दक्षिण आफ्रिकेचे दणक्यात ‘कम बॅक’

५१ धावांनी भारतावर भव्य विजय : डिकॉकच्या ९० धावा

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
23 hours ago
दक्षिण आफ्रिकेचे दणक्यात ‘कम बॅक’

कटक : मुल्लानपूर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर ५१ धावांनी मोठा आणि दणदणीत विजय मिळवत मालिकेत जबरदस्त पुनरागमन केले. कटकमध्ये झालेल्या मागील पराभवानंतरचा हा आफ्रिकेचा ‘परफेक्ट बाऊन्स बॅक’ ठरला. आता मालिका १-१ ने बरोबरीत झाली आहे.
धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात फारच खराब झाली. उपकर्णधार शुभमन गिल तर खातेही उघडू शकला नाही आणि लुंगी एनगिडीने त्याची विकेट घेतली. तर अभिषेक शर्मा (१७) याने काही धावा केल्या, पण त्यालाही मार्को यान्सनने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यान्सनने यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला (५) बाद करत टीम इंडिया मोठ्या अडचणीत आणली. सूर्या बाद होईपर्यंत भारताचा स्कोअर फक्त ३ बाद ३२ असा होता.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने जबरदस्त सुरुवात केली. पॉवर प्लेमध्ये रीजा हेंड्रिक्सची विकेट गमावूनही त्यांनी जोरदार पुनरागमन केले. कर्णधार एडेन मार्करमने २६ चेंडूत २९ धावा केल्या, तर डेवाल्ड ब्रेविस १४ धावांवर बाद झाला. मात्र, ओपनर क्विंटन डी कॉकने भारतीय गोलंदाजांना धुतले आणि ४६ चेंडूत ९० धावांची तुफानी खेळी केली. त्यात ७ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता.
डी कॉक बाद झाल्यानंतर डोनोवन फरेरा आणि डेविड मिलर यांनी अखेरच्या षटकात तुफानी फटकेबाजी केली आणि संघाला २०० च्या पलीकडे नेले. फरेराने १६ चेंडूत ३ षटकार आणि १ चौकारांसह नाबाद ३० धावा केल्या, तर मिलरने केवळ १२ चेंडूत नाबाद २० धावा ठोकल्या. अशा प्रकारे दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत ४ विकेटच्या मोबदल्यात २१३ धावा करत भारतासमोर २१४ धावांचे आव्हान ठेवले.
तिलक वर्माचे अर्धशतक व्यर्थ
अक्षर पटेल आणि तिलक वर्मा यांनी चौथ्या विकेटसाठी ३५ धावांची महत्त्वाची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अक्षरने संयमी खेळ करत २१ धावा केल्या, पण ओटनील बार्टमॅनने त्याचीही विकेट घेतली. तिलक वर्मा मात्र एकाकी लढत देत राहिला. त्याने फक्त २७ चेंडूमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. पण दुसऱ्या टोकाकडून त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. हार्दिक पांड्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असतानाही तो २३ चेंडूंमध्ये केवळ २० धावा करत आऊट झाला. दक्षिण आफ्रिकेकडून ओटेनले बार्टमनने चार, तर लुंगी एनगिडी, मार्को यान्सन आणि लुथो सिपामला यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
अर्शदीप सिंगचा लाजिरवाणा विक्रम
दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताकडून सर्वात निराशाजनक कामगिरी अर्शदीप सिंगने केली. आफ्रिकी डावातील ११ वे षटक टाकण्यासाठी जेव्हा अर्शदीप आला, तेव्हा त्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार बसला. त्यानंतर तर तो पूर्णपणे लयबाहेर गेला. एकट्या या षटकात त्याने तब्बल ७ वाइड्स टाकत प्रतिस्पर्धी संघाला ७ मोफत धावा दिल्या. एकूण सामन्यात अर्शदीपने ४ षटकांत ९ वाइड बॉल्स टाकल्या, ज्या भारतासाठी डोकेदुखीच ठरल्या.