जिल्हा पंचायत मतदान प्रक्रिया शांततेत, ‘बर्च’ दुर्घटनेतील लुथरा बंधूंना पोलिसांकडून अटक

पणजी : जिल्हा पंचायतीसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या क्लबला भीषण आग लागल्यानंतर या क्लबच्या मालकांना गोवा पोलिसांनी अटक केली. तसेच राज्यातील अनेक बेकायदा क्लबना टाळे ठोकण्यात आले. याशिवाय अपघात, चोरी, आगीच्या घटना घडल्या. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.
रविवार

हणजूणमधील दियाज क्लब सील
गाववाडी, हणजूण येथील दियाज नाईट क्लब सील करण्याची कारवाई रविवारी करण्यात आली. वरिष्ठ नागरी सेवा अधिकारी कबीर शिरगावकर यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त अंमलबजावणी समितीने ही कारवाई केली. पाच महिन्यांपूर्वी दियाज क्लबला बजावलेल्या हणजूण-कायसूव पंचायतीच्या अतिक्रमण हटाव नोटिसीला पंचायत संचालनालयाने एकतर्फी (एक्स पार्टी) स्थगिती दिली होती.
कुठ्ठाळी उड्डाणपुलावरील अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू
कुठ्ठाळीच्या उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात कोन्सुआ कुठ्ठाळी येथे राहणारे के. एच. बिक्रम सिनघा (२१) व ए. परिटोन सिनघा (२३) या दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वेर्णा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला.
चिमुकलीच्या खूनप्रकरणी मातेची जन्मठेप रद्द
बार्देश तालुक्यातील स्वतःच्या पाच महिन्यांच्या चिमुकलीचा लाटणीच्या सहाय्याने रागाच्या भरात आईने खून केला होता. आईने गुन्हा कबुल केल्यामुळे सुनावणी पूर्ण न करता शिक्षा देता येत नाही. तसेच तिची मानसिक स्थिती ठिक नव्हती, असे निरीक्षण नोंदवून बाल न्यायालयाने आईला दिलेली जन्मठेपेची शिक्षा गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. तसेच पुन्हा सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
सांकवाळ औद्योगिक वसाहतीत ४ लाखांच्या बॅटऱ्या चोरीस
सांकवाळ औद्योगिक वसाहतीतील प्रो. आगम बॅटरिज् प्रा. लिमिटेड कंपनीमध्ये अज्ञातांनी चोरी करून ४५ बॅटऱ्या पळविल्या. सदर बॅटऱ्यांची किंमत चार लाख असल्याचे कंपनीचे प्रतिक गुप्ता यांनी वेर्णा पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सोमवार
तळेबांध तळ्यात बुडून बाणावलीत चिमुकल्याचा मृत्यू
बाणावली येथील तळेबांध तळ्यात बुडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. घराबाहेरील परिसरात खेळत असताना हे दीड वर्षीय बालक अचानक तळ्यातील पाण्यात पडला होता.
माजी मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांना दिलासा
गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (जीसीझेडएमए) राज्याचे माजी मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांना दिलासा दिला आहे. गोयल यांचे हळदोणे येथील बांधकाम सीआरझेड क्षेत्रात येत नाही. त्यामुळे ही बाब प्राधिकरणाच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. याबाबत ट्रोजन डिमेलो यांनी तक्रार दाखल केली होती.

भुईपाल येथील गवताच्या गंजीला आग लागून ८० हजारांचे नुकसान
भेडशीवाडा-भुईपाल येथील विठो भागो झोरे यांच्या गवताच्या गंजीला आग लागून सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. यामुळे सुमारे ७० हजार रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश आले.
मंगळवार
वागातोर-हणजूण येथे तीन क्लबना सील
अग्निशमन दलाचा अग्निसुरक्षेशी निगडित ‘ना हरकत’ दाखला आणि बांधकामाला आवश्यक असलेली ‘स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी’ (संरचनात्मक स्थिरता) नसल्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बार्देश तालुक्यातील तीन आस्थापने बंद करण्यात आली आहेत. समितीने वागातोर - हणजूण येथील ‘क्लारा’, ‘सालुद’ आणि ‘मयान’ या तीन क्लबना टाळे ठोकले.

लुथरा बंधू गोवा पोलिसांच्या ताब्यात
साकवाडी, हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लब आग दुर्घटनेतील मुख्य संशयित आणि क्लबचे मालक सौरभ लुथरा व गौरव लुथरा यांचे थायलंडने भारताला प्रत्यार्पण केले. नवी दिल्ली विमानतळावर ते उतरताच गोवा पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला.
बुधवार

सौरभ, गौरव लुथरांना पाच दिवसांची कोठडी
साकवाडी, हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लबमधील अग्नितांडव प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी तथा क्लबचे मालक गौरव लुथरा व सौरभ लुथरा यांना वैद्यकीय कारणामुळे पोलीस कोठडी न देण्याची त्यांच्या वकिलांची मागणी म्हापसा न्यायालयाने फेटाळून लावली. दोघांनाही आता पाच दिवस पोलीस कोठडीत रहावे लागणार आहे.
दारूच्या नशेत आईच्या खूनप्रकरणी पुत्र सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दोषी
मेरशी येथे २०१९ मध्ये रागाच्या भरात आणि दारूच्या नशेत आई लक्ष्मीबाई (६९) हिला मारहाण करण्यात आली होती. त्यात तिचे निधन झाले होते. या प्रकरणी मेरशी येथील सत्र न्यायालयाने पुत्र संदीप वेर्लेकर याला सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दोषी ठरविले आहे.
दक्षिण गोव्यातील आठ बेकायदा भंगारअड्डे बंद
भंगारअड्ड्यांना आग लागण्याचे प्रकार वाढलेले असल्याने दक्षिण गोव्यातील भंगारअड्ड्यांची पडताळणी सुरू करण्यात आली. केपे परिसरातील आठ बेकायदेशीरपणे सुरू असलेले भंगारअड्डे केपे उपजिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सील करण्यात आले.
अपहरण करून महिलेवर बलात्कार
एका ३७ वर्षीय महिलेवर बळजबरी करून बलात्कार केल्याचा गुन्हा वाळपई पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला आहे. वाळपई पोलिसांनी या प्रकरणी विठ्ठल झोरे (रा. अनसोळे) याला अटक केली असून त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
गुरुवार
जोविता पिंटोच्या सुटकेबाबत फेरनिर्णय घेण्याचे न्यायालयाचे आदेश
वास्को येथील डीजे मंदार सुर्लकर खून प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी जोविता रायन पिंटो याच्या सुटकेबाबत गोवा स्थित मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला. राज्य सरकारचा त्याला मुदतीपूर्वी न सोडण्याचा आदेश रद्द करत, मंदारच्या वडिलांच्या आक्षेपाचा विचार करून नव्याने निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
अजय गुप्ताला ४ दिवसांची पोलीस कोठडी
हडफडे येथील बर्च क्लब आग दुर्घटना प्रकरणी क्लबचा सहमालक संशयित आरोपी अजय गुप्ता याला म्हापसा न्यायालयाने अतिरिक्त ४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. तर इतर चार संशयितांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यातील तीन संशयितांच्या जामीन अर्जावर २२ डिसेंबर रोजी निवाडा होणार आहे.
७ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस सुवर्ण पदक
पोलीस खात्यात सर्वोत्तम कामगिरी बजावल्यामुळे ७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री पोलीस सुवर्ण पदक जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय दोन गृहरक्षक आणि दोघांना नागरी संरक्षण मुख्यमंत्री पदक जाहीर करण्यात आले आहे.
शुक्रवार
हणजूण समुद्रकिनाऱ्यावरील ‘कर्लिस’ रेस्टॉरंट सील
हणजूण समुद्रकिनाऱ्यावरील वादग्रस्त ठरलेले कर्लिस रेस्टॉरंट सील करण्यात आले. गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (जीसीझेडएमए) बार्देश मामलेदार कार्यालयाच्या साहाय्याने आणि पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली.
एल्विस गोम्स यांना कारणे दाखवा नोटीस
पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत काँग्रेस पक्षाने एल्विस गोम्स यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला. हळदोणे मतदारसंघात जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध काम करून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने काँग्रेसने गोम्स यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
शनिवार

जिल्हा पंचायत निवडणूक शांततेत
जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीसाठी शनिवारी पंचायत क्षेत्रात मतदान झाले. सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. राज्यातील ५० मतदारसंघांत निवडणूक पार पडली.
कळंगुट ठरले उत्कृष्ट पोलीस स्थानक
गोव्यातील यंदाचा उत्कृष्ट पोलीस स्थानकाचा किताब कळंगुट पोलीस स्थानकाला मिळाला. तर दुसरे आणि तिसरे स्थान मायना कुडतरी व पणजी पोलीस स्थानकाला मिळाले.
सुरेंद्र खोसलाला पकडण्यासाठी इंटपोलची मदत घेणार
हडफडे आग प्रकरणातील मुख्य संशयित आणि ज्या मालमत्तेवर हे अनधिकृत बांधकाम उभे होते, त्या जागेचा कथित मालक सुरेंद्र कुमार खोसला याच्याविरोधात पोलिसांनी आता 'इंटरपोल'मार्फत 'ब्ल्यू कॉर्नर नोटीस' जारी करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली आहे.
लक्षवेधी
स्वच्छ सर्वेक्षण अहवालात राज्यातील १४ पालिकांची स्वच्छतेच्या निकषांवर पाहणी करून ही क्रमवारी जाहीर केली. यामध्ये पणजी महानगरपालिका पहिल्या, साखळी नगरपालिका दुसऱ्या, तर मुरगाव नगरपालिका तिसऱ्या क्रमांकावर राहिली. याउलट सांगे नगरपालिका अखेरच्या क्रमांकावर फेकली गेली.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जमीन हडप प्रकरणी करंझाळे येथील मॉडेल्स कन्स्ट्रक्शन्सच्या मालकाच्या घरासह सांतिनेझ येथील कार्यालयावर छापा टाकला होता. त्यावेळी ईडीने मॉडेल्स कंपनीने दुबईत गुंतवणूक केलेल्या आणि ‘मॉडेल्स मिस्टिक’ प्रकल्पाच्या दुकाने आणि फ्लॅटचे विक्री कागदपत्र मिळून ५५ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे दस्तावेज जप्त केले.
हडफडे-नागवा सरपंच रोशन रेडकर आणि तत्कालिन पंचायत सचिव रघुवीर बागकर यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी येत्या २३ डिसेंबरपर्यंत म्हापसा अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने तहकूब केली.
चिकोळणाच्या माळरानावरील वाळलेल्या गवताला आग लागली. वाऱ्यामुळे आग झपाट्याने पसरू लागल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना धावपळ करावी लागली. सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर ती आग आटोक्यात आणली गेली.