धर्मशालामध्ये वारा, दव ठरू शकतात ‘गेमचेंजर’

भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना आज

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
13th December, 11:46 pm
धर्मशालामध्ये वारा, दव ठरू शकतात ‘गेमचेंजर’

धर्मशाला : हिमाचल प्रदेशातील निसर्गरम्य पण आव्हानात्मक परिस्थिती असलेल्या धर्मशाला क्रिकेट स्टेडियमवर रविवारी, १४ डिसेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे. उंचावर वसलेल्या या मैदानावर थंड हवामान, जोरदार वारा आणि दव हे घटक सामन्याचा निकाल ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
धर्मशाला येथे हवामान बदलल्यानंतर जोरदार वारा वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरू शकतो. मात्र, भारतीय फलंदाज तिलक वर्मा दवमुळे नाणेफेकीला इतके महत्त्वाचे मानत नाही. तो म्हणाला की, ज्या इराद्याने मागील १५-२० सामने खेळले, त्याच इराद्याने धर्मशालामध्येही खेळू.
याशिवाय, दक्षिण आफ्रिका संघाचे प्रशिक्षक शुकरी कॉनराड यांचे म्हणणे आहे की त्यांचे खेळाडू या मैदानावर यापूर्वीही खेळले आहेत. त्यांच्या मते, फलंदाजीपेक्षा वेगवान गोलंदाजीच सामन्यात महत्त्वाचा घटक ठरेल.
शनिवारी भारतीय संघाचा युवा फलंदाज तिलक वर्माने सांगितले की, संघ एकाच रणनीतीपुरता मर्यादित नाही. नाणेफेक आणि परिस्थितीपलीकडे भारत प्रत्येक आव्हानासाठी तयार आहे. फिटनेस, मानसिक बळ आणि लवचिक फलंदाजी क्रम ही संघाची ताकद आहे.दंवाचा फलंदाजीवर परिणाम होणार नाही: तिलक म्हणाला की, वेगवेगळ्या क्रमाने खेळण्याची तयारी आणि अष्टपैलू खेळाडूंची भूमिका या सामन्यात महत्त्वाची ठरेल. हवामान थंड आहे, त्यामुळे चेंडू थोडा स्विंग होत आहे. संध्याकाळी ७ वाजताच 'दव' पडायला सुरुवात होत आहे. अशा परिस्थितीत आधी आणि नंतर फलंदाजी करण्यात फारसा फरक पडणार नाही.
दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक शुकी कॉनराड यांनीही धर्मशाला येथील परिस्थितीबाबत संतुलित दृष्टिकोन ठेवला. ते म्हणाले, संघातील अनेक खेळाडू यापूर्वी येथे (धर्मशाला) खेळले आहेत आणि उच्च उंचीवरील आव्हान नवीन नाही. कॉनराड यांनी थंड वातावरणात वेगवान गोलंदाजीला सामन्याचा महत्त्वाचा घटक म्हटले. कॉनराड यांनी हे देखील संकेत दिले की, त्यांचा संघ टी-२० विश्वचषक २०२६ च्या तयारी लक्षात घेऊन संघाला स्थिरतेकडे नेत आहे.
भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला कॉनराड यांनी जागतिक दर्जाचा परफॉर्मर म्हटले, पण कोणत्याही मोठ्या सामन्यात अंतिम निर्णय मॅच-डेच्या कामगिरीवरच अवलंबून असतो. त्यांच्या मते, महत्त्वाचे हे आहे की खेळाडू कामगिरीच्या दिवशी परिस्थिती किती लवकर ओळखू शकतात.
या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात शुभमन गिल अवघ्या ४ धावा करून बाद झाला होता, तर दुसऱ्या सामन्यात तो खातेही न उघडता शून्यावर तंबूत परतला. त्यामुळे पुढील सामन्यात त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळणार का, याबाबत चर्चा रंगू लागली आहे. आकडेवारी पाहिली तर गिलची टी-२० मधील अलीकडची कामगिरीही निराशाजनक आहे. मागील १४ टी-२० डावांत त्याने केवळ २६३ धावा केल्या असून त्यातील सर्वोच्च धावसंख्या फक्त ४७ आहे.
एका बाजूला शुभमन गिल सातत्याने अपयशी ठरत असताना, दुसऱ्या बाजूला चाहत्यांकडून संजू सॅमसनला टी-२० संघात सलामीवीर म्हणून संधी देण्याची जोरदार मागणी होत आहे. संजू सॅमसनने गेल्या एका वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये तब्बल तीन शतके झळकावली आहेत. याशिवाय त्याच्या नावावर तीन अर्धशतकेही आहेत. गिलच्या तुलनेत संजूचा रनरेट आणि सरासरी दोन्हीही अधिक प्रभावी ठरले आहेत.
टी-२० मधील खराब फॉर्ममुळे शुभमन गिल सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. इतकेच नाही तर माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाण यांनीही शुभमन गिलसह कर्णधार सूर्यकुमार यादवच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करत संघाच्या फलंदाजीवर चिंता व्यक्त केली आहे.
मालिका १-१ च्या बरोबरीत
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ सामन्यांची मालिका सध्या १-१ च्या बरोबरीत आहे. दोन दिवसांपूर्वी चंदीगडमध्ये झालेल्या सामन्यात भारताचा ५१ धावांनी पराभव झाला होता. अशा परिस्थितीत, धर्मशाला येथील हा तिसरा सामना मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरला आहे.
भारतीय संघ
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, संजू सॅमसन, हर्षित राणा
दक्षिण आफ्रिकेचा संघ
क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), एडेन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेव्हिस, डेविड मिलर, डोनोवन फेरेरा, मार्को यान्सेन, केशव महाराज, लिथो सिपामला, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्ट्जे, टोनी डी झॉर्ज़ी, कॉर्बिन बॉश, रीज़ा हेंड्रिक्स, ओटनील बार्टमॅन, क्वेना माफाका, जॉर्ज लिंडे
आजचा सामना
भारत वि. दक्षिण आफ्रिका

वेळ : सायं. ७ वा.
स्थळ : हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाला
प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जीओ हॉटस्टार