पशुसंवर्धन खात्याच्या ढिसाळ कारभारावर नाराजी

पणजी : पशुसंवर्धन व सेवा खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे गोव्यातील दूध उत्पादक संकटात सापडले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना दुधावरील अनुदान मिळाले नाही. निधी उपलब्ध नसल्याचे कारण अधिकारी देत असल्याचा आरोप उत्पादकांनी केला. मात्र, पुढील आठवड्यात हे वितरण सुरळीत होईल, असे आश्वासन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले.
अनुदान वितरणात अडथळा
राज्यातील दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारतर्फे दुधाच्या विक्री दरावर ४० टक्के अनुदान दिले जाते. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून हे अनुदान पूर्णपणे थांबले आहे. गोवा डेअरीचे माजी अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी सांगितले की, अनुदान बंद झाल्यामुळे आम्ही तक्रारी केल्या असता, निधी उपलब्ध नसल्याचे कारण दिले जात आहे.
मंत्र्यांचे आश्वासनही हवेत
काही उत्पादकांचे चार ते पाच महिन्यांपासून, तर बहुतांश जणांचे सहा महिन्यांपासून अनुदान प्रलंबित आहे. यापूर्वी सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी ३१ जुलैपर्यंत अनुदान दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप वितरण न झाल्यामुळे दूध उत्पादकांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
तांत्रिक अडचणींमुळे विलंब
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र अनुदान बंद नसल्याचे स्पष्ट केले. आधार-आधारित बँक हस्तांतरण प्रणालीद्वारे (DBT) हे अनुदान जमा केले जाते. या प्रणालीत काही तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्याने विलंब होत असून, पुढील आठवड्यात सर्व दूध उत्पादकांना त्यांचे अनुदान मिळेल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला.
राज्यातील उत्पादकांची स्थिती
राज्यात सध्या सुमारे १६,७७७ दूध उत्पादकांची नोंद आहे. त्यापैकी १६,२३३ उत्पादक डेअरी सहकारी संस्थांमध्ये, तर ५४४ उत्पादक ‘सुमुल’कडे नोंदणीकृत आहेत.