बागा येथे जर्मन पर्यटकाची सोनसाखळी हिसकावणारा चोर कळंगुटमध्ये जेरबंद

पुन्हा चोरीसाठी आला, अन् सापडला पोलिसांच्या तावडीत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
बागा येथे जर्मन पर्यटकाची सोनसाखळी हिसकावणारा चोर कळंगुटमध्ये जेरबंद

म्हापसा : बागा येथे जर्मन नागरिकाच्या गळ्यातील २.४० लाखांची सोनसाखळी हिसकावणारा चोर पुन्हा चोरी करण्यासाठी कळंगुटमध्ये आला व पोलिसांच्या तावडीत सापडला.

कळंगुट पोलिसांनी नवीन मडीवलार (१८, रा. बेळगाव) याला याप्रकरणी अटक केली. चोरीची सोनसाखळी व लॉकेट बेळगावमधून हस्तगत करण्यात आले. संशयिताने सोनसाखळी बँकेत गहाण ठेवली होती तर लॉकेट सोनाराला विकले होते.

चोरीची घटना गुरुवार, दि. ११ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वा. सुमारास घडली होती. बागा येथे एका गेस्ट हाऊसमध्ये फिर्यादी हर्मन ग्रीव्हेन हे जर्मन नागरिक वयोवृद्ध पर्यटक वास्तव्यास होते. घटनेच्या दिवशी ते सांयकाळी वॉकला गेले होते. संशयित आरोपीने त्यांचा पाठलाग केला. ते आपल्या गेस्ट हाऊसच्या खोलीमध्ये जाताच संशयित तिथे गेला व त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून तो पसार झाला. चोरीस गेलेली ही सोनसाखळी २० ग्रॅम वजनाची होती. त्यामध्ये लॉकेट होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवून अज्ञात संशयिताची शोधाशोध सुरू केली. सोमवार, १५ रोजी रात्री संशयित आरोपी हा कळंगुटमध्ये संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांना सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता चोरी केल्याची कबुली त्याने दिली.

भारतीय दंड संहितेच्या ३०४(२) कलमान्वये नोंद केलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी संशयिताला अटक केली. नंतर बेळगावमध्ये जाऊन एका बँकेमध्ये गहाण ठेवलेली चोरीची सोनसाखळी तसेच एका सोनाराला विकलेले लॉकेट पोलिसांनी जप्त केले.

पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण नाईक, हवालदार विद्यानंद आमोणकर, कॉ. विजय नाईक, अमीर गरड, राजेश कांदोळकर, राज परब, गणपत तिळोजी, गौरीश कारबोटकर, स्मितल बांदेकर व संदेश कुंभार या पथकाने ही कामगिरी केली.

बेळगावमध्ये विकले दागिने

चोरी केल्यानंतर संशयित नवीन मडीवलार हा दि. १२ रोजी बेळगावमध्ये घरी गेला. तिथे चोरीची सोनसाखळी गहाण ठेवत लॉकेटही सोनाराला त्याने विकले. त्यानंतर १५ रोजी संशयित पुन्हा चोरीच्या उद्देशाने कळंगुटमध्ये आला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला. 

हेही वाचा