'इंटरपोल'ची मदत घेणार

पणजी: हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' या नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीच्या प्रकरणानंतर गोवा पोलिसांनी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर तपासाची चक्रे फिरवली आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित आणि ज्या मालमत्तेवर हे अनधिकृत बांधकाम उभे होते, त्या जागेचा कथित मालक सुरेंद्र कुमार खोसला याच्याविरोधात पोलिसांनी आता 'इंटरपोल'मार्फत (INTERPOL) 'ब्ल्यू कॉर्नर नोटीस' (Blue Corner Notice) जारी करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली आहे.

सुरेंद्र कुमार खोसला हा ब्रिटीश नागरिक असून, या भीषण दुर्घटनेनंतर तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो सध्या परदेशात असण्याची दाट शक्यता असल्याने त्याचा नेमका ठावठिकाणा शोधणे आणि तपासासाठी त्यांची उपस्थिती निश्चित करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. याच पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून इंटरपोलशी संपर्क साधला आहे. ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी झाल्यामुळे खोसला यांच्याबद्दलची महत्त्वाची माहिती आणि त्यांचे जागतिक स्तरावरील लोकेशन मिळवणे पोलिसांना शक्य होणार आहे.

तपासादरम्यान असे समोर आले आहे की, ज्या जागेवर हा आलिशान नाईट क्लब कार्यरत होता, ते बांधकाम पूर्णपणे अनधिकृत होते. या अनधिकृत वास्तूत अग्निसुरक्षेचे कोणतेही निकष पाळले गेले नसल्यामुळेच आगीच्या दुर्घटनेने रौद्र रूप धारण केले होते. या प्रकरणात आतापर्यंत अनेक जणांची चौकशी करण्यात आली असली, तरी मालमत्तेचा कथित मालक असलेल्या खोसला याची चौकशी तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्याला भारतात आणण्यासाठी आणि कायद्याच्या कचाट्यात उभे करण्यासाठी पोलीस सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब करत आहेत.