सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमचा निर्णय

पणजी : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश एस. सोनक यांची झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील कॉलेजियमने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
जानेवारी २०२६ मध्ये स्वीकारणार पदभार
जारी केलेल्या शिफारशीनुसार, झारखंडचे विद्यमान मुख्य न्यायाधीश तरलोक सिंग चौहान हे ८ जानेवारी २०२६ रोजी निवृत्त होणार आहेत. त्यानंतर रिक्त होणाऱ्या जागेवर न्यायमूर्ती महेश एस. सोनक हे झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील.
शिक्षण आणि वकिली कारकीर्द
न्यायमूर्ती सोनक यांचा जन्म २८ नोव्हेंबर १९६४ रोजी झाला. त्यांनी पणजीतील डॉन बॉस्को हायस्कूलमधून शालेय शिक्षण आणि धेंपे कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समधून बी.एस्सी. पूर्ण केले. पणजीतील एम.एस. कॉलेज ऑफ लॉमधून एलएल.बी. पदवी घेतली आणि १९८८ मध्ये वकील म्हणून नोंदणी केली. त्यांनी गोवा स्थित मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली. तसेच केंद्र सरकारसाठी अतिरिक्त स्थायी वकील आणि राज्य सरकार व वैधानिक महामंडळांसाठी विशेष वकील म्हणून काम पाहिले.
न्यायाधीश म्हणून प्रवास
२१ जून २०१३ रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर जून २०१५ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली. त्यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायाधीश म्हणून सेवा बजावली.
‘लिव्हिंग विल’ करणारे पहिले व्यक्ती
न्यायमूर्ती सोनक यांनी नुकतीच ‘लिव्हिंग विल’ (इच्छापत्र) नोंदणी केली. अशी नोंदणी करणारे ते गोव्यातील पहिले व्यक्ती ठरले. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या गोवा शाखेने अग्रिम वैद्यकीय निर्देशांवरील पुस्तिका प्रकाशनावेळी ही नोंदणी करून घेतली.
इतर उच्च न्यायालयांतील नियुक्त्या
सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील कॉलेजियमने इतरही शिफारशी केल्या. यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांची मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी, न्यायमूर्ती मनोज कुमार गुप्ता यांची उत्तराखंड, न्यायमूर्ती ए. मुहामद मुस्ताकी यांची सिक्कीम आणि न्यायमूर्ती संगम कुमार साहू यांची पटणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी शिफारस केली.