बालपणीच्या एका अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाचा आणि अनपेक्षितपणे मिळालेल्या जखमेचा शोध घेणारी ही एक संवेदनशील कथा आहे. वर्तमानात स्वतःला सिद्ध करून बालपणातील तो हरवलेला आनंद मिळवणाऱ्या 'शोभा'चा हा प्रवास आहे.

मोबाईलच्या मेसेजची टोन वाजली. त्या क्षणी शोभा आपल्या कामात पूर्णपणे गुंतलेली होती. हातातले काम संपेपर्यंत तिने मोबाईलकडे लक्ष दिले नाही. काम पूर्ण झाल्यावर तिने मोबाईल उचलला आणि स्क्रीनवर नजर टाकली. तेवढ्यात तिला मुलाच्या शाळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आलेला एक मेसेज दिसला.
मेसेज असा होता - शाळेच्या येऊ घातलेल्या समारंभासाठी पालकांना त्या समारंभाच्या अनुरूप गाणे किंवा नाट्य सादर करता येईल.
तो मेसेज वाचताच शोभा क्षणभर थबकली. हातातला मोबाईल तसाच राहिला. ती नकळत आठवणींच्या प्रवाहात वाहू लागली. बालपणाच्या आठवणी गोड, कडू, सुखद, वेदनादायी - अशा सगळ्यांचाच एक साचा असतो. त्या साच्यात आपला भूतकाळ रंगलेला असतो. काही आठवणी हसवतात, काही डोळ्यांत पाणी आणतात, तर काही मनाच्या खोल कोपऱ्यात कायमचे घर करून बसतात.
सगळंच कायम लक्षात राहत नाही, पण काही आठवणी अशा असतात ज्या बालमनावर खोल घाव करतात, तर काही मन फुलवून जातात. अशा आठवणी वेळ कितीही गेला तरी पुसल्या जात नाहीत. त्या कधी अचानक डोळ्यासमोर उभ्या राहतात आणि वर्तमान क्षणभर विसरायला लावतात. अशीच एक आठवण शोभाच्या मनात पुन्हा जागी झाली.
शोभा शाळेत नवीन होती. तिसरीत शिकत होती. नवीन वर्ग, नवीन मुले, नवीन शिक्षक - सगळंच तिच्यासाठी नवीन होतं. त्या वर्षी देशभक्तीपर गीत सादर करण्यासाठी तिच्या वर्गाची निवड झाली होती. हे ऐकताच शोभाला खूप आनंद झाला होता. ते गाणे तिला फारच आकर्षक वाटायचे. शिक्षिकेने गाण्याचे नाव सांगितले आणि वर्गात ते गाणे शिकवायला सुरुवात केली. शोभाचा आवाज मधुर आणि स्पष्ट होता. ती मन लावून गात होती. वर्गशिक्षिकेला ते लगेच जाणवले. तिने शोभाचे कौतुक केले आणि "तुझा आवाज छान आहे" असे म्हणून तिला त्या दिवशी अगदी पुढच्या रांगेत माईकच्या जवळ उभे केले. शोभा अक्षरशः आनंदात हरखून गेली. तो आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
शाळा सुटल्यापासूनच बाबा कधी भेटतात, याची ती आतुरतेने वाट पाहत होती. घरी गेल्यावर ती घरभर फिरत आई-बाबांना सगळं सांगत होती. आपण गाणे सादर करणार आहोत, आपण माईकजवळ उभे राहणार आहोत, हे सांगताना तिचा उत्साह ओसंडून वाहत होता. बोबड्या बोलात बोलणाऱ्या भावालाही ती गाणे गाऊन दाखवत होती. त्यालाही अर्धे गाणे पाठ झाले होते.
.सादरीकरणाचा दिवस उजाडला. तेव्हा व्हॉट्सअॅप, मेसेज असं काही नव्हतं. शाळेचे एक कॅलेंडर असायचं. त्यावर शिक्षक नोट लिहून पाठवायचे. त्या दिवशी वेशभूषेबाबतची सूचना आली होती – “स्टुडन्ट शुड वेअर, कलरफुल आउटफिट” (विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी कपडे परिधान करावेत).
आईने ते वाचून शोभाला सांगितले. त्या सकाळी आईने तिला काकांच्या लग्नात घातलेले कपडे काढले. घागरा, खणाच्या कापडाचा शिवलेला ब्लाऊज, ओढणी आणि कपाळावर छोटीशी टिकली. शोभा त्या वेषात खूपच छान दिसत होती. शाळेच्या दारात पोहोचताच वर्गशिक्षिका तिथे नव्हत्या. एका मुलीने शोभाकडे पाहून हसल्याचे तिला जाणवले, पण ती का हसली हे तिला कळलेच नाही. त्या हसण्यात काहीतरी वेगळंच होतं, पण ते ओळखण्याइतकी ती तेव्हा मोठी नव्हती.
शोभा एकटीच अशा पेहरावात होती. बाकी सगळी मुले जीन्स-टीशर्ट घालून आली होती. कार्यक्रम सुरू झाला. सूत्रसंचालन करणाऱ्या शिक्षिकेने गाण्याची घोषणा केली. वर्गशिक्षिकेने तिला दिलेल्या जागी उभे राहायला सांगितले. तेवढ्यात अचानक वर्गशिक्षिका आल्या. त्या शोभाकडे पाहून म्हणाल्या, “नॉट हियर, गो बिहाइंड!” (येथे नको, मागे जा!) आणि शोभाला अगदी मागच्या बाजूला, जिथून ती दिसणार नाही, अशा ठिकाणी उभे केले. माईक तिच्यापासून दूर गेला. मनात काहीतरी तुटल्यासारखे वाटले. वाईट वाटले... खूप वाईट! पण असे का केले, काय चुकले, हे तिला कळलेच नाही.
तो दिवस आणि आजचा दिवस. शोभा पुन्हा वर्तमानात आली. मनात विचारांची गर्दी होती. मी गाऊ का? खरंच मला ते जमेल का? तरीसुद्धा तिने आपले नाव नोंदवले. मुलाच्या शाळेतून दोनदा फोन आला, "मॅडम, तुम्ही थीमनुसारच सादरीकरण करायला हवे." शोभा प्रत्येक वेळी 'ओके' म्हणत होती, पण मनातल्या शंका वाढत होत्या. यांना वाटतेय का की मला हे जमणार नाही?
तिने मेसेज टाईप केला - 'प्रार्थना गीत'. खाली लिहिले - 'थीमनुसारच असेल'. पण गाण्याची शैली तिला आपल्या पद्धतीची हवी होती. मुलाच्या शाळेच्या कार्यक्रमाचा दिवस आला. शोभाला स्टेजवर बोलावण्यात आले. आज ती एक आई म्हणून उभी राहिली होती, पण आत कुठेतरी ती तिसरीच्या वर्गातली शोभाही होती. आज तिला "मागे जा" म्हणणारे कोणीच नव्हते.
ती गायली. मनापासून गायली. टाळ्यांच्या आवाजात तिने आपले तिसरीतले हरवलेले गाण्याचे सुख शोधले. चेहऱ्यावरचे हसू तिच्या प्रफुल्लित मनातून उमललेले होते.

- स्नेहा बाबी मळीक