दक्षिण आफ्रिका ७४ धावांत सर्वबाद : मालिकेत १-० ने आघाडी

कटक : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत दणदणीत सुरुवात केली आहे. टीम इंडियाने कटकमधील बाराबती स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकेवर पहिल्या टी-२० सामन्यात एकतर्फी आणि धमाकेदार विजय मिळवला.
हार्दिक पंड्याने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर १७६ धावांचे आव्हान ठेवले होते. भारतीय गोलंदाजांनी कमाल बॉलिंग करत दक्षिण आफ्रिकेला गुडघे टेकण्यास भाग पाडले. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला १२.३ षटकांत ७४ धावांवर गुंडाळले. भारताने यासह पहिलाच सामना हा १०१ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. भारताने या विजयासह ५ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली.
दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज ढेर
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी १७६ धावांचा पाठलाग करायला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला पहिल्याच षटकामध्ये झटका दिला. अर्शदीप सिंहने क्विंटन डी कॉकला भोपळाही फोडून दिला नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे धावांआधी विकेटचे खाते उघडले. इथून भारताने दक्षिण आफ्रिकेला झटके दिले. भारताच्या गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला झुंज देता आली नाही.
दक्षिण आफ्रिकेसाठी डेवाल्ड ब्रेव्हीसने सर्वाधिक २२ धावा केल्या. कर्णधार एडन मार्रक्रम आणि ट्रिस्टन स्टब्स या दोघांनी प्रत्येकी १४-१४ धावा केल्या. तर मार्को यान्सेनने १२ धावांचे योगदान दिले. या चौघांव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही.
टीम इंडियाचे सर्वच गोलंदाज ठरले यशस्वी
टीम इंडियासाठी अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल या चौघांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. हार्दिकने १ विकेट घेतली. तर शिवम दुबे याने विकेट घेताच दक्षिण आफ्रिकेचे पॅकअप झाले आणि भारताने यासह सामना जिंकला.
हार्दिकची अर्धशतकी खेळी
त्याआधी टीम इंडियाने नाणेफेक गमावल्याने बॅटिंग करावी लागली. टीम इंडियाचे टॉप ऑर्डरमधील फलंदाज अपयशी ठरले. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांनी भारताला सावरले. तिलक वर्मा, अक्षर पटेल, जितेश शर्मा आणि शिवम दुबे या चौघांनी निर्णायक योगदान दिले. तर हार्दिकने चाबूक अर्धशतकी खेळी साकारली.
टीम इंडियाची विजयी सलामी
तिलक वर्माने २६, अक्षर पटेलने २३, शिवम दुबेने ११ आणि जितेश शर्माने १० धावांचे योगदान दिले. तर हार्दिक पंड्याने २८ चेंडूत ४ षटकार आणि ६ चौकारासह नाबाद ५९ धावांची खेळी साकारली. तर दक्षिण आफ्रिकेसाठी लुंगी एन्गिडीने ३ विकेट्स मिळवल्या.
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताकडून सर्वाधिक षटकार
२०५ - रोहित शर्मा
१५५ - सूर्यकुमार यादव
१२४ - विराट कोहली
१०० - हार्दिक पंड्या
९९ - केएल राहुल
जसप्रीत बुमराहचा अनोखा विक्रम
या मालिकेतील पहिल्याच सामन्यात जसप्रीत बुमराहने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. बुमराहने भेदक गोलंदाजी करत दोन विकेट्स मिळवल्या आणि अनोखा विक्रम आपल्या नावे केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० विकेट्स घेणारा तो भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे. बुमराहने डेवाल्ड ब्रेविसला बाद करत टी-२० क्रिकेटमधील १००वी विकेट मिळवली. बुमराहने कसोटीत २३४ विकेट्स, एकदिवसीय क्रिकेटमध्ये १४९, तर टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत १०१ विकेट्स घेतल्या आहेत.
संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत ६ बाद १७५ धावा.
द. आफ्रिका : १२.३ षटकांत सर्वबाद ७४ धावा.
सामनावीर : हार्दिक पांड्या