मुलाच्या शैक्षणिक अपयशामागचे खरे कारण समजल्यावर एका कुटुंबाचा संघर्ष कसा संपला, याचे हृदयस्पर्शी चित्रण. बौद्धिक अक्षमतेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज अधोरेखित करणारा लेख.

अाज काका शांत होते. त्यांची चीडचीड कमी झाली होती. कुटुंबही थोडे तणावमुक्त दिसत होते. चेहऱ्यावरचे ते मोठे प्रश्नचिन्ह आता नाहीसे झाले होते; त्याच्या जागी समजूतदारपणा आला होता. “रोहन असा का आहे?” हे रहस्य आता त्यांना उलगडले होते.
काही महिन्यांपूर्वी जेव्हा काका पहिल्यांदा रोहनला घेऊन माझ्या क्लिनिकमध्ये आले, तेव्हा त्यांचा चेहरा रागाने आणि निराशेने लाल झाला होता. “तो असा का आहे डॉक्टर? अभ्यासच करत नाही. अहो, तो वाचतच नाही... वाचायला कंटाळा करतो. घरात सगळे व्यवस्थित आहे. आम्ही आयुष्यभर कष्ट उपसले आहेत, त्याला ते सहन करावे लागू नयेत. त्याने मोठे होऊन, शिकून चांगले जीवन जगावे,” असे ते उद्विग्न होऊन म्हणत होते. रोहनकडून त्यांची स्वप्ने पूर्ण होत नव्हती, म्हणून कुटुंबात सतत निराशा आणि तणाव होता. रोहनची धाकटी बहीण आणि इतर भावंडे हुशार होती; त्यामुळे त्यांची सतत तुलना होत असे आणि रोहनचे अपयश अधिकच जाचक वाटायचे.
रोहन सातव्या इयत्तेत शिकत होता. अभ्यासात तो वरचेवर मागे पडत चालला होता. दिवसाचा बराचसा वेळ तो पुस्तकांसमोर घालवायचा; तरीही अपेक्षित गुण त्याला मिळत नव्हते. रोहनचे वडील शेतकरी होते. आई बालवाडीत शिकवायला होती, पण मुलांकडे लक्ष देता यावे म्हणून तिने गृहिणीची जबाबदारी स्वीकारली होती. रोहनची धाकटी बहीण पाचवीत होती. ती नेहमी वर्गात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होत असे आणि त्यामुळे रोहनचे अपयश अधिकच ठळकपणे जाणवायचे.
आई-बाबांची मनोमन इच्छा होती की आपल्या मुलाने चांगले शिक्षण घेऊन मोठे नाव कमावावे. त्यासाठी ते धडपड करत असत. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ते रोहनला विविध औषधे आणि टॉनिक्स द्यायचे. स्वतः वेळ काढून त्याचा अभ्यास घ्यायचे. पोटाला चिमटा काढून त्यांनी त्याचे ट्युशन क्लासेस लावले होते. तरीही शिक्षकांची तक्रार हीच असे की, कितीही समजावून सांगितले तरी रोहनच्या लक्षात राहात नाही.
शाळेत इतर मुले झटपट उत्तरे देऊन वाहवा मिळवायची. रोहनला मात्र उत्तर द्यायला वेळ लागायचा किंवा यायचेच नाही; त्यामुळे शिक्षकांचे बोलणे आणि शिक्षेची त्याला सवय झाली होती. रोहनवर कुटुंबाच्या अपेक्षांचे प्रचंड ओझे होते. तो आपल्या परीने सतत प्रयत्न करायचा, पण “आपण इतरांपेक्षा कमी आहोत” ही न्यूनगंडाची भावना त्याच्या मनात घर करून राहिली होती. त्यामुळे तो मित्रांपासून दूर राहू लागला. त्याची खेळातील आवड कमी झाली. त्याचे बाबा मात्र नेहमी आईला दोष देत असत की, तू रोहनकडे नीट लक्ष देत नाहीस.
यामुळे रोहन चिडचिडा आणि एकाकी पडत चालला होता. सर्वांना हा बदल जाणवत होता. तो अभ्यासाला बसायचा, पण पुस्तकाकडे त्याचे लक्ष लागायचे नाही. शेवटी या सर्वांमुळे त्यांनी मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घ्यायचे ठरवले. मी सुद्धा त्यांना तसा सल्ला दिला होता.
रोहन लहानपणापासूनच अभ्यासात थोडा कच्चा होता. पाचवीपर्यंत तो साधारण ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होत होता (आता अ, ब, क, ड अशा श्रेणी असतात). सहावीत मात्र त्याचे गुण ४० टक्क्यांवर घसरले आणि सातवीत तर परिस्थिती आणखी खालावली. सर्वांशी सविस्तर बोलल्यावर डॉक्टरांच्या लक्षात आले की, हा स्मरणशक्तीचा किंवा प्रयत्नांचा प्रश्न नाही. त्यांनी त्याची बुद्धिमत्ता चाचणी (IQ Test) घेतली. निकाल आला – बुद्ध्यंक ६८. रोहन अल्प मतिमंदत्वाचा (Mild Intellectual Disability) शिकार होता.
ग्रामीण भागातील असल्यामुळे आई-बाबांना हा फार मोठा धक्का होता. आपला मुलगा मतिमंद आहे, हे ते मान्यच करत नव्हते. त्यांनी रोहनला पदवीधर होऊन मोठे यश मिळवतानाची स्वप्ने पाहिली होती. पण चाचणीचा निकाल स्पष्ट होता; त्याच्यात तेवढी क्षमता नव्हती. क्षमता नसताना अपेक्षा लादल्यामुळे रोहनच्या स्वभावात नकारात्मक बदल होत होते. पण आज त्यांना हे वास्तव
समजले होते.
मतिमंदत्व ही जन्मजात किंवा विकासकाळातील स्थिती आहे. गर्भावस्थेत, प्रसूतीवेळी किंवा जन्मानंतर मेंदूला झालेली इजा, गुणसूत्रांमधील दोष, संसर्ग, प्रसूतीतील गुंतागुंतीमुळे मेंदूला ऑक्सिजन कमी पडणे – अशा अनेक कारणांमुळे ही स्थिती उद्भवते आणि त्याची तीव्रता कमी-अधिक असू शकते.
सामान्य व्यक्तीचा बुद्ध्यंक ८५ ते ११० दरम्यान असतो. ११० पेक्षा जास्त म्हणजे उत्कृष्ट बुद्धिमत्ता. ७० पेक्षा कमी असल्यास त्याला 'बौद्धिक अक्षमता' किंवा 'मतिमंदत्व' मानले जाते. त्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे:
५५–७० : कमी स्वरूपाचे (Mild)
३५–५४ : मध्यम स्वरूपाचे (Moderate)
२०–३४ : तीव्र स्वरूपाचे (Severe)
२० पेक्षा कमी : अति तीव्र स्वरूपाचे (Profound)
७१ ते ८४ बुद्ध्यंक असलेली मुले मतिमंद नसतात, पण पूर्णतः सामान्यही नसतात. यांना 'बॉर्डरलाइन इंटलेक्चुअल फंक्शनिंग' म्हणतात. मराठीत 'गतिमंद' (Slow Learner). ही मुले पदवीपर्यंत शिक्षण घेऊ शकतात, सामान्य शाळेत शिकू शकतात, पण त्यांची शिकण्याची गती कमी असते. त्यांना अधिक लक्ष आणि मार्गदर्शनाची गरज असते.
अल्प स्वरूपाच्या मतिमंद मुलांना आपल्या शिक्षणव्यवस्थेत आठवी-नववीपर्यंत शिकता येते. पण इयत्ता वाढल्यावर अभ्यासक्रमाची व्याप्ती आणि काठिण्यपातळी वाढते. त्यामुळे त्यांची शैक्षणिक गुणवत्ता घसरते आणि ते मागे पडतात. रोहनला पाचवीपर्यंत सरासरी गुण मिळायचे, पण सहावी-सातवीत अभ्यासक्रम त्याच्या क्षमतेच्या पलीकडे गेल्यामुळे तो त्याला समजेनासा झाला.
मध्यम स्वरूपाच्या (Moderate) मुलांना फार तर पहिली-दुसरीपर्यंतचे शिक्षण शक्य होते. ही मुले 'औपचारिक शिक्षणास अपात्र' (Not Educable) मानली जातात, पण ती 'प्रशिक्षणास पात्र' (Trainable) असतात. ज्या कामात बुद्धीचा वापर कमी लागतो, अशी कौशल्ये त्यांना शिकवता येतात – उदा. शेती, घरकाम, स्वयंपाक किंवा साधी पॅकिंग अशी व्यावसायिक कौशल्ये.
तीव्र आणि अति तीव्र स्वरूपातील मुले इतरांवर अधिक अवलंबून असतात आणि त्यांची देखभाल करणे ही एक मोठी जबाबदारी असते.
परिस्थितीची समजूत आणि त्यानुसार आपल्या विचारांमधील बदल हेच अशा स्थितीला सामोरे जाण्याचे पहिले पाऊल असते. रोहनच्या कुटुंबाला आज ती समज मिळाली होती आणि त्यामुळेच आज काका शांत होते.

- डॉ. अनिकेत मयेकर