निसर्गाचे नवल: कीटकभक्षी अर्थात मांसाहारी वनस्पती

निसर्गाच्या किमयेतून साकारलेल्या विस्मयकारक मांसाहारी वनस्पतींची ही रंजक सफर. अन्नासाठी केवळ सूर्यप्रकाशावर अवलंबून न राहता, कीटकांचे भक्षण करून स्वतःची गरज भागवणाऱ्या या वनस्पतींचे अनोखे जग.

Story: साद निसर्गाची |
20th December, 10:41 pm
निसर्गाचे नवल: कीटकभक्षी अर्थात मांसाहारी वनस्पती

सणासुदीला किंवा व्रतवैकल्याच्या वेळी आपण मांसाहार टाळून शाकाहारी अन्नाचे सेवन करतो. भाजी, कडधान्यांचा समावेश असलेले किंवा मांस-मासळीचा समावेश नसलेले अन्न म्हणजेच शाकाहारी अन्न. साध्या सोप्या भाषेत सांगायचे झाले तर शाकाहारी अन्न म्हणजे जे वनस्पतींशी निगडित असते. प्राणी म्हणजे मांसाहार आणि वनस्पती म्हणजे शाकाहार असा याचा साधा सरळ अर्थ होतो. पूर्णतः पंचमहाभूतांवर आधारित असलेली वनस्पती मातीमधील खनिजे, पाणी, वायू आणि सूर्यप्रकाशाचा वापर करून आपले अन्न तयार करते. जिथे वन्यप्राणी इतर प्राण्यांचे भक्षण करून आपला उदरनिर्वाह करतात, तिथे वनस्पती पंचतत्त्वांवर अवलंबून आपले अन्न तयार करतात. तुम्ही म्हणाल त्यात काय नवल, ही बाब तर सर्वश्रुत आहे. पण जर मी तुम्हाला वनस्पतीदेखील मांसाहारी असतात असे सांगितले तर? आश्चर्य वाटेल ना? पण हे खरे आहे. निसर्गातील प्रत्येक घटक विशिष्ट पद्धतीने कार्य करत असतो. बहुतेक वनस्पती शाकाहारी असाव्यात आणि त्यातील फक्त काहीच मांसाहारी, हेदेखील त्याचेच एक उदाहरण. यामुळे अन्नसाखळी संतुलित राहते.

कीटकभक्षी किंवा मांसाहारी वनस्पती म्हणजे अशा वनस्पती, ज्या कीटक किंवा लहान सजीवांना पकडून पचवतात आणि त्यातून मिळणाऱ्या पोषक द्रव्यांवर (विशेषतः नायट्रोजन) आपला उदरनिर्वाह करतात. अशा वनस्पतींच्या पानांमध्ये विशेष सापळे असतात. या सापळ्यांद्वारे या वनस्पती कीटकांना आकर्षित करतात, पकडतात व पचवतात. बहुतेकदा, या वनस्पती खनिजद्रव्ये कमी असलेल्या, ओल्या किंवा दलदलीच्या मातीत वाढतात. जमिनीत पोषक द्रव्ये कमी असल्याने त्यांच्या जगण्यासाठी अशी ठिकाणे अनुकूल असतात. आपल्या पश्चिम घाटात आढळणाऱ्या अशा काही वनस्पतींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

सगळ्यात जास्त ठिकाणी दिसणारी आणि सहज लक्ष वेधून घेणारी पश्चिम घाटातील अशीच एक मांसाहारी वनस्पती म्हणजे 'पिचर प्लांट' (Pitcher Plant). पिचर प्लांटची पाने पिचर (पिशवी/घडा) सारखी असतात. ही पिशवीसारखी खोल रचना असून त्यात पचनद्रव असतो. कीटक एकदा आत पडला की बाहेर येऊ शकत नाही. पिचर प्लांटवर असलेली झाकणासारखी रचना पावसाचे पाणी आत जाण्यापासून रोखते. हे झाकण कीटकांना आकर्षित करण्याचेही काम करते. पिचरची कडा इतकी घसरडी असते की कीटक त्यावर बसले की घसरून थेट आत पडतात. पिचरचा रंग, सुगंध व मधासारख्या द्रव्याने कीटक आकर्षित होतात. पिचरमधील पचनद्रव कीटकांना पचवतो, ज्यातून वनस्पतीला नायट्रोजन व खनिजे मिळतात. ही वनस्पती प्रामुख्याने दलदलीचे प्रदेश, ओले जंगल अशा ठिकाणी दिसून येते. पश्चिम घाटात याच्या काही प्रजाती 

आढळतात.

'सनड्यू-ड्रोसेरा' (Sundew-Drosera) ही पश्चिम घाटात आढळणारी अशीच आणखी एक मांसाहारी वनस्पती. या वनस्पतीच्या पानांवर चिकट द्रव असतो, ज्याला कीटक चिकटून अडकतात. सनड्यूची पाने लहान, गोल किंवा लांबट असतात. या पानांवर लालसर रंगाचे सूक्ष्म चिकट केस असतात. या केसांच्या टोकाला पारदर्शक थेंब असतो. हा थेंब दवाच्या थेंबासारखा दिसतो म्हणून याला 'सनड्यू' असे म्हणतात. हा द्रव कीटकांना आकर्षित करतो. कीटक या चमकदार थेंबाकडे आकर्षित होतो आणि तिथे चिकटतो. कीटकाच्या हालचालीमुळे पानांवर असलेले केस वाकतात व कीटकाला पूर्णपणे वेढतात. हा वेढा पडल्यामुळे कीटक अडकतो व पचतो. यामुळे वनस्पतीला नायट्रोजन व खनिजे मिळतात. सनड्यू-ड्रोसेरा प्रामुख्याने दलदल, ओले प्रदेश किंवा लेटराईट पठार (सडा) आणि पाण्याजवळील गवताळ क्षेत्रात आढळतात.

मूत्राशयासारखा आकार असलेली 'ब्लॅडरवॉर्ट' (Bladderwort) ही वनस्पती पाण्यात वाढणाऱ्या सूक्ष्म सजीवांना पकडते. तर चिकट पानांची 'बटरवॉर्ट' (Butterwort) ही वनस्पती लहान कीटकांना आपला आहार बनवते. मांसाहारी वनस्पती हा निसर्गातील जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. या वनस्पती कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवून अन्नसाखळी संतुलित राखण्यास मदत करतात.


- स्त्रिग्धरा नाईक

(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या 

प्राध्यापिका आहेत.)