वेल्डींग करताना पडलेल्या ठिणग्यांमुळे लागली आग

मडगाव : बेतूल येथील ओएनजीसी येथील मुख्य सभागृहानजीक बांधकामाच्या ठिकाणी वेल्डींग केले जात असताना पडलेल्या ठिणग्यांमुळे आग लागण्याची घटना घडली. ओएनजीसीच्या अग्निशामक कर्मचार्यांसह कुंकळ्ळी अग्निशामक दलाच्या संयुक्त प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात आले.
बेतूल येथील ओएनजीसी येथे वेल्डींग व बांधकाम केले जात असताना दुपारी आगीची घटना घडली. वेल्डींगचे काम करत असताना ठिणग्या ज्वलनशील पदार्थांच्या संपर्कात आल्या व आगीची सुरुवात झाली. यात एका गाडीचेही नुकसान झाले. ‘इंडिया एनर्जी वीक’ या कार्यक्रमासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती सध्या ओएनजीसी परिसरात सुरू आहे. आगीची घटना घडली त्यावेळी मुख्य सभागृहात बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीसाठी उपस्थित दामोदर जांबावलीकर व मनोज नाईक यांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतानाच कुंकळ्ळी अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले.
सभागृहाच्या बांधकामस्थळी नुकसान
कुंकळ्ळी अग्निशामक दलाचे जवान व ओएनजीसीतील अग्निशामक दलाचे कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नाने या आगीवर नियंत्रण आणण्यात आले. आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही पण, सभागृहाच्या बांधकामस्थळी काही प्रमाणात नुकसान झाले आहे.