झेडपी निवडणूक : पहिल्याच प्रयत्नात आरजीपीचा धमाका

दोन उमेदवार विजयी, तर तीन उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
47 mins ago
झेडपी निवडणूक : पहिल्याच प्रयत्नात आरजीपीचा धमाका

पणजी : पहिल्यांदाच जिल्हा पंचायत निवडणूक लढवून 'रेव्हॉल्युशनरी गोअन्स पार्टी'ने (RGP) संपूर्ण गोव्यात आपला प्रभाव पाडला आहे. पहिल्याच प्रयत्नात दोन जिल्हा पंचायत जागा जिंकून आरजीपीने भाजप पुरस्कृत मतदारसंघांमध्येही चांगली कामगिरी केली आहे. तीन मतदारसंघांमध्ये आरजीपीचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर राहिले आहेत.

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत आरजीपीचे पहिले आणि एकमेव आमदार वीरेश बोरकर हे सांत आंद्रे मतदारसंघातून अवघ्या ७४ मतांच्या फरकाने निवडून आले होते. लोकसभा निवडणुकीत आरजीपीची पिछेहाट झाली असली तरी, या जिल्हा पंचायत निवडणुकीत आक्रमक राजकारण आणि विधानसभेत बोरकर यांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर पक्षाने जोरदार पुनरागमन केले आहे.

बोरकर यांचे दोन्ही उमेदवारी विजयी
पहिल्याच जिल्हा पंचायत निवडणुकीत वीरेश बोरकर यांच्या नेतृत्वाखाली आरजीपीने सांताक्रुझ मतदारसंघात काँग्रेसचा पराभव केला, जिथे त्यांच्या उमेदवार एस्पेरान्सा ब्रागांझा ४,५३३ मतांसह विजयी झाल्या. तर सेंट लॉरेन्स मतदारसंघात भाजपचा पराभव करून उमेदवार तृप्ती बकाल ५,८७० मतांनी निवडून आल्या. एकेकाळी अवघ्या ७४ मतांनी विजयी झालेल्या वीरेश बोरकर यांनी आपल्या मतदारसंघात अडीच हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळवून आपल्या दोन जिल्हा पंचायत उमेदवारांना निवडून आणले.

आरजीपी ठरला सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष
५० मतदारसंघांपैकी ३० मतदारसंघांमध्ये आरजीपीने आपले उमेदवार उभे केले होते. केवळ उत्तरेतील ८ आणि दक्षिणेतील १२ मतदारसंघ त्यांनी सोडले होते. या ३० मतदारसंघांत मिळून पक्षाला ५६,३३१ मते मिळाली. आता ९.१५ टक्के मतांच्या टक्केवारीसह आरजीपी राज्यातील तिसरा सर्वात मोठा पक्ष, तर सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष ठरला आहे.
आरजीपीचे तीन उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर
दरम्यान, शिवोली मतदारसंघात जयेंद्रनाथ पाडोलकर (३,२३९ मते), होंडा मतदारसंघात दीपक वरक (१,१०७ मते) आणि शिरोडा मतदारसंघात दिपींती शिरोडकर (२,८६८ मते) हे तिन्ही उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.

हेही वाचा