जिल्हा पंचायत निकालानंतर आज बी. एल. संतोष यांच्या उपस्थितीत होणार भाजप आमदारांची बैठक

पोटनिवडणुकीसह पुढील रणनितीवर होणार विचारविनीमय

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
जिल्हा पंचायत निकालानंतर आज बी. एल. संतोष यांच्या उपस्थितीत होणार भाजप आमदारांची बैठक

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीतील (Zilla Panchayat Election) यशाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या (BJP) आमदारांची बैठक आज सायंकाळी पणजीत (Panjim) होत आहे. भाजपचे राष्ट्रीय संघटन महामंत्री बी. एल. संतोष यांच्या उपस्थितीत ही बैठक होत असल्याने महत्वाचे निर्णय बैठकीत होणार आहेत.

जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर येत्या तीन महिन्यांत फोंडा (Ponda) मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. एका वर्षानंतर विधानसभा निवडणूक होणार असल्याने त्याबाबत आमदारांना मार्गदर्शन केले जाईल. जिल्हा पंचायत निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी ही बैठक होत असल्याने निकालावरही विचारविनीमय केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला २९ तर मगोला ३ जागा मिळाल्याने सत्ता राखण्यात पक्षाला यश आले आहे. विजय मिळविण्यात भाजप - मगो युतीला यश आले असले तरी हा विजय एकतर्फी किंवा दैदीप्यमान म्हणता येणार नाही. गत लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात भाजपचा पराभव झाला होता.

यानंतर आता जिल्हा पंचायत निवडणुकीत दक्षिणेत पक्षाला काठावरचे यश मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीतील सासष्टीतील पिछेहाट जिल्हा पंचायत निवडणुकीतही पक्षाला भरून काढता आलेली नाही. प्रदेश अध्यक्ष व चार आमदार असतानाही ख्रिस्ती समाजाचे प्राबल्य असलेल्या सासष्टीत पक्षाचा एकही आमदार निवडून आलेला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने  पक्षासाठी ही चिंतेची बाब आहे.

हेही वाचा