मालिका २-१ ने खिशात : जैस्वालचे शतक, कुलदीप, प्रसिद्धच्या प्रत्येकी ४ बळी

विशाखापट्टणम : येथे झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा तब्बल ९ विकेट्सने पराभव करत तीन सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो अचूक ठरला. यशस्वी जैस्वालला सामनावीर तर विराट कोहलीला मालिकावीर घोषित करण्यात आले.
डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियमवर पाहुण्या संघाकडून क्विंटन डी कॉकने शतक झळकावले. कर्णधार टेम्बा बावुमाने ४८, देवाल्ड ब्रेव्हिसने २९ आणि मॅथ्यू ब्रेइट्झकीने २४ धावा करून संघाला २७० धावांपर्यंत पोहोचवले. भारताकडून कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या.
२७१ धावांच्या लक्ष्याचा सामना करताना, यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांनी भारताला दमदार सुरुवात दिली. त्यांनी १५५ धावांची भागीदारी केली. रोहित ७५ धावांवर बाद झाला, त्यानंतर यशस्वीने १११ चेंडूत त्याचे पहिले एकदिवसीय शतक झळकावले. विराट कोहलीनेही त्याच्या पाठोपाठ फक्त ४० चेंडूत अर्धशतक झळकावले. दोघांनीही ४० व्या षटकात विजय मिळवला.
दक्षिण आफ्रिकेसाठी केशव महाराजने एकमेव विकेट घेतली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील या निकालासह, यजमान संघाने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ३५९ धावांचा पाठलाग केला होता. दोन्ही संघांमधील पाच सामन्यांची टी-२० मालिका ९ डिसेंबरपासून सुरू होईल.
रोहित शर्माने २७ धावा करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावांचा टप्पा पार केला.
यापूर्वी, महान फलंदाज सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि राहुल द्रविड यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावांचा टप्पा पार केला आहे. आता या क्लबमध्ये रोहित शर्माची एन्ट्री झाली आहे. यासह त्याने यशस्वी जैस्वालसह पहिल्या विकेट्ससाठी शतकी भागीदारी रचली आहे.
क्विंटन डी कॉकने या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांतील अपयश तिसऱ्या सामन्यात शतक झळकावून भरून काढले. यासह त्याने विशाखापट्टणमच्या मैदानावर आपल्या वनडे कारकिर्दीतील २३ वे शतक पूर्ण केले. त्याचबरोबर भारताविरुद्ध वनडेत सर्वाधिक सात शतके ठोकणारा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू बनला आहे. त्याने दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्सला (६) मागे टाकले आहे.
इतकेच नव्हे, तर तो यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून एकाच संघाविरुद्ध (भारताविरुद्ध) सर्वाधिक शतके (७) ठोकणारा जागतिक क्रिकेटमधील पहिला खेळाडू ठरला आहे. याबाबतीत त्याने ॲडम गिलख्रिस्ट (श्रीलंकेविरुद्ध ६ शतके) आणि कुमार संगकाराला (भारताविरुद्ध ६ शतके) मागे टाकले. त्याने ८९ चेंडूंत ८ चौकार आणि ६ षटकार लगावत १०६ धावांची खेळी साकारली.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉक आणि रायन रिकल्टन यांनी डावाची सुरुवात केली. पण पहिल्याच षटकात रिकल्टनला अर्शदीप सिंगचने यष्टीरक्षक केएल राहुलच्या हातून शून्यावर झेलबाद केले.
पण त्यानंतर डी कॉकला कर्णधार तेंबा बावुमाने साथ दिली. एकिकडे डी कॉक आक्रमक खेळत असताना दुसरीकडे बावुमा त्याला चांगली साथ देत होता. यांच्यात ११३ धावांची भागादारीही झाली. अखेर बावुमाला रवींद्र जडेजाने विराट कोहलीच्या हातून झेलबाद करत भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. बावुमा ६७ चेंडूत ४८ धावा करून बाद झाला.
बावुमा बाद झाल्यानंतरही फॉर्ममध्ये असलेल्या मॅथ्यू ब्रिट्झके याने क्विंटन डी कॉकला साथ देत अर्धशतकी भागीदारी करत संघाला १५० धावांचा टप्पा पार करून दिला. पण या सामन्यात ब्रिट्झके याला फार काळ प्रसिद्ध कृष्णाने टिकू दिले नाही.
२९ व्या षटकात त्याला २३ चेंडूत २४ धावांवर प्रसिद्धने पायचीत केले. याच षटकात मागील सामन्यात शतक करणाऱ्या एडेन मार्करमचा अडथळाही प्रसिद्धने दूर केला. त्याने मार्करमला १ धावेवर विराट कोहलीच्या हातून झेलबाद केले. त्यामुळे डेवाल्ड ब्रेव्हिस मैदानात आला.
यावेळी क्विटन डी कॉक शतकाच्या जवळ होता. अखेर त्याने ३० व्या षटकात हर्षित राणाच्या गोलंदाजीवर षटकारासह त्याचे शतक पूर्ण केले. मात्र शतकानंतर त्याला प्रसिद्ध कृष्णानेच त्रिफळाचीत केले. डी कॉकने ८९ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांसह १०६ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर मात्र दक्षिण आफ्रिकेची धावगती मंदावली. डेवाल्ड ब्रेव्हिस आणि मार्को यान्सन यांनी डाव पुढे नेला. पण तेही मोठी खेळी करू शकले नाहीत.
३९ व्या षटकात कुलदीपने या दोघांनीही बाद केले. ब्रेव्हिसने २९ चेंडूत २९ धावा केल्या, त्याचा झेल रोहित शर्माने घेतला. मार्को यान्सनने १५ चेंडूत १७ धावा केल्या. त्याचा झेल रवींद्र जडेजाने घेतला.
कुलदीपने कॉर्बिन बॉशलाही टिकू दिले नाही. त्याला ९ धावांवर स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत बाद केले. लुंगी एनगिडीलाही १ धावेवर कुलदीप यादवने पायचीत केले. त्यानंतर ओटनील बार्टमनला प्रसिद्धने ४८ व्या षटकात ३ धावेवर त्रिफळाचीत करत दक्षिण आफ्रिकेचा डाव संपवला. केशव महाराज २९ चेंडूच २० धावांवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेने ४७.५ षटकात सर्वबाद २७० धावा केल्या.
भारताकडून कुलदीप यादवने १० षटकात ४१ धावा खर्च करत ४ विकेट्स घेतल्या. प्रसिद्ध कृष्णाने ९.५ षटकात ६६ धावा खर्च करत ४ विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंग आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावा करणारे भारतीय
सचिन तेंडुलकर (३४,३५७ धावा)
विराट कोहली (२७,९१० धावा)
राहुल द्रविड (२४,२०८ धावा)
रोहित शर्मा (२०,०४८ धावा)
डी कॉकची विराट कोहलीशी बरोबरी
या शतकी खेळीमुळे डी कॉक अनेक विक्रमांमध्ये संयुक्तपणे अव्वल स्थानी पोहोचला आहे:
भारत-दक्षिण आफ्रिका वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके (७) ठोकण्याच्या बाबतीत त्याने विराट कोहलीशी बरोबरी साधली आहे.
वनडे क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून सर्वाधिक शतके (२३) ठोकण्याच्या बाबतीत त्याने कुमार संगकाराशी संयुक्तपणे पहिले स्थान पटकावले आहे.
एबी डिव्हिलियर्सनंतर डी कॉक हा भारतामध्ये वनडे क्रिकेटमध्ये १००० हून अधिक धावा करणारा दुसरा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू बनला.