वशीकरण सम्राट: 'गोल्ड मेडलिस्ट' बाबांचे अजब विश्व!

सार्वजनिक ठिकाणी दिसणाऱ्या 'बाबा बंगाली' आणि 'वशीकरण सम्राटांच्या' जाहिरातींमधील फोलपणा आणि त्यांच्या भूलथापांना बळी पडणाऱ्या मानसिकतेवर ओघवत्या शैलीत भाष्य करणारा लेख

Story: मिश्किली |
20th December, 10:37 pm
वशीकरण सम्राट:  'गोल्ड मेडलिस्ट' बाबांचे अजब विश्व!

भारतात बस स्टँड, रेल्वे स्थानकाच्या भिंती, बागेतील सिमेंटचे बाकडे, गल्लीबोळातले वाकडे झालेले वीजखांब, सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या दरवाजाची मागची बाजू असो किंवा बंद दुकानाच्या गंजलेल्या शटरवरची मोकळी जागा; या सर्व ठिकाणी आपला दबदबा गाजवणारे 'बाबा बंगाली', ‘मियाँ कमाल खान’ व इतर सर्व बाबा तुम्ही पाहिलेलेच असणार. त्यात एक पोस्टर हमखास दिसते. त्यावर कडक शब्दांत लिहिले असते, "ख़ुदा ने चाहा तो आपको ख़ून के आँसू नहीं रोने दूँगा, आपका प्यार टूटने नहीं दूँगा – मियाँ कमाल ख़ान." हे वाचून वाटते की, मियाँ कमाल खान साक्षात प्रेमाचे मसिहा आहेत आणि संपूर्ण जगाच्या प्रेमकहाण्यांना 'फेविक्विक' लावण्याचे कंत्राट त्यांनीच घेतले आहे.

पण खरी गंमत अशी की, ज्यांना रक्ताचे अश्रू ढाळण्यापासून वाचवण्याची खात्री हे बाबा देतात, त्यांचे स्वतःचे क्लिनिक रेल्वे स्टेशनच्या पलीकडे, एखाद्या पुलाच्या खाली अशा ठिकाणी असते, जे 'गुगल मॅप'सुद्धा शोधू शकत नाही. एखाद्या १० बाय १० च्या अंधाऱ्या खोलीत हे ‘अखिल भारतीय प्रेमाचे संकट निवारक’ बसलेले असतात. कधी कधी तर हे 'मोबाईल बाबा' असतात, ७-८ दिवस हॉटेलमध्ये रूम घेऊन किंवा इतर ठिकाणी कोपऱ्यात धंदा करतात आणि ९ व्या दिवशी लॉजचे भाडे न देता तिथून गायब होतात. आजकाल टेम्पो व रिक्शेतसुद्धा बाबांची फिरती दुकाने चालतात.

"वशीकरण सम्राट: बाबा बंगाली (गोल्ड मेडलिस्ट)!" हे वशीकरणात गोल्ड मेडल देणारे विद्यापीठ नक्की आहे तरी कोठे? या बाबांकडे सर्व समस्यांचे ‘तूफानी १० घंटों में समाधान’ देण्याचा दावा असतो. यातही मार्केटिंग बघा, 'माता-बहनों को छूट'! जणू काही वशीकरण हे एखाद्या मॉलमधल्या 'बाय वन गेट वन फ्री'च्या उन्हाळी सेलसारखे आहे!

जाहिरातीचा मजकूर तर असा असतो की, वाचून एखाद्याला वाटेल आपण नरकातून थेट स्वर्गाची 'कन्फर्म' तिकीट बुक करतोय. "सौतन दुश्मन से छुटकारा, नौकरी कारोबार में नुक़सान, बीमारी से दुखी, किसी ने कुछ किया कराया खिलाया हो, तुरंत काट. प्यार में चोट खाए प्रेमी-प्रेमिका फोन में संपर्क करें।" बाबांच्या या ‘काटण्याच्या’ पद्धती इतक्या अजब असतात की 'न्यूटन'सुद्धा स्वतःच्या डोक्यावर सफरचंद मारून घेईल. "भटको चाहे जिधर, काम होगा इधर" सिकंदर शाह, Gold Medalist, दादर वेस्ट. हा संवाद वाचला की हिंदीतील ती म्हण आठवते, 'सुबह का भूला शाम को घर आए तो उसे भूला नहीं कहते', पण इथे ‘सुबह का फँसा शाम को बाबा के पास लुटा' अशीच परिस्थिती जास्त असते.

काही बाबा तर अधिकच उदार व कॉर्पोरेट असतात. "फीस नहीं इनाम लूँगा" त्यासोबतच "मेरे किए हुए काम को काटने वाले को नगद ईनाम" असे आव्हानही देतात. म्हणजे बाबांनी एकदा का तुमचे 'वशीकरण' केले, की साक्षात यमराज आले तरी ते वशीकरण मोडू शकणार नाहीत. दोन-तीन बाबांच्या पोस्टर्समध्ये तर गळेकापू स्पर्धा दिसते. एक '१० तासांत समाधान' म्हणतो, तर दुसरा '१ तासात'. तिसरा गणितात कच्चा असावा किंवा त्याला वेळ पाळायचा कंटाळा असावा, तो थेट म्हणतो, ‘तुरंत समाधान पाएँ’! म्हणजे बाबा साक्षात 'इन्स्टंट मॅगी'पेक्षाही लवकर निकाल देण्याचा वायदा करतात.

पण या बिचाऱ्या पोस्टर्सच्या नशिबात मात्र वशीकरण नसते. अनेकदा ही पोस्टर्स अर्धी फाटलेली असतात. मध्येच एखादा आयुर्वेदिक डॉक्टर आपले 'गुप्तरोग तज्ज्ञाचे' पोस्टर चिकटवून जातो. मग त्या पोस्टरची जी भेळ होते, ती पाहून हसावे की रडावे हे कळत नाही. वाचन करताना असे विचित्र संयोग दिसतात, "फिल्मों में काम के लिए गुप्तरोगी  पुरानी हवेलीके पीछे मिलें!" कधी एखादा बांधकाम व्यावसायिक तिथे आपली जाहिरात लावतो, तेव्हा, "आजच मिळवा आपल्या स्वप्नांतील घर आणि सवतीपासून सुटका! नो स्टँप ड्युटी, नो रजिस्ट्रेशन, फक्त वशीकरण!" काही बाबा म्हणतात, "काळजी करू नका, तीन दिवसांचे वशीकरण यंत्र विनामूल्य मिळवा!" पण शेवटी कटकटी तर दूर जात नाहीतच, उलट बाबा दक्षिणा घेऊन गायब होतात. या सर्व पोस्टर्समध्ये शुद्धलेखनाच्या इतक्या चुका असतात की, त्या सांगायला मी एकदा फोन केलेला, तर बाबा 

फोनच घेईनात.

माणूस तिकडे ऑफिसमध्ये बॉसच्या वशीकरणात आधीच अडकलेला असतो. बॉस फक्त आपण एका वर्षात हे करू ते करू म्हणतात, पण प्रत्यक्षात फक्त आपली बॉसशाही मिरवण्यात वेळ घालवतात. माणसाला वाटते "शत्रूपेक्षा त्या बॉसचाच बंदोबस्त बाबांकडून करून घेऊ!" या बाबांकडे 'मनचाहा प्यार' मिळवून देण्याची शंभर टक्के खात्री असते. पण ज्या प्रेमी युगुलांना बाबांनी 'वशीकरण यंत्र' मोफत दिले असते, ती 'मनचाही' माणसे ३१ डिसेंबरच्या रात्री बाबांच्या मंत्रावर पाणी फेरून दुसऱ्याच कोणासोबत तरी डिस्कोमध्ये पार्टीत थिरकत असतात. बाबा मात्र आपल्या 'गोल्ड मेडल'च्या प्रमाणपत्रावरची धूळ झटकत, हॉटेलच्या रूममधील ८ दिवसांचा धंदा आटोपून दुसऱ्या शहरात वीजखांबाचा शोध घेत असतात.

थोडक्यात काय, तर जोपर्यंत माणसे कष्टापेक्षा बाबांच्या 'एका फोनवर बदलणाऱ्या नशिबावर' आणि 'वशीकरण यंत्रावर' विश्वास ठेवतील, तोपर्यंत बाबा बंगाली आणि सिकंदर शाह यांची ही 'गोल्ड मेडल्सची रेल्वे' सुसाट धावतच राहील! "Don’t miss golden chance, brighten your future" असे म्हणत बाबा स्वतःचे भविष्य तर आलिशान गाड्यांतून उज्ज्वल करतातच, पण बिचारा सामान्य माणूस मात्र त्यांच्या 'तूफानी १० तासांच्या समाधानाच्या' जाळ्यात फसला जातो, हेच खरे!


- आदित्य सिनाय भांगी,

पणजी