नवी मैत्री

Story: छान छान गोष्ट |
20th December, 10:33 pm
नवी मैत्री

​उन्हाळी सुट्टी संपल्यानंतरचा शाळेचा पहिला दिवस होता. सगळी मुलं सुट्टी संपल्यावर शाळेत जायला लागलं म्हणून जराशी उदास होती. अशातच ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळेच्या चौथीच्या वर्गात गडबडगोंधळ सुरू होता. कुणी वहीला कव्हर घालत होतं, तर कुणी नवीन पेन्सिली दाखवत होते, तर काही जण बाकावर बसून गप्पा मारत होते. त्यातच वर्गाच्या दारातून एक नवीन मुलगी आत आली. नवीन वर्ग नवीन शाळा यामुळे ती जराशी गोंधळलेली होती. तिचं नाव होतं स्वरा.

"टीचर, ही नवी विद्यार्थीनी आहे," शाळेच्या मदतनिस शांतीमावशी म्हणाल्या.

"स्वरा, ये बस इथे. वर्गशिक्षिका सामंत टीचर म्हणाल्या.

"हो मॅडम," स्वरा हलक्या आवाजात म्हणाली.

  ती शेवटच्या बाकावर जाऊन बसली. बाकी मुली तिला बघून कुजबुजायला लागल्या.

"नवीन दिसतेय."

"कोणाच्या शेजारी बसेल बरं?"

"आपल्या गटात नको हं तिला!"

  स्वरा काही बोललं नाही. ती गप्प बसून वही उघडून चित्र काढू लागली.

    पुढचे दोन-तीन दिवस असेच गेले. सुट्टी झाली की मुली एकत्र डबे काढून खात, एकमेकींना कुरकुरे, लाडू वाटत, गप्पा मारत. स्वरा मात्र एकटीच खिडकीपाशी बसून आपला डबा खायची. तिला खूप वाईट वाटायचं.

  एकदा तिने धाडस करून सईजवळ जाऊन विचारलं,

"मी तुमच्यासोबत खेळायला येऊ का?"

सई थोडी संकोचली, पण तिच्या शेजारच्या जान्हवीने पटकन म्हटलं,

"नको नको, आमचा गट ठरलेला आहे. आधीपासूनच आम्ही पाचजणी खेळतो."

   स्वरा शांतपणे परत आपल्या बाकावर जाऊन बसली.

 "माझ्याशी कुणी का बरं मैत्री करत नाही," तिच्या मनात विचार आला.

असेच काही दिवस गेले. शाळा व अभ्यास,खेळ असं सगळं सुरू होतं. पण स्वरा मात्र एकटीच असायची.

   एके दिवशी दुपारच्या सुट्टीत सगळ्या मुली मैदानावर ‘लगोरी’ खेळायला गेल्या. खेळताना चेंडू जोरजोराने एकमेकांकडे ढकलत होत्या. स्वरा थोड्या अंतरावर उभी राहून त्यांचा खेळ बघत होती.

 अचानक चेंडू सईच्या हातावर आपटला.

"आई गं!" सई किंचाळली. तिच्या हाताला खरचटलं होतं आणि रक्त येत होतं.

  मुली घाबरून आजूबाजूला बघू लागल्या.

अन्विता म्हणाली, "अगं, पाणी कुठे मिळेल?"

मेघा म्हणाली, "मावशीला बोलवूया का?"

पण सगळ्या गोंधळून गेल्या होत्या.

   तेवढ्यात स्वरा धावत आली. तिने खिशातून स्वच्छ रुमाल काढला.

"थांब सई, मी रुमाल बांधते. रडू नकोस. थोड्याच वेळात थांबेल रक्त. आपण सामंत टीचरकडे जाऊ. त्या औषध लावतील.”

 हो जाऊया खूप दुखतंय मला आsssईsssगं, सई रडत रडत म्हणाली व स्वराबरोबर निघाली.

   हळूहळू रडणं थांबवून सई स्वराकडे बघू लागली.

"धन्यवाद, स्वरा. तू खूप मदत केलीस."

  बाकी मुलींच्या मनातही विचार आला. ही मुलगी खरंच किती छान आहे!

   दुसऱ्या दिवशी सकाळी सईनेच स्वराला म्हटलं,

"आज माझ्या शेजारी बसशील का?"

स्वरा आश्चर्याने म्हणाली, "मी? खरंच?"

"हो ग! तू खूप चांगली आहेस. काल मदत केलीस ना."

 ते ऐकून अन्विता हसली, "हो, आता तीही आपली मैत्रीण. आपल्या बरोबर खेळायला घेऊया."

जान्हवीने हात पुढे केला, "हाय स्वरा, आपण आता मैत्रिणी!"

स्वराच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.

    आता शाळेच्या जेवणाच्या सुट्टीत सगळ्याजणी मिळून एकत्र डबा खायला बसायच्या.

"माझ्या आईने पराठे दिलेत, घे ना! प्राची म्हणाली.

"अगं, माझ्या डब्यात आज गाजराचा हलवा आहे, मेघा म्हणाली.

स्वराही आईने केलेला लाडू, मक्याचा चिवडा, सगळ्यांना द्यायची.

  आता स्वराला शाळेत खेळताना खूप मजा येऊ लागली.

कधी मुली ‘लपाछपी’ खेळत, कधी ‘डब्बा ऐसपैस’, तर कधी दोरीवर उड्या मारत. स्वरा नेहमी आनंदाने सहभागी व्हायची. तिचं एकटं एकटं रहाणं बंद झालं होतं.

   एक दिवस सामंत टीचरनी कार्यानुभव घ्या तासाला गप्पा गोष्टी करत असताना विचारलं,"मुलांनो, खरी मैत्री कशी असते?"

सईने उठून सांगितलं,

"मॅडम, खरी मैत्री म्हणजे कोणीतरी अडचणीत असताना त्याला मदत करणं. जसं स्वरा माझ्या जखमेवर रुमाल बांधायला आली होती अगदी तसं!"

   सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. स्वरा खुद्कन हसली. आता ती एकटी नव्हती. तिच्याकडे पाच-सहा तिच्या जिवलग मैत्रिणी होत्या.

कथेचा बोध : नवीन मित्रमैत्रिणी मिळवायला फक्त खेळ आणि गप्पा नाही, तर मदतीची भावना, काळजी करणारा स्वभाव आणि चांगुलपणा लागतो. इतरांच्या अडचणीत पुढे सरसावणारा नेहमी सगळ्यांचा आवडता होतो.


- सौ. मंजिरी वाटवे

पर्वरी