आघाडी वाढविण्याच्या इराद्याने टीम इंडिया उतरणार मैदानात

दव ठरू शकतो ‘टर्निंग पॉईंट’ : आज मुल्लानपूर येथे दुसरा टी-२० सामना

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
11th December, 12:05 am
आघाडी वाढविण्याच्या इराद्याने टीम इंडिया उतरणार मैदानात

मुल्लानपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील दुसरा टी-२० सामना ११ डिसेंबर रोजी मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सध्या भारतात हिवाळ्याचे दिवस असल्याने कडाक्याच्या थंडीत खेळणे दोन्ही संघांसमोर मोठे आव्हान असणार आहे. याशिवाय दव सामन्यात मोठी भूमिका बजावू शकतो.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-२० सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक संध्याकाळी ६.३० वाजता होईल. मुल्लानपूरमधील हवामान पाहता नाणेफेक महत्त्वाची असणार आहे. दव सामन्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याने नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. जेणेकरून दुसऱ्या डावात फलंदाजी सोपी होईल. पण भारताची गोलंदाजी बाजू मजबूत असल्याने खेळपट्टी पाहता संघ कशी कामगिरी करणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.
भारतीय संघाने भले पहिला सामना सहज जिंकला असेल, पण दक्षिण आफ्रिकेचा संघ पलटवार करण्यात माहिर आहे. कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने भारताला २-०ने पराभूत केले. तर वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेने पराभूत केले होते. पण तरीही भारतीय संघाने वनडे मालिका २-१ च्या फरकाने जिंकली. त्यामुळे टी-२० मालिकेतही भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला साधारण संघ समजण्याची चूक करणार नाही.पहिल्या सामन्यातील संघाची कामगिरी पाहता दुसऱ्या सामन्यात भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे. खेळपट्टीचा अंदाज घेतल्यानंतर कुलदीप यादवला प्लेईंग इलेव्हन सामील केले जाऊ शकते.
अर्शदीप सिंगने या मैदानात एकूण १० सामने खेळले आहेत आणि फक्त ११ विकेट घेतल्या आहेत. इतकेच काय तर धावाही भरपूर दिल्या आहेत. पण काही सामन्यात धावा दिल्या असल्या तरी ऐन मोक्याच्या क्षणी विकेट काढल्या आहेत. जसप्रीत बुमराहने दोन सामन्यात ४ विकेट घेतल्या आहेत. तर हार्षित राणा आणि वरूण चक्रवर्ती प्रत्येकी एक सामना या मैदानात खेळले आहेत. हार्षित राणाने ३, वरूण चक्रवर्तीने २ विकेट घेतल्या आहेत.
मागच्या वर्षीत या स्टेडियमचे उद्घाटन झाले होते. तेव्हापासून भारतीय संघाने या मैदानावर एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे या खेळपट्टीचा भारतीय खेळाडूंना अंदाज नाही. पण दोन आयपीएल पर्वातील काही सामने या मैदानात खेळले गेले. त्यामुळे भारतीय संघात असलेल्या बहुतांश खेळाडूंना या मैदानाचा अंदाज आहे. कारण आयपीएलमध्ये या खेळपट्टीवर खेळले आहेत.
शुभमन गिलसह अर्शदीप सिंह, हार्दिक पांड्या या खेळपट्टीवर खेळले आहेत. तर अभिषेक शर्मा या मैदानावर एकच सामना खेळला आहे. त्यात त्याने १६ धावा केल्या होत्या. शुभमन गिलने दोन डावात ३६ धावा केल्यात. तर कर्णधार सूर्यकुमार यादवने या मैदानात ७३ चेंडूत १११ धावा केल्या आहेत. तिलक वर्मानेही २ डावात २९ चेंडूंचा सामना करत ५९ धावा केल्या आहे. हार्दिक पांड्याने एका डावात ९ चेंडू खेळत २ धावा केल्या होत्या.
दुसऱ्या सामन्यात बदल होणे कठीण दिसत आहे. या मैदानावर एका सामन्यात ३ विकेट घेतलेल्या हार्षित राणाला बेंचवर बसावे लागू शकते. कारण तो पहिल्या सामन्यात संघाचा भाग नव्हता. त्यामुळे आता प्लेइंग ११ मध्ये त्याला संधी मिळते की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भारतीय संघ
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, संजू सॅमसन, हर्षित राणा.              दक्षिण आफ्रिका
क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), एडेन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेव्हिस, डेविड मिलर, डोनोवन फेरेरा, मार्को यान्सेन, केशव महाराज, लिथो सिपामला, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्ट्जे, टोनी डी झॉर्ज़ी, कॉर्बिन बॉश, रीज़ा हेंड्रिक्स, ओटनील बार्टमॅन, क्वेना माफाका, जॉर्ज लिंडे
आजचा सामना
भारत वि. दक्षिण आफ्रिका

वेळ : सायं. ७ वा.
स्थळ : महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर
प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जीओ हॉटस्टार