सर्वाधिक ७० टक्के मतदान गिर्दोलीत, तर कमी नावेलीत

मडगाव : सासष्टीच्या नऊ मतदारसंघात सायंकाळपर्यंत सुमारे ९७,३२२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही सरासरी ६१.१५ टक्के इतकी राहिली. यात गिर्दोली सर्वाधिक ७० टक्के तर, नावेलीत मतदारांचा कमी प्रतिसाद असून ५५ टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी मतदान केंद्राच्या बाहेर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच पोलिसांनी मतदान केंद्राबाहेरील गर्दी पांगवली.
मतदान संपल्यानंतर रायमध्ये १००२४ (५९.२३ टक्के), नुवेमध्ये ९५७९ (६२.७२ टक्के), कोलवा येथे १०५१३ (५९.९७ टक्के), वेळ्ळीत ९९१८ (५६.५२ टक्के), बाणावलीत १२०११ (५९.७० टक्के), दवर्ली येथे १३१०३ (६५.७८ टक्के), गिर्दोलीत ११५७४ (७०.७५ टक्के), कुडतरीमध्ये ११९३१ (६०.२६ ) व नावेलीत ८६६९ (५५.२९) मतदारांनी मतदान केले.
सासष्टीतील ९ मतदारसंघांत पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांनी जास्त प्रमाणात मतदान केले. ४२,५६३ पुरुष मतदारांनी तर ५४,७५९ महिला मतदारांनी मतदान केले.
सासष्टीतील मतदानाची प्रक्रिया पाहता सकाळच्या सत्रात मतदान संथगतीने सुरू होते. मात्र, दुपारपर्यंत मतदारांनी केंद्रांवर उपस्थिती दाखवत मतदान केले. त्यामुळे सकाळी ८ ते १० या कालावधीत २०,६३६ मतदान झाले. जे केवळ १२.९६ टक्के होते. १२ वाजेपर्यंत ही टक्केवारी वाढून २७.८६ टक्के झाली व ४४,३८६ मतदारांनी हक्क बजावला. दोन वाजेपर्यंत ६७,०८० मतदारांनी मतदान केल्याने ही टक्केवारी ४२.१४ टक्के झाली. सायंकाळी चार वाजेपर्यंत ८७,५५१ (५५.०१) मतदारांनी हक्क बजावला. मतदान संपेपर्यंत ही टक्केवारी ६१.१५ टक्क्यांवर गेल्याचे दिसून आले.
नावे शोधण्यासाठी मतदारांचा वेळ
सासष्टीत काही ठिकाणी मतदार केंद्रांवर येणार्या मतदारांकडे निवडणूक कार्ड होते परंतु त्यांची नावे शोधण्यात वेळ लागत होता. या कालावधीसाठी किमान दहा मिनिटांचा वेळ व त्यानंतर पुन्हा रांगेत उभे राहावे लागत असल्याने नागरिकांकडून थोडी नाराजी व्यक्त करण्यात येत होती. चौकट
मतदान केंद्राबाहेरील जमावावर आक्षेप
रुमडामळ येथील मतदान केंद्रात चार मतदान केंद्रे ही शाळेत एकाच ठिकाणी आहेत. त्या केंद्राबाहेर गर्दी झालेली होती. गाड्या लावून लोक त्याचठिकाणी थांबत होती. त्याठिकाणी आमदार उल्हास तुयेकरही होते. अपक्ष उमेदवार वरक यांनी यावर आक्षेप घेत आमदार मतदारांना आताही मते घालण्यास सांगत असल्याचा दावा केला. यानंतर पोलिसांनी मतदान केंद्राबाहेरील जमलेल्या लोकांना हटवले.
मतपत्रिकेवरील सिरीअल क्रमांकावर आक्षेप
कुडतरीतील रुपेश शिंक्रे यांनी मतपत्रिकेवरील सिरीअल क्रमांकावर आक्षेप घेतला. सिरीअल क्रमांकामुळे मतदान कुणाला केले याची माहिती मिळू शकते. हा गोपनीयतेचा भंग आहे. याशिवाय मतपत्रिकेवर नोटा हा पर्यायही असण्याची गरज होती तोही देण्यात आलेला नाही, अशा आशयाची तक्रार मतदान केंद्रावरील अधिकार्यांकडे दिली. तसेच मतदानासाठी दिलेली मतपत्रिका परत केली.