५५ कोटींच्या मालमत्तेचे दस्तावेज जप्त : आर्चडायोसीज संस्थेसह काहींची होणार चौकशी

पणजी : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जमीन हडप प्रकरणी करंझाळे येथील मॉडेल्स कन्स्ट्रक्शन्सच्या मालकाच्या घरासह सांतिनेझ येथील कार्यालयावर छापा टाकला होता. त्यावेळी ईडीने मॉडेल्स कंपनीने दुबईत गुंतवणूक केलेल्या आणि ‘मॉडेल्स मिस्टिक’ प्रकल्पाच्या दुकाने आणि फ्लॅटचे विक्री कागदपत्र मिळून ५५ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे दस्तावेज जप्त केले.चर्च संस्थेशी निगडित आर्चडायोसीज ऑफ गोवा या संस्थेची तसेच फा. आर्लिनो डिमेलो आणि फा. व्हिक्टर राॅड्रिग्ज यांच्यासह तत्कालीन सर्व्हे संचालनालयाचे निरीक्षक प्रभाकर आर. हवालदार यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी दत्ताराम तनू गावस उर्फ काणकोणकर यांनी १८ जानेवारी २०१० रोजी पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांनी पणजी शहर चलता क्रमांक ४४ पीटी शीट क्र. १६२ मधील २,४७५ चौ. मी. जमिनीत तक्रारदाराचे वडील कूळ म्हणून नोंद होते. असे असताना १८ नोव्हेंबर २००४ ते ५ डिसेंबर २००६ रोजी या कालावधीत आर्चडायोसीज ऑफ गोवाचे फा. आर्लिनो डिमेलो आणि फा. व्हिक्टर राॅड्रिग्ज यांनी पणजी शहर सर्व्हेमध्ये आर्चडायोसीज ऑफ गोवा नावाची नोंद करण्याचा अर्ज सादर केला. त्यानुसार, तत्कालीन सर्व्हे संचालनालयाचे निरीक्षक प्रभाकर आर. हवालदार यांनी ५ डिसेंबर २००६ रोजी निवाडा देत वरील आर्चडायोसीज ऑफ गोवा नावाची नोंदी केली. त्यानंतर २ फेब्रुवारी २००७ रोजी वरील जमीन मॉडेल्स कन्स्ट्रक्शन्सचे भागीदार पिटर वाझ यांनी खरेदी करून मॉडेल्स मिस्टिक हा रहिवासी प्रकल्प हाती घेतला. या तक्रारीची दखल घेऊन पणजी पोलिसांनी १८ जानेवारी २०१० रोजी संशयित म्हणून फा. आर्लिनो डिमेलो, फा. व्हिक्टर राॅड्रिग्ज आणि प्रभाकर हवालदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याच दरम्यान सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली. त्यानुसार, ईडीने मॉडेल्स कन्स्ट्रक्शन्सचे विद्यमान मालक डायगो वाझ आणि नातालीना वाझ यांची चौकशी करून १६ डिसेंबर रोजी करंझाळे येथील मॉडेल्स कन्स्ट्रक्शन्सच्या मालकाच्या घरासह सांतिनेझ येथील कार्यालयावर छापा टाकला होता. त्यावेळी ईडीने मॉडेल्स कंपनीने दुबईत गुंतवणूक केलेल्या आणि मॉडेल्स मॉडेल्स मिस्टिक प्रकल्पाच्या दुकाने आणि फ्लॅटचे विक्री कागदपत्र मिळून ५५ कोटींच्या मालमत्तेचे दस्तावेज जप्त केले. या प्रकरणी माॅडेल्सचे मालक पिटर वाझ यांचे निधन झाल्यामुळे त्याच्या भागीदारसह आर्चडायोसीज ऑफ गोवा या संस्थेचे तसेच फा. आर्लिनो डिमेलो आणि फा. व्हिक्टर राॅड्रिग्ज याच्यासह तत्कालीन सर्व्हे संचालनालयाचे निरीक्षक प्रभाकर आर. हवालदार यांची चौकशी करण्यात येणार अाहे. त्यानुसार, पुढील काही दिवसांत त्यांना ईडीकडून पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.