म्हादईच्या छोट्या जल प्रकल्पांच्या मान्यतेचा विषय अजेंड्यावर

पणजी : म्हादई पाणी (Mhadei Water) तंट्याच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या म्हादई प्रवाहची (Mhadei Prawah) उद्या बुधवारी नवी दिल्लीत (New Delhi) बैठक होणार आहे. म्हादई नदीवर छोट्या पाणी प्रकल्पांना मान्यता देण्याचा विषय अजेंड्यावर आहे. जलपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांकडून ही माहिती मिळाली.
प्रवाहची ही पाचवी बैठक आहे. म्हादई पात्रात शेती तशेच पिण्याच्या पाण्यासाठी लहान प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. गोवा सरकारने अनेक ठिकाणी पाणी प्रकल्पांचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रकल्पांना प्रवाहची मान्यता आवश्यक आहे. मान्यता देण्यासाठी काय पद्धत असावी, या विषयी प्रवाहाने तीनही राज्यांकडे सूचना मागितल्या आहेत. या सूचना तसेच मान्यतेचा विषय अजेंड्यावर आहे.
तसेच म्हादईच्या पात्रात किती प्रकल्प सुरू आहेत; त्यांच्या स्थितीवर चर्चा होणार आहे. म्हादई पात्रात विविध स्थानी खारटपणा तसेच इतर हायड्रोमीटीओरोलॉजीकल माहितीची देवाणघेवाण होणार आहे. प्रवाहने सर्व राज्यांकडून म्हादई पात्राविषयी माहिती मागितली आहे. त्या शिवाय प्रवाहसाठी कार्यालय स्थापन करणे, अधिकाऱ्यांची भरती या प्रशासकीय विषयांवरही चर्चा होणार आहे.