. शतकी खेळी होत नसल्याने तो कमालीचा निराश होता. उपांत्य फेरीनंतर त्याने रडकुंडीला येत आपले वडील संजीव सूर्यवंशी यांना फोन केला. बाबा, काहीतरी चुकतंय, मोठी खेळी होत नाहीये, अशी भीती त्याने व्यक्त केली. अशा वेळी 'बाप-माणूस' खंबीरपणे पाठीशी उभा राहिला. संजीव यांनी त्याला फक्त एकच मंत्र दिला. 'आम्ही तुझ्यावर समाधानी आहोत, तू फक्त तुझा नैसर्गिक खेळ खेळ आणि बाकी सर्व देवावर सोड!' वडिल संजीव यांचा हाच विश्वास वैभवसाठी संजीवनी ठरला.


वडिलांच्या आश्वासनानंतर मैदानात उतरलेला वैभव पूर्णपणे बदललेला होता. त्याने इंग्लंडच्या गोलंदाजीच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या. वाऱ्याच्या वेगाने त्याने ८० चेंडूत १७५ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली. त्याचे द्विशतक अवघ्या २५ धावांनी हुकले असले तरी, त्याच्या या झंझावाताने भारताला डोंगराएवढी धावसंख्या उभारून दिली. वयाच्या १२ व्या वर्षी रणजी गाजवणारा हा हिरा आता खऱ्या अर्थाने जागतिक क्रिकेटच्या नकाशावर चमकला आहे. अंडर-१९ विश्वचषकावर सहाव्यांदा मोहोर उमटवणाऱ्या या विजयाने भारतीय क्रिकेटचे भवितव्य किती सुरक्षित आहे, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले.


Image