हिवाळ्यातील भटकंती आणि मक्याचा आस्वाद: आरोग्यासाठी काही खास टिप्स

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
3 hours ago
हिवाळ्यातील भटकंती आणि मक्याचा आस्वाद: आरोग्यासाठी काही खास टिप्स

लवकरच नाताळाची सुट्टी सुरू होणार आहे. सुट्टीत अनेकांनी आपल्या कुटुंबासोबत वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचा बेत देखील आखून ठेवला असेल. वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेट देऊन तिथले वातावरण, इतिहास आणि खाद्यपदार्थांचा अनुभव घेण्यात वेगळीच मजा येते.

हिवाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी प्रवास करत असताना गरमागरम भाजलेला मका खाण्याची मजा काही औरच असते! मका चविष्ट तर आहेच, पण तो आपल्या शरीरासाठी उपयुक्तही आहे. छान पिवळेधम्मक, टपोरे दाणे असणारे मक्याचे कणीस काहींना भाजून खायला आवडते, तर काहींना उकडून खायला आवडते. 'स्वीट कॉर्न' हा मक्याचा प्रकार तर सगळ्यांना जास्त आवडतो, कारण हे कणीस चवीला गोड आणि चविष्ट लागते.

चित्रपटगृहात चित्रपट बघण्यासाठी जाताना सोबत पॉपकॉर्न घेऊन खाण्याची तर आपल्याला सवयच झाली आहे. मक्याचा खमंग चिवडा, वाफवलेले मक्याचे दाणे, त्यात बारीक चिरलेला कांदा, सैंधव मीठ, थोडेसे लोणी, चाट मसाला आणि ओली कोथिंबीर घालून व लिंबू पिळून केलेले चटपटीत चाट तर तुमच्यासारख्या मुलांना अतिशय प्रिय असते.

वेगवेगळ्या पद्धतीने मक्याचे सेवन करताना आरोग्याच्या बाबतीत पुढील काही गोष्टी लक्षात ठेवा:

१. भाजलेला मका शरीरातील कोरडेपणा वाढवतो आणि जास्त प्रमाणात खाल्ल्यास शीला त्रास होऊ शकतो. म्हणून मका चांगला भाजून त्यावर लोणी किंवा तूप लावावे. त्यावर थोडं लिंबू आणि सैंधव मीठ लावून खाल्ल्यास चव तर वाढतेच, शिवाय कोरडेपणा वाढत नाही आणि पोट साफ होण्यास मदत होते [शी होताना त्रास नाही होत].

२. उघड्यावर मिळणारे उकडलेले स्वीट कॉर्न आणि कॉर्न चाट टाळावे. उघड्यावर विकल्या जाणाऱ्या पदार्थांवर माश्या व इतर जंतू बसतात. असे पदार्थ बनवताना स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही; कधी कधी खराब कणीस असेल तर तेही त्यात वापरले जाते. आणि मग जर आपण असे पदार्थ खाल्ले तर पोट बिघडते आणि उलट्या, जुलाब सुरू होतात. म्हणून जत्रेच्या, फेस्ताच्या फेरीत किंवा खाऊ गल्लीत असे पदार्थ शक्यतो खाऊ नयेत.

३. पंजाबमध्ये मक्याच्या पिठाची रोटी केली जाते. थंडीच्या दिवसात 'मक्की दी रोटी' आणि 'सरसों का साग' म्हणजेच मोहरीच्या पाल्याची भाजी असा आहार असतो. मक्याच्या पिठाची रोटी किंवा भाकरी तुम्ही आई किंवा आजीला हिवाळ्यात करून द्यायला सांगू शकता.

४. मक्याचा चिवडा सुद्धा करून खाऊ शकता, पण बाजारात मिळणारा चिवडा आणून खात असाल तर तो तयार करण्यासाठी वापरले जाणारे तेल चांगले आहे याची खात्री करून घ्या.

५. मक्याचे कॉर्न फ्लेक्स बाजारात उपलब्ध असतात. काहींना सकाळी नाश्त्यासाठी हे फ्लेक्स दुधात घालून खायला आवडतात. पण यामध्ये परिरक्षके असल्यामुळे ते रोज खाणे आरोग्यासाठी चांगले नसते. शिवाय यामध्ये वेगवेगळे वाळवलेले फळांचे तुकडे देखील असतात. दूध आणि फळे एकत्र खाऊ नये हे तुम्हाला माहित आहेच. त्यामुळे हे मक्याचे पदार्थ खाणे टाळा.

घरीच केलेले मक्याचे वेगवेगळे पदार्थ खा. बाहेर फिरायला जाताना काही खाणार असाल तर स्वच्छतेची काळजी घ्या आणि हिवाळ्यातील सुट्टीचा आनंद घ्या.


- वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य