द. आफ्रिकेविरुद्ध भारताचा मालिका विजय

पाचव्या टी-२० सामन्यात ३० धावांनी विजय : तिलक, पांड्याचे अर्धशतक, वरुणचे ४ बळी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
40 mins ago
द. आफ्रिकेविरुद्ध भारताचा मालिका विजय

अहमदाबाद : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचव्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ गडी गमावून तब्बल २३१ धावा केल्या असून दक्षिण आफ्रिकेसमोर २३२ धावांचे आव्हान होते. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिका २० षटकांत ८ बाद २०१ धावाच करू शकला. भारताने हा सामना ३० धावांनी जिंकून मालिका ३-१ ने खिशात घातली.
नाणेफेक दक्षिण आफ्रिकेने जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय फलंदाजांनी आफ्रिकेचा हा निर्णय चुकीचा ठरवत ५ बाद २३१ अशी विशाल धावसंख्या उभारली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेकडून यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने ३५ चेंडूत ६५ धावा करताना ९ चौकार आणि ३ षटकार ठोकले. त्याचा स्ट्राईक रेट १८५.७१ इतका प्रभावी होता. मात्र, जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला.
डी कॉकनंतर दक्षिण आफ्रिकेच्या मधल्या फळीला अपेक्षित योगदान देता आले नाही. रीझा हेंड्रिक्सने १२ चेंडूत १३ धावा, डेवाल्ड ब्रेव्हिसने १७ चेंडूत ३१ धावा, डेव्हिड मिलरने १४ चेंडूत १८ धावा केल्या इतर कोणतेही फलंदाज भारतीय गोलंदाजी समोर टीकाव धरू शकले नाही.
भारतीय गोलंदाजांनी टप्प्याटप्प्याने विकेट घेत दक्षिण आफ्रिकेचा डाव रोखला. भारतातर्फे वरुण चक्रवर्तीने ५३ धावांत ४ गडी बाद केले. जसप्रीत बुमराहने २ तर हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रथम फलंदाजी करताना तिलक वर्माने या सामन्यात अत्यंत आक्रमक पवित्रा घेत ४२ चेंडूत ७३ धावा केल्या. या खेळीत त्याने १० चौकार आणि १ षटकार ठोकत १७३.८१ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याने केवळ ३० चेंडूत अर्धशतक पूर्ण करत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर जबरदस्त दबाव निर्माण केला. शेवटच्या षटकात धावचीत होऊन तो बाद झाला, पण तोपर्यंत भारतीय संघाला भक्कम स्थितीत पोहोचवून गेला.
तिलक वर्माने डावात महत्त्वाच्या भागीदाऱ्या रचल्या. संजू सॅमसनसोबत ३४ धावा, सूर्यकुमार यादवसोबत १८ धावा, हार्दिक पांड्यासोबत १०५ धावांची निर्णायक भागीदारी, शिवम दुबेसोबत ७ धावांची भागिदारी केली. विशेषतः हार्दिक पांड्यासोबतची शतकी भागीदारी ही भारताच्या मोठ्या धावसंख्येची किल्ली ठरली.
टी-२० कारकिर्दीतील आणखी एक टप्पा
या अर्धशतकासह तिलक वर्माने टी-२० क्रिकेटमधील सहावे अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत ६ अर्धशतके आणि २ शतके आहेत. २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या तिलकने आतापर्यंत ४० सामन्यांत ३७ डावांमध्ये ११८२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सरासरी ४९.२५ आणि स्टाईक रेट १४३.९७ आहे.
प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेल्या संजूने या सामन्यात केवळ ३७ धावांची खेळी केली, तरीही त्याने टी-२० क्रिकेटमधील दोन मोठे टप्पे पार करत दिग्गजांच्या यादीत प्रवेश केला आहे.
पांड्याचा विक्रम
हार्दिक पांड्याने येताच पहिल्या चेंडूवर दणदणीत षटकार खेचला व आपले मनसुबे सिद्ध केले. त्यानंतर हार्दिक पांड्याने फिरकीपटू जॉर्ज लिंडेची चांगलीच धुलाई केली. १४ व्या षटकात हार्दिक पांड्या व तिलक वर्माने तब्बल २६ धावा कुटल्या. पहिल्या चेंडूवर तिलकने षटकार खेचत या षटकाला सुरूवात केली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने हार्दिकला स्ट्राईक दिली. यानंतर हार्दिकने २ चौकार व २ षटकारांसह पुढच्या चार चेंडूंवर त्याची धुलाई केली.
हार्दिक पांड्याची वादळी फटकेबाजी पाहून सर्वच जण अवाक् झाले होते. त्याने अवघ्या ७ चेंडूंत ३१ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने ४ चौकार व ५ षटाकारांसह १६ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. हार्दिक पांड्या हा भारताकडून दुसरे सर्वात जलद अर्धशतक करणारा खेळाडू ठरला. हार्दिकच्या आधी युवराज सिंगने १२ चेंडूंत टी-२० मध्ये अर्धशतक केले आहे. हार्दिक पांड्याची वादळी फटकेबाजी पाहून त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्माही आनंदाने टाळ्या वाजवत त्याचे कौतुक करताना दिसली. त्यानंतर अर्धशतक झाल्यानंतर हार्दिकने फ्लाईंग किस देत सेलिब्रेशन केले. यानंतर २०व्या षटकात हार्दिक पांड्या झेलबाद झाला. हार्दिक २ चेंडूत ५ चौकार व ५ षटकारांसह ६३ धावा करत बाद झाला.
८००० धावांचा टप्पा पार करणारा सातवा भारतीय
संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २२ चेंडूंत ३७ धावांची खेळी करताच टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या ८००० धावा पूर्ण केल्या. असा पराक्रम करणारा तो केवळ सातवा भारतीय खेळाडू ठरला आहे. संजूच्या आधी रोहित शर्मा, विराट कोहली, शिखर धवन, सूर्यकुमार यादव, सुरेश रैना आणि केएल राहुल यांनीच हा टप्पा गाठला होता. संजूने आतापर्यंत ३२० टी-२० सामन्यांत ३०.०८ च्या सरासरीने ८०३३ धावा केल्या असून, यामध्ये ६ शतके आणि ५१ अर्धशतकांचा समावेश आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण
भारतासाठी खेळतानाही संजूने एक मैलाचा दगड गाठला आहे. आपल्या ५२ व्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात त्याने १००० धावांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा १४ वा फलंदाज ठरला आहे. संजूच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १०३२ धावा जमा असून यात ३ शतके आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे.
टी-२० मध्ये सर्वाधिक वेळा २०० पेक्षा अधिक धावा करणारे संघ
भारत : ४३ वेळा
सोमरसेट : ४० वेळा
चेन्नई सुपर किंग्स : ३८ वेळा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : ३७ वेळा
यॉर्कशायर : ३६ वेळा