टी-२० रँकिंगमध्ये वरुण चक्रवर्तीची ऐतिहासिक झेप

फलंदाजीत अभिषेक अव्वल : तिलक वर्मा टॉप ५ मध्ये

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
टी-२० रँकिंगमध्ये वरुण चक्रवर्तीची ऐतिहासिक झेप

दुबई : भारत–दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेचा थरार सुरू असतानाच आयसीसीच्या ताज्या टी-२० क्रमवारीत भारतीय क्रिकेटसाठी आनंद आणि चिंतेचे दोन्ही क्षण पाहायला मिळाले आहेत. युवा फलंदाज तिलक वर्मा याने शानदार कामगिरीच्या जोरावर जागतिक टॉप-५ मध्ये प्रवेश केला आहे, तर दुसरीकडे भारतीय संघाचा कर्णधार आणि ‘मिस्टर ३६०’ म्हणून ओळखला जाणारा सूर्यकुमार यादव घसरणीमुळे टॉप-१०च्या बाहेर जाण्याच्या उंबरठ्यावर आहे. दरम्यान, गोलंदाजीत वरुण चक्रवर्ती याने ऐतिहासिक कामगिरी करत भारताचा नवा विक्रम रचला आहे.
भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने टी-२० फलंदाजीत आपले वर्चस्व कायम राखले आहे. ९०९ रेटिंग पॉइंट्ससह तो जगात अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडचा फिल साल्ट (८४९) दुसऱ्या, तर श्रीलंकेचा पथुम निसंका (७७९) तिसऱ्या स्थानावर आहे. या क्रमवारीतील सर्वात सकारात्मक बाब म्हणजे तिलक वर्माची झेप. तिलकने दोन स्थानांची सुधारणा करत थेट चौथे स्थान मिळवले आहे. ७७४ रेटिंग पॉइंट्ससह त्याने इंग्लंडच्या जोस बटलरला मागे टाकले.
युवा वयात सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तिलक वर्मा भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी मोठी आशा ठरत आहे. भारतीय चाहत्यांसाठी चिंतेची बाब म्हणजे कर्णधार सूर्यकुमार यादवची घसरण. एकेकाळी जगातील नंबर-१ फलंदाज असलेला सूर्या आता १० व्या स्थानावर घसरला आहे. त्याचे सध्याचे रेटिंग ६६९ आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित सामन्यांत मोठी खेळी न झाल्यास तो टॉप-१० मधून बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारतीय ‘मिस्ट्री स्पिनर’ वरुण चक्रवर्ती याने टी-२० गोलंदाजी क्रमवारीत इतिहास रचला आहे. ८०० रेटिंग पॉइंट्स पार करणारा पहिला भारतीय वरुण चक्रवर्ती सध्या जगातील नंबर-१ टी-२० गोलंदाज आहे. त्याच्या खात्यात ८१८ रेटिंग पॉइंट्स असून, ८०० रेटिंग पॉइंट्सचा टप्पा ओलांडणारा तो भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम जसप्रीत बुमराहकडे (२०१७ – ७८३ पॉइंट्स) होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत वरुणची कामगिरी प्रभावी ठरली आहे. त्याने ३ सामन्यांत ६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची अचूकता आणि किफायतशीर गोलंदाजी रँकिंगसाठी निर्णायक ठरली. २०२५ हे वर्ष वरुण चक्रवर्तीसाठी संस्मरणीय ठरत आहे. आतापर्यंत १९ टी-२० सामन्यांत ६.६९ इकॉनॉमी रेटसह ३२ विकेट्स घेतल्या आहेत. इतर भारतीय गोलंदाजांमध्ये अर्शदीप सिंहने ४ स्थानांची सुधारणा करून १६वा क्रमांक प्राप्त केला आहे. कुलदीप यादवने एक स्थानाची सुधारणा करून २३वा क्रमांक तर जसप्रीत बुमराहची ३ स्थानांनी घसरण झाली असून ताे २८वा क्रमांकावर पोहाचला आहे.