पहिला सामना कटक येथे : टी-२० विश्वचषकाच्यादृष्टीने महत्त्वाची मालिका

कटक : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका मंगळवारपासून कटकच्या बाराबती स्टेडियमवर सुरू होत आहे. कसोटी आणि वनडे मालिकेनंतर दोन्ही संघ टी-२० फॉरमॅटमध्ये आमनेसामने येणार असून, येत्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. हा विश्वचषक भारत आणि श्रीलंका येथे ८ फेब्रुवारी २०२६ पासून खेळवला जाणार आहे.
भारतीय संघाचे नेतृत्त्व सूर्यकुमार यादव करणार आहे, तर एडन मारक्रमच्या खांद्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी असणार आहे.
कसोटी मालिका २-० ने गमावल्यानंतर भारताने २-१ च्या फरकाने वनडे मालिका आपल्या नावे केली. यानंतर आता टी-२० मालिकेत संघ कशी कामगिरी करणार, यावर सर्वांच्या नजरा असतील. भारत आणि दक्षिण आफ्रिका पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना मंगळवार, ९ डिसेंबरला कटकमध्ये खेळवला जाणार आहे. दुखापतीनंतर संघाचा उपकर्णधार शुबमन गिल टी-२० मालिकेसाठी फिट होत संघात परतला आहे. तर हार्दिक पंड्यादेखील आशिया चषकानंतर मैदानावर पहिल्यांदा खेळताना दिसणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेतील पहिला सामना संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाणार आहे. तर नाणेफेक संध्याकाळी ६.३० वाजता होईल. भारतात टी-२० मालिका खेळवली जाणार असल्याने मालिकेतील सर्व सामने संध्याकाळीच खेळवले जातील. तर स्टार स्पोर्ट्सवर या टीव्ही चॅनेलवर सामना लाईव्ह पाहता येणार आहे, तर जिओ हॉटस्टारवर मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहायला मिळेल.
पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने विश्वचषकाच्या तयारीबद्दल एक महत्त्वपूर्ण आणि दमदार विधान केले आहे. त्याने तयारीची तुलना थेट शाळेच्या अभ्यासाशी केली आहे. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादव म्हणाला, टी-२० विश्वचषक २०२६ ची तयारी खरे तर २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक संपल्यापासूनच सुरू झाली आहे. कोणत्याही मोठ्या स्पर्धेसाठी तयारी एक-दोन महिने आधी सुरू होत नाही.
या तयारीचे महत्त्व पटवून देताना त्याने एक उदाहरण दिले. जेव्हा आपण शाळेत परीक्षा देतो, तेव्हा फक्त चार दिवस आधी अभ्यास करत नाही, तर वर्षभर अभ्यास करतो. त्याचप्रमाणे, आमची तयारीही खूप आधी सुरू झाली आहे. तेव्हापासून तुम्ही पाहू शकता की आम्ही अनेक नवीन गोष्टींचा प्रयोग करत आहोत आणि त्या सर्व गोष्टी आमच्यासाठी प्रभावी ठरत आहेत, असे सूर्याने स्पष्ट केले.
टी-२० मध्ये भारताचा शानदार फॉर्म
गेल्या वर्षी सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक जिंकल्यापासून भारताने टी-२० क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. टी-२० विश्वचषकात सलग आठ सामने जिंकून भारताने विजेतेपद पटकावले होते. तेव्हापासून भारताने आपल्या विजयाचा आकडा २६ सामन्यांपर्यंत नेला आहे, ज्यात आशिया कप २०२५ मध्ये सलग सात सामने जिंकण्याचा विक्रमही समाविष्ट आहे. या दरम्यान, भारतीय संघाला फक्त चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
फलंदाजी क्रमाबद्दल विचारले असता, सूर्यकुमार यादवने सांगितले की, सलामीवीरांव्यतिरिक्त इतर खेळाडूंना लवचिक राहावे लागेल. त्यांना परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घ्यावे लागेल. तो म्हणाला, गिल आणि संजू आमच्या नियोजनाचा भाग आहेत आणि ते अनेक भूमिका पार पाडू शकतात. ही टीमसाठी एक चांगली गोष्ट आहे आणि एक ‘चांगली डोकेदुखी’ देखील आहे.कर्णधार सूर्यकुमारने भारताच्या अलीकडील यशावर जोर दिला. हा सातत्यपूर्ण निवडीचा परिणाम असल्याचे त्याने सांगितले. मला वाटते की आम्ही गेल्या पाच-सहा मालिकांमध्ये सारख्याच खेळाडूंच्या संयोजनासह खेळण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही जास्त बदल केलेले नाहीत. सर्वकाही व्यवस्थित सुरू आहे आणि आम्हाला याच मार्गाने पुढे जायचे आहे, असे सूर्या म्हणाला. टी-२० विश्वचषक (७ फेब्रुवारी ते ८ मार्च) भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. या विश्वचषकापूर्वी भारताला दक्षिण आफ्रिकेशिवाय न्यूझीलंडविरुद्धही टी-२० मालिका खेळायची आहे.
संजू सॅमसन आणि शुबमन गिल या दोघांपैकी सलामीला कोण खेळणार, या प्रश्नावर कर्णधार म्हणाला की, दोन्ही खेळाडूंसाठी संघात जागा आहे आणि दोघेही अत्यंत लवचिक आहेत. संजू सॅमसनबद्दल बोलताना तो म्हणाला, संजू असा फलंदाज आहे जो वरच्या क्रमाने खेळू शकतो. त्याने सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी केली आहे. शुभमन सॅमसनच्या आधी खेळला, कारण तो त्या जागेसाठी पात्र होता, पण संजूलाही संधी मिळतील, याची आम्ही खात्री केली आहे. या विधानावरून हे स्पष्ट होते की, कर्णधार दोघांवरही विश्वास ठेवतो आणि संघातील संतुलन कायम ठेवू इच्छितो.
कर्णधारने पुढे सांगितले की, विश्वचषकापूर्वी संघाला दोन मजबूत संघांविरुद्ध १० टी-२० सामने खेळायचे आहेत. त्यामुळे सध्या या सामन्यांवर लक्ष केंद्रित आहे. विश्वचषक जवळ आल्यावर संघ हळूहळू आपले संपूर्ण लक्ष त्या स्पर्धेवर केंद्रित करेल. सूर्यकुमार यादवच्या या वक्तव्यावरून हे स्पष्ट होते की, टीम इंडिया टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये एक मजबूत संघ म्हणून उतरण्यासाठी संतुलन, लवचिकता आणि ठोस रणनीतीवर विशेष भर देत आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण ३१ सामने झाले आहेत. यापैकी १८ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे, तर आफ्रिकेने १२ सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा कोणताही निकाल लागला नाही. या आकडेवारीवरून स्पष्ट होते की टी-२० क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाचे पारडे नेहमीच जड राहिले आहे.
भारतामध्ये टी-२० मालिका जिंकणे द. आफ्रिकेसाठी नेहमीच कठीण राहिले आहे. आफ्रिकेने भारताविरुद्ध आतापर्यंत फक्त दोनदाच द्विपक्षीय टी-२० मालिका जिंकली आहे. पहिली मालिका २०१२ मध्ये झाली होती, जी फक्त एका सामन्याची होती. यानंतर, २०१५ मध्ये आफ्रिकेने तीन सामन्यांची मालिका २-० ने जिंकली होती. तेव्हापासून, म्हणजेच गेल्या १० वर्षांपासून, दक्षिण आफ्रिकेला भारताविरुद्ध कोणतीही टी-२० मालिका जिंकता आलेली नाही.
स्टार खेळाडूंची उपस्थिती
या टी-२० मालिकेसाठी दोन्ही संघात उत्कृष्ट आणि स्टार खेळाडूंचा समावेश आहे, ज्यामुळे ही मालिका अत्यंत रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. भारतीय संघात कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत शुबमन गिल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि हार्दिक पांड्या यांसारखे स्टार फलंदाज आहेत. दुसरीकडे, एडन मार्करमच्या नेतृत्वाखालील आफ्रिकन संघात डेवाल्ड ब्रेविस, रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर आणि क्विंटन डी कॉक यांसारखे विस्फोटक खेळाडू आहेत.
भारताचा संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर
दक्षिण आफ्रिकेचा संघ
एडन मारक्रम (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, जॉर्ज लिंडे, कॉर्बिन बॉश, मार्को यान्सन, क्विंटन डी कॉक, डोनोव्हन फरेरा, ट्रिस्टन स्टब्स, ओटनील बार्टमन, केशव महाराज, क्वेना मफाका, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्किया
आजचा सामना
भारत वि. दक्षिण आफ्रिका
स्थळ : बाराबती स्टेडियम, कटक
वेळ : सायं ७ वा.
प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जीओ हॉटस्टार