टीम इंडियाला मालिका विजयाची संधी

आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम टी-२० सामना

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
18th December, 11:49 pm
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी

अहमदाबाद : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपली आहे. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सध्या भारत २-१ असा आघाडीवर असून, चौथा सामना खराब हवामानामुळे रद्द झाल्याने आता हा सामना मालिकेचा ‘फायनल’ ठरणार आहे. पण अहमदाबादमध्ये भारताची कामगिरी पाहता भारतीय संघाचा या मैदानावर दबदबा राहिला आहे.
भारताने हा सामना जिंकला, तर मालिका ३-१ अशी जिंकत दिमाखात आपल्या नावावर करेल. दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला, तर मालिका २-२ अशी बरोबरीत संपेल. म्हणजेच दोन्ही संघांसाठी हा सामना प्रतिष्ठेचा आणि निर्णायक ठरणार आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियम भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये शुभ मानले जाते. भारताने येथे आतापर्यंत ७ टी-२० सामने खेळले असून त्यापैकी ५ सामने जिंकले आहेत. केवळ इंग्लंडकडून भारताला येथे दोन पराभव स्वीकारावे लागले आहेत. त्यामुळे या मैदानावर भारताचा आत्मविश्वास निश्चितच उंचावलेला असेल.
सूर्यकुमार यादवचा फॉर्म भारतासाठी मोठी डोकेदुखी
अलीकडेपर्यंत टी-२० क्रिकेटमधील जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज असलेला सूर्यकुमार यादव सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. चालू वर्षात त्याने २० टी-२० सामन्यांत १८ डावांत एकही अर्धशतक झळकावलेले नाही. या कालावधीत त्याने केवळ २१३ धावा, त्या देखील १४.२० च्या सरासरीने केल्या आहेत. त्यामुळे निर्णायक सामन्यात सूर्यकुमारची कामगिरी भारतासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
शुभमन गिलची दुखापतही चिंतेचा विषय
लघु स्वरूपात शुभमन गिलकडून अपेक्षित कामगिरी न होणे ही बाबही भारतासाठी चिंताजनक आहे, विशेषतः पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर. गिलला मागील सामन्यापूर्वी सरावादरम्यान दुखापत झाली असून, त्यामुळे त्याचा शेवटच्या सामन्यातील सहभाग संशयात आहे. भारतीय संघ कोणताही धोका पत्करण्याच्या मानसिकतेत नसून, गरज पडल्यास संजू सॅमसन हा चांगला पर्याय उपलब्ध आहे.
संजू सॅमसन सलामीत यशस्वी, पण मधल्या फळीत अपयशी
संजू सॅमसनने सलामीवीर म्हणून प्रभावी कामगिरी केली असली, तरी मधल्या फळीत त्याला अपेक्षित यश मिळालेले नाही. त्याचे तीनही टी-२० आंतरराष्ट्रीय शतक वरच्या क्रमांकावर फलंदाजी करतानाच आले आहेत. गिल अंतिम सामन्यात अनुपलब्ध राहिल्यास, सॅमसनला सलामीला संधी मिळण्याची शक्यता असून, तो या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करेल.
टीम इंडिया संतुलित
फलंदाजीतील अडचणी असूनही भारतीय संघ एकूणच संतुलित दिसत आहे. हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे हे दोन्ही अष्टपैलू खेळाडू आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांत अंतिम संघात होते. गोलंदाजी विभागात अर्शदीप सिंग हळूहळू लयीत येताना दिसत आहे, तर हर्षित राणा यानेही चांगली कामगिरी केली आहे.
बुमराह संघात दाखल
खाजगी कारणांमुळे तिसऱ्या टी-२० सामन्याला अनुपस्थित राहिलेला जसप्रीत बुमराह चौथ्या सामन्यापूर्वी संघात पुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या अनुभवामुळे भारतीय गोलंदाजी अधिक भक्कम होणार आहे.
फलंदाजांना पोषक खेळपट्टी
अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. त्यामुळे या मालिकेतील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज वरुण चक्रवर्ती (६ विकेट्स) याच्यासाठी हे मैदान आव्हानात्मक ठरू शकते.
दक्षिण आफ्रिकेसमोर मालिका बरोबरीचे आव्हान
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची कामगिरी आतापर्यंत चढ-उताराची राहिली आहे. मालिका बरोबरीत सोडवायची असेल, तर त्यांना शेवटच्या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. संघ व्यवस्थापन रीझा हेंड्रिक्सऐवजी एडेन मार्करामला पुन्हा वरच्या फळीत संधी देण्याचा विचार करू शकते. तसेच युवा फलंदाज देवाल्ड ब्रेव्हिसकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. मार्को यानसनकडून आक्रमक फलंदाजीची उणीव जाणवत असली, तरी लुंगी एनगिडी आणि ओटनेल बार्टमन यांनी गोलंदाजीत प्रभावी कामगिरी केली आहे.
संभाव्य संघ
भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद
दक्षिण आफ्रिका: एडन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, देवाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, डोनोवन फरेरा, मार्को यान्सेन, लुथो सिपामला, ओटनील बार्टमन, अॅनरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, जॉर्ज लिंडे
आजचा सामना
भारत वि. दक्षिण आफ्रिका

स्थळ : नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम, अहमदाबाद
वेळ: सायंकाळी ७ वाजता
प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जीओ हॉटस्टार
मालिकेचा आतापर्यंतचा प्रवास
पहिला सामना: भारताने १०१ धावांच्या मोठ्या फरकाने दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व गाजवले.
दुसरा सामना: दक्षिण आफ्रिकेने जोरदार पुनरागमन करत ५१ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
तिसरा सामना: टीम इंडियाने ७ गडी राखून विजय मिळवत २-१ अशी आघाडी घेतली.
चौथा सामना: लखनौमध्ये दाट धुक्यामुळे सामना रद्द करण्यात आला.