स्टार्कचे ६ बळी : दिवसअखेर इंग्लंड ९ बाद ३२५

ब्रिस्बेन : इंग्लंडचा विश्वासार्ह फलंदाज ज्यो रूट याने अखेर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरही कसोटी शतक झळकावण्याची दीर्घ प्रतीक्षा समाप्त केली. ब्रिस्बेनच्या द गाबा मैदानावर गुरुवारी सुरू झालेल्या अॅशेस मालिकेच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी त्याने १८१ चेंडूंमध्ये ही कामगिरी पूर्ण केली. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ४० वे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकूण ५९ वे शतक ठरले आहे. ऑस्ट्रेलियात खेळताना त्याला शतकासाठी तब्बल ३० डाव लागले. या महत्त्वाच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या दिवशीच्या अखेरीस ९ विकेट गमावून ३२५ धावा केल्या. रूट १३५ धावांवर नाबाद असून त्याला जोफ्रा आर्चरने (३२) उत्तम साथ दिली. यजमान संघासाठी डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने ६ बळी घेतले.३ विकेट पडल्यानंतर रूटने एक बाजू सांभाळली. त्याच्यासमोर हॅरी ब्रूक ३१, कर्णधार बेन स्टोक्स १९ आणि जेमी स्मिथ खाते न उघडता बाद झाले. विल जॅक्स काही काळ टिकला, पण तोही १९ धावा काढून झेलबाद झाला. रूटने नंतर स्कॉट बोलंडच्या चेंडूवर फाइन लेगच्या दिशेने चौकार मारला आणि आपले ४० वे कसोटी शतक पूर्ण केले. रूटला ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी शतक झळकावण्यासाठी ३० डाव लागले.ऑस्ट्रेलियाकडून वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने ६ विकेट्स घेतल्या. मायकेल नेसर आणि स्कॉट बोलंडला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. ब्रेंडन डॉगेट आणि कॅमेरॉन ग्रीनला एकही विकेट मिळाली नाही. स्टार्कने डे-नाईट कसोटीत सहाव्यांदा एका डावात ५ विकेट्स घेतल्या. त्याने १५ सामन्यांच्या २८ डावांमध्ये ८७ विकेट्स घेतल्या आहेत. पिंक बॉल कसोटीत त्याच्यापेक्षा जास्त विकेट्स इतर कोणत्याही गोलंदाजाने घेतल्या नाहीत.
इंग्लंडची खराब सुरुवात
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लिश संघाने ५ धावांवर २ गडी गमावले. बेन डकेट आणि ऑली पोप खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. दोघांनाही मिचेल स्टार्कने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जॅक क्रॉलीने नंतर जो रूटसोबत शतकी भागीदारी केली. क्रॉली ७६ धावांवर बाद झाला आणि दोघांमधील ११७ धावांची भागीदारी तुटली.
रूटने शतक झळकावल्यानंतर त्यांच्यासमोर गस ॲटकिन्सन ४ आणि ब्रायडन कार्स खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. जोफ्रा आर्चरने पुन्हा वेगाने धावा केल्या आणि रूटसोबत अर्धशतकीय भागीदारी केली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघाने ९ विकेट गमावून ३२५ धावा केल्या. रूट १३५ आणि आर्चर ३२ धावांवर नाबाद राहिले.
स्टार्कने मोडला वसीम अक्रमचा रेकॉर्ड
दुसऱ्या कसोटीदरम्यान मिचेल स्टार्कने एक मोठा टप्पा गाठला. सामन्यात ३ विकेट्स मिळवताच तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा डावखुरा वेगवान गोलंदाज बनला. त्याने पाकिस्तानचे महान गोलंदाज वसीम अक्रम यांचा ४१४ विकेट्सचा विश्वविक्रम मोडला आहे. आता स्टार्क ४१५ विकेट्ससह या श्रेणीत जगातील अव्वल गोलंदाज बनला आहे.
कसोटीत सर्वाधिक बळी घेणारे डावखुरे गोलंदाज
मिचेल स्टार्क ४१८ वसीम अक्रम ४१४
चमिंडा वास ३५५
ट्रेंट बोल्ट ३१७
मिचेल जॉनसन ३१३
रुटने कुमार संगकाराला टाकले मागे
या शतकी खेळीसह जो रूटने मोठ्या विक्रमात श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकाराला मागे टाकले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रूट चौथ्या स्थानी पोहोचला आहे. याआधी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ज्यो रूट आणि कुमार संगकारा दोघेही ३९-३९ शतकांसह संयुक्तरित्या चौथ्या स्थानी होते. आता रूटने कुमार संगकाराला मागे टाकले आहे. आणखी १ शतक झळकावताच त्याच्याकडे रिकी पाँटींगच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी असणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. सचिनने ५१ शतके झळकावली आहे. तर ४५ शतकांसह जॅक कॅलिस या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तिसऱ्या स्थानी असलेल्या रिकी पाँटींगच्या नावे ४१ शतके झळकावण्याची नोंद आहे.