मनी लाॅन्ड्रिंगचा पीडितांच्या वकीलांकडून संशय

म्हापसा : बर्च बाय रोमिओ लेन क्लब (Birch By Romeo Lane Club) हा व्यापार परवान्याविना चालवला जात होता व त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केले जात होते. यामुळे गोवा पोलिसांव्यतरिक्त (Goa Police) ईडी (ED), सीबीआय (CBI) आणि आयकर खाते सारख्या केंद्रीय संस्थांनीही हस्तक्षेप करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी अॅड. विष्णू जोशी यांनी केली.
हडफडेतील बर्च बाय रोमिओ लेन कल्बमधील आग दुर्घटनेत दिल्लीतील भावना जोशी कुटूंबियांनी आपले चार सदस्य गमावले आहेत. या कुटूंबाची बाजू अॅड. जोशी मांडत असून, सोमवारी २२ रोजी न्यायालयातील सुनावणीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
गोवा पोलीस चांगले काम करत आहेत. कारण उत्पादन शुल्क परवानगी मिळवण्यासाठी सादर केलेले बनावट एनओसी सारखी नवीन तथ्ये पोलीस समोर आणत आहेत. शिवाय बर्च बाय रोमिओ लेनचा सहमालक अजय गुप्ता याने सादर केलेले दिल्लीतील पोलीस पडताळणी प्रमाणपत्र (पीसीसी) बनावट असल्याचे समोर आले आहे.
सध्या लुथरा बंधूंच्या ४२ कंपन्यांची चौकशी सुरू आहे. ज्या शेल कंपन्या (बनावट कंपन्या) असल्याचा संशय आहे. तसेच २७ क्लबवजा रेस्टॉरन्ट आस्थापने कार्यरत आहेत. ज्यामुळे त्यांच्या व्यवहाराबध्दल प्रश्न निर्माण झाले आहेत, असे अॅड. जोशी म्हणाले.
एक क्लब इतकी वर्षे व्यापार परवान्याविना कसा चालवला जात होता. इथे मोठा आर्थिक व्यवहार होत होता आणि हा पैसा कुठे जात होता, यावरून मनी लाँडरिंगचा संशय निर्माण होतो. आम्ही ईडी आणि इतर केंद्रीय संस्थांना या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी विनंती करणार आहोत, असे ते म्हणाले.
गुप्तावर करणार गुन्हा नोंद
संशयित आरोपी अजय गुप्ता याने वैयक्तिक फायद्यासाठी दिल्ली पोलिसांचे बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र वापरले आहे. असे चौकशीतून आढळून आले् आहे. त्यामुळे यासंदर्भात पोलीस लवकरच गुन्हा दाखल करणार आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.