
मध्यपूर्वेतील आकाशात पुन्हा एकदा युद्धाचे ढग जमा होऊ लागले आहेत. निमित्त आहे ते इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (आयआरजीसी) सुरू केलेल्या अचानक मिसाईल ड्रीलचे. वरकरणी हा लष्करी सराव वाटत असला तरी, इस्रायलने याकडे केवळ सराव म्हणून पाहण्यास नकार दिला आहे. इस्रायलने अमेरिकेला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, हा केवळ सराव नसून, इस्रायलवर मोठ्या हल्ल्याची ही पूर्वतयारी असू शकते. या इशाऱ्यामुळे जागतिक राजकारणात आणि लष्करी वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
७ ऑक्टोबरची सावली आणि इस्रायलची अस्वस्थता या संपूर्ण प्रकरणाचा गाभा समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे मागे जावे लागेल. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने केलेला हल्ला इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेचे मोठे अपयश मानले जाते. त्या दिवशी गाफील राहण्याची जी किंमत इस्रायलला मोजावी लागली, ती जखम आजही ताजी आहे. त्यामुळेच, आता इस्रायल ‘दुधाने तोंड भाजल्यामुळे ताकही फुंकून पिणे’ या न्यायाने वागत आहे.
सद्यस्थितीत इराणमध्ये क्षेपणास्त्रे आणि लष्करी हालचाली वाढल्याचे सॅटेलाइट इमेजेस आणि गुप्तचर माहितीवरून स्पष्ट होत आहे. एकीकडे अमेरिकन गुप्तचर संस्थांचे म्हणणे आहे की, इराणने लगेच हल्ला करण्याचे संकेत मिळत नाहीत आणि हल्ल्याची शक्यता ५० टक्क्यांहून कमी आहे. मात्र, इस्रायली अधिकारी या टक्केवारीच्या खेळात पडू इच्छित नाहीत. त्यांच्या मते, शत्रूच्या हालचालींकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे. त्यामुळेच इस्रायल आता ‘इराणने हल्ला करण्याआधीच, आपणच त्यांच्यावर हल्ला करावा का?’ या ‘प्रिएम्पटिव्ह स्ट्राईक’च्या पर्यायावर गंभीरपणे विचार करत आहे.
युद्धाच्या इतिहासात अनेकदा प्रत्यक्ष कृतीपेक्षा ‘गैरसमज’ हे युद्धाचे मोठे कारण ठरले आहेत. सध्या इस्रायल आणि इराणमध्ये नेमकी हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणचा हा सराव केवळ आपली उरलीसुरली ताकद दाखवण्यासाठी असू शकतो, पण इस्रायलला तो आक्रमणाचा भाग वाटत आहे. दुसरीकडे, इस्रायलच्या आक्रमक पवित्र्यामुळे इराणला वाटू शकते की इस्रायल हल्ला करणार आहे, म्हणून स्वसंरक्षणासाठी इराण आधीच क्षेपणास्त्रे डागू शकतो. ‘कोण आधी बटण दाबणार?’ या भीतीपोटी दोन्ही देश एका अशा वळणावर उभे आहेत, जिथून माघार घेणे कठीण होऊ शकते.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख अॅडमिरल ब्रॅड कूपर यांनी तातडीने तेल अवीवला भेट दिली. इस्रायलचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल एयाल झमीर यांनी कूपर यांच्याशी केलेल्या चर्चेत स्पष्ट केले की, इराणच्या या हालचाली केवळ सराव नसून त्यामागे मोठा कट असू शकतो.
- सचिन दळवी