झेडपी निवडणुकीत नऊ विद्यमान सदस्य पुन्हा रिंगणात

पतीच्या जागी पत्नी तर काही ठिकाणी पत्नीच्या जागी पती उमेदवार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th December, 11:45 pm
झेडपी निवडणुकीत नऊ विद्यमान सदस्य पुन्हा रिंगणात

पणजी : राज्यात शनिवारी जिल्हा पंचायतीसाठी मतदान होणार आहे. २०२५ च्या या निवडणुकीत ९ विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य पुन्हा एकदा आपले नशीब आजमावत आहेत. काही ठिकाणी पक्षाने तिकीट नाकारल्याने विद्यमान सदस्यांनी अपक्ष किंवा दुसऱ्या पक्षाचा मार्ग धरला. विशेष म्हणजे, १२ उमेदवार असे आहेत जे २०२० च्या निवडणुकीनंतर २०२५ मध्ये पुन्हा रिंगणात उतरले. अनेक मतदारसंघांत पतीच्या जागी पत्नी आणि पत्नीच्या जागी पती असे समीकरण पाहायला मिळत आहे.

विद्यमान सदस्य आणि उत्तर गोव्याचे चित्र
कोळवाळे मतदारसंघातून विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य कविता किरण कांदोळकर या अपक्ष म्हणून पुन्हा रिंगणात आहेत. सांताक्रूझमधील काँग्रेसच्या विद्यमान सदस्य शेयनी ऑलिव्हर, खोर्ली मतदारसंघातील सिद्धेश श्रीपाद नाईक आणि सर्वण-कारापूर मतदारसंघातील महेश सावंत हे दोन्ही विद्यमान सदस्य भाजपच्या तिकिटावर पुन्हा निवडणूक लढवत आहेत. सुकूर मतदारसंघातील विद्यमान सदस्य कार्तिक कुंडईकर हे २०२० मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते, आता २०२५ मध्ये ते अपक्ष म्हणून नशीब आजमावत आहेत.

दक्षिण गोव्यातील स्थिती
दक्षिण गोव्यातील बेतकी-खांडोळा मतदारसंघातून श्रमेश भोसले व शेल्डे मतदार संघातील सिद्धार्थ गावस देसाई हे भाजपच्या तिकिटावर लढवत आहेत. कवळे मतदारसंघातून मगोपचे विद्यमान सदस्य गणपत नाईक पुन्हा रिंगणात आहेत. कुठ्ठाळीचे विद्यमान सदस्य तसेच अपक्ष आमदार आंतोन वाझ यांच्या पत्नी मर्सीना मेंडीस पुन्हा अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

पती-पत्नीच्या उमेदवारीचे समीकरण
काही मतदारसंघांमध्ये आरक्षण किंवा राजकीय समीकरणामुळे पतीच्या जागी पत्नीला उमेदवारी मिळाली आहे. रेईस मागुश मतदारसंघात भाजपचे विद्यमान सदस्य संदीप बांदोडकर यांच्या जागी भाजपने त्यांच्या पत्नी रेश्मा बांदोडकर यांना उमेदवारी दिली. तसेच २०२० चे काँग्रेसचे उमेदवार हेमंत मालवणकर यांच्या पत्नी सोनाली मालवणकर या २०२५ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लढत आहेत. मये मतदारसंघातून २०२० मध्ये अपक्ष लढलेले राजेश कळंगुटकर यांच्या पत्नी राधिका कळंगुटकर या गोवा फॉरवर्ड पक्षातर्फे रिंगणात आहेत.

विरोधकांचे नातेवाईक रिंगणात
दक्षिण गोव्यातील गिरदोली मतदारसंघात भाजपच्या विद्यमान सदस्य आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष संजना वेळीप यांचे पती संजय वेळीप काँग्रेसच्या तिकिटावर लढत आहेत. धारबांदोडा मतदारसंघात सुधा गोविंद गावकर यांचे पती गोविंद गावकर अपक्ष, तर २०२० मधील अपक्ष उमेदवार सपना वेळीप यांचे पती शशिकांत वेळीप ‘आप’च्या वतीने निवडणूक लढवत आहेत. राय मतदारसंघात दुमिंग गावकर यांच्या पत्नी फातिमा गावकर अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

पक्षांतरे आणि पुन्हा उमेदवारी
दवर्ली मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार फ्लोरिनो फर्नांडिस पुन्हा काँग्रेसकडून लढत आहेत. रेईस मागुश मधून २०२० मध्ये अपक्ष लढलेल्या प्रगती पेडणेकर आता ‘आप’च्या चिन्हावर, तर रिवण मतदारसंघात पूर्वी अपक्ष म्हणून लढलेल्या पूनम चंद्रकांत सामंत आता भाजपच्या उमेदवारीवर नशीब आजमावत आहेत.

#Goa #ZillaPanchayatElection2025 #GoaPolitics #FamilyPolitics #ElectionUpdate #Candidates
हेही वाचा