फुलाफातर

गोव्याच्या सत्तरी तालुक्यातील 'तयडे' गावातील अनोखा शिगमोत्सव, निसर्गपूजा आणि 'फुला फातर' या गूढ विधीचे सखोल दर्शन घडवणारा हा एक सांस्कृतिक प्रवास असून, तो लोकपरंपरेची समृद्धता उलगडतो.

Story: लोकरंग |
20th December, 10:58 pm
फुलाफातर

तयडे गावात रात्रीच्या वेळी तेथील शिगमोत्सव अनुभवण्यासाठी आम्ही पोहोचलो, तेव्हा तेथील देवराईत ब्राह्मणी मायेच्या मंदिरासमोर पारंपरिक मांडाजवळ गावजेवण सुरू होते. बाराभूमीची श्रद्धाळू पावले या महानैवेद्याचा आस्वाद तृप्तीने घेत होती. वेळ पुढे वाढत चढत होती, परंतु खेळ सुरू करण्याची कोणतीच चिन्हे दिसत नव्हती. शेवटी विचारलेच, त्यावेळेस कळले की 'वाघ खेळ' तर पहाटेला होणार होता. सुरुवात 'फुला फातराने' होणार होती. रात्रीचे दहा वाजत आले तरी या 'करोल्या’च्या विधीची तयारी चालू होती. त्यानंतर दशावतारी नाटक, रणमाले आणि शेवटी समाप्ती 'वाघ खेळाने' असा तो क्रम होता.

आता करायचे काय? हा मोठाच पेच होता. एकतर निवासासाठी आम्ही कोणतीच सामग्री आणली नव्हती, घरीही आम्ही रात्री गावातच थांबणार असे सांगितले नव्हते. सोबत कोणतीही वस्तू नसतानाही एका रात्रीपुरते अभ्यासासाठी परिस्थितीशी जुळवून घेता येणार होते. पण घरी आम्ही दुसऱ्या दिवशी पोहोचणार हा निरोप कसा द्यायचा? हीच मोठी समस्या होती. काहीही होवो, ज्याच्यासाठी जीवाचा एवढा आटापिटा करून लांबपर्यंत प्रवास केला, तो असा वाया जाऊ द्यायचा नाही, हे मनात ठसवले आणि 'फुला फातर' विधी सुरू झाल्याची खुण ढोलवादानाने दिली.

हातात बेळांची पडली, त्यावर नारळ-फुलपानांनी सजविलेला कळस घेऊन, हिरवे कापड नेसून, त्याचबरोबर सुवासिनी स्त्रियांचे सर्व अलंकार परिधान करून एक 'दिंड्या' मुलगा (लग्न न झालेला तरुण मुलगा) स्त्रीवेशात मंदिरातून बाहेर येतो. त्याच्या बरोबरीने वादक मंडळी व इतर श्रद्धाळू माणसे असतात. त्याची मिरवणूक पारंपरिक मांडावर नेऊन तिथेच सामूहिक गाऱ्हाणे घालून, 'फुला फातर' या जंगलात असलेल्या जागेकडे सर्व जण रवाना होतात. सोबत दोन घोड्यांसाठी बेळांचे सांगाडे तयार असतात, तेही नेले जातात. संपूर्ण वाटेत घुमट-कासाळ्याचे वादन आणि लोकगीत गायन चालूच असते.

'फुला फातर'कडे चालत जाणाऱ्या त्या पंचवीस-तीस जणांच्या घोळक्यात महिला कोणीच नसतात. आम्ही त्यांच्याकडून त्यांच्या बरोबरीने जंगलात येण्याची परवानगी घेतली. ते म्हणाले, "दीड ते दोन किलोमीटरचा खडकाळ, दगड-धोंड्यांचा रस्ता आहे. आता रात्रीचे साडेअकरा वाजले आहेत, गावात परत येईपर्यंत मध्यरात्र उलटून जाईल." मी आणि शुभदाने म्हटले, "हरकत नाही." तो क्षण अपूर्व आनंदाचा आणि अविस्मरणीय असाच होता.

फोडीले नारळ आणि केली दोन वळी

ब्राह्मणी मायेचे घोडे सजयिले हो हो हो....

किर्र काळोखात मोबाईल बॅटरीच्या उजेडात 'फुला फातर'कडे चाललेली ती वारी होती. 'फुला फातर' ही एक जागा आहे. गुडूप अंधार असल्याने त्या परिसराचा अंदाज येत नव्हता, तरीही ती पाणथळ जागा, सभोवतालचे मोठमोठे वृक्ष, पात्रातील मोठाले काळे सुळसुळीत दगड, या सर्वच नैसर्गिक घटकांमुळे त्या जागेची सधनता सहजपणे लक्षात येत होती. तिथेच एकीकडे अशोकाच्या लाल फुलांच्या माळा करून अगोदरच ठेवल्या होत्या. 'करोल्यो' दगडावर हळद-कुंकू वाहून, फुलांची माळ वाहून पूजा करतो. गाऱ्हाणे घालतात, 'करोल्यो'ची ओवाळणी करतात. राहिलेल्या सर्व माळा तिथे जमलेल्या व्यक्तींच्या गळ्यात घातल्या जातात.

अशोक वृक्षाला स्थानिक भाषेत लोक ‘हुसगी’ असेही म्हणतात. त्या निबिड काळोखात एक मोठे हुसगीचे झाड उभे होते - सीता रावणाच्या तावडीत असताना तिचा शोक ज्या वृक्षाने ऐकला होता, तेच ते अशोकाचे झाड! लालबुंद फुलांनी ते बहरून आले होते. याच फुलांचा वापर तयडे गावात शिगमोत्सवात केला जातो. तेथीलच एका दगडाची पूजा करून, माळा गळ्यात घालून मागे न बघता परत गावात येण्याची वाट धरली जाते. वाटेत शेतीच्या माळावर घोड्यांचे सांगाडे ठेवलेले असतात. तिथेच वादन-गायनाच्या जल्लोषात घोड्यांना सजवून पुढे घोडे, नंतर 'करोल्यो' व इतर सर्व मेळ गावाकडे परततो. वाटेत 'घोडकाकडे' या जागेवर उभे राहून 'करोल्यो' पाया पडतो. मंदिराजवळ येऊन पाच प्रदक्षिणा घालून, समोरच्या मोकळ्या जागी पेटवलेल्या जाळाभोवती 'करोल्यो', घोडे आणि मेळातील इतर माणसे नाचत-गात फेर धरतात. या प्रसंगी 'फुला फातर'कडे गळ्यात घातलेल्या माळांना त्या ज्वाळेत समर्पित केले जाते. इथे 'सती' उत्सवाची प्रतीकात्मक सांगता केली जाते.

यानंतरची वेळ असते ती 'रणमाले' या लोकनाट्य सादरीकरणाची! पण आता ती जागा दशावतारी नाटकांनी भरून काढली जाते. आणि शेवटी पहाटेला सर्वांसाठी खास आकर्षण असते ते 'वाघखेळाचे'! खरं तर 'वाघखेळ' हा 'रणमाले'चाच एक अविभाज्य भाग आहे; कालांतराने त्याची जागा नाटकाने घेतली. असे असतानाही वाघदेवाविषयीची कृतज्ञता मात्र लोकमानसाने कायमस्वरूपी टिकवून ठेवली आहे. 'वाघखेळाचे' दर्शन आणि त्यातील गायन यामधून ते प्रकर्षाने जाणवते.

जाणकार सांगतात की, कोणे एकेकाळी या जंगल प्रदेशात राहणारी माणसे शेती करायला घाबरायची. कोठेही बाहेर गेल्यावर वाघाचे दर्शन व्हायचे. सर्वांनी मिळून मग त्याच्यासाठी सांगणे (नवस/प्रार्थना) केले की, "तुझी आठवण आम्ही दरवर्षी करू." या खेळातून वाघाविषयीची भक्तिभावना प्रकट केली जाते. वाघाचा मुखवटा घातलेली एक व्यक्ती आणि पातीला उभे असलेल्या कलाकारांचे गायन... त्यांच्या सोबतीने शेती करायला निघालेला शेतकरी. शेती करायची असते, पण वाघ आडवतो. स्वसंरक्षण करण्यासाठी शेतकऱ्याच्या हातात पाळकोयता असतो. कोणे एकेकाळी वाघाला मारण्याचा प्रमाद शेतकऱ्याकडून घडलाही असेल, म्हणून त्याला शांत करून, त्याच्या कलाने घेत शेती करायची, हा त्यामागचा उद्देश. निसर्ग, पशू-पक्षी, प्राणी आमचे शत्रू नसून मित्र आहेत; निसर्ग जगवतो, त्यांच्याविषयी नेहमीच कृतज्ञ भाव बाळगायचा, ही भावना या उत्सवातून अभिव्यक्त होते.

महाशिवरात्रीपासून उत्सवाची सुरुवात होते. मुरंगे, बोळकरणे, बोडटर, धारगे, सुर्ला, तांबडी, म्हातकण, कारेमळ या गावांमध्ये 'मेळ' जाऊन नृत्य करतात. हे सलग चार दिवस चालूच असते. पाचव्या दिवशी आंब्याची होळी असते. सहावा पाडव्याचा दिवस 'चोर' उत्सवासाठी असतो. पाच लहान मुले 'चोर' होतात, त्यांच्या संपूर्ण अंगाला आंब्याची टाळे बांधली जातात. ही चोर झालेली मुले घराघरात फिरतात, तिथे त्यांची पूजा केली जाते. त्यानंतर मधला एक दिवस शांतता असते. पुढे फुला फातर, रणमाले, वाघखेळ, न्हावण, ओटी भरणे अशा क्रमाने समाप्तीच्या दिशेने या उत्सवाची वाटचाल सुरू होते. सण-उत्सवाच्या निमित्ताने शांत, संयत आणि निसर्गरम्य अशा या गावातील चैतन्य व आतिथ्यशीलता अनुभवूनच आम्ही परतीची वाट धरली.


- पौर्णिमा केरकर

(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक, 

कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)