आगामी विधानसभेसाठी सत्ताधारी, विरोधकांची ठरणार व्यूहरचना

मडगाव : जिल्हा पंचायत निवडणुकांच्या निकालासाठी निवडणूक आयोगाकडून तयारी करण्यात आली आहे. सासष्टीतील नऊ मतदारसंघांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर मोजणी कक्ष उभारण्यात आला आहे. या निकालावर आगामी काळातील सत्ताधारी व विरोधकांची समीकरणे ठरणार आहेत.
राज्यातील जि. पं. निवडणुकांकडे आगामी विधानसभा निवडणुकांची सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे. सोमवारी जि. पं.च्या निकालामुळे पुढील राजकारणातील समीकरणे बदलणार आहेत. काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्ष, रिव्हॉल्युशरी गोवन्स पक्षांकडून या निवडणुकांसाठी परिश्रम घेण्यात आले. जिल्हा पंचायत सदस्यांना आवश्यक अधिकार मिळालेले नसतानाही सर्वच पक्षांनी उमेदवार उभे करत यावेळी निवडणुका चुरशीच्या केल्या.
सासष्टी परिसरात काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण, आता यात भाजप व आपकडून जागा मिळवण्याचे प्रयत्न दिसून आले. बाणावलीतील जागा आपकडून यापूर्वी पोटनिवडणुकीसह दोनवेळा जिंकलेली आहे. त्यामुळे सासष्टीत जम बसवण्यासाठी आपकडून पक्षवाढीसह मतांची संख्या वाढवण्यावर भर दिला आहे. गोवा फॉरवर्डकडूनही प्रथमच जि.पं. निवडणुकांत सहभाग घेतला असून आमदार विजय सरदेसाई यांनी दक्षिण गोव्यात ३ जागा जिंकण्याचा दावा केला आहे. रिव्हॉल्युशनरी गोवन्सने युतीची बोलणी फिस्कटल्यानंतर उमेदवार उभे करून अस्तित्व दाखवले आहे. सासष्टीत यापूर्वी काँग्रेसचे उमेदवार डोळ झाकून निवडून येत असताना यावेळी मात्र, काँग्रेसला उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करावे लागले आहेत. त्यांनी या निवडणुकीत जास्त जागा जिंकल्यास आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेऊ शकते. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नजरा आता सोमवारी होणार्या मतमोजणीकडे लागल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात मतमोजणीची जय्यत तयारी
राय, नुवे, कोलवा, वेळ्ळी, बाणावली या मतदारसंघातील मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर कँटीनच्या नजीकच्या बाजूच्या कक्षात होणार आहे. तर दवर्ली, गिर्दोली, कुडतरी, नावेली या मतदारसंघातील मतमोजणी सीएफसी केंद्रानजीकच्या कक्षात होणार आहे. मोजणी कक्षाकडे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून गर्दी न होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.
सासष्टीच्या बालेकिल्ल्यात चुरस वाढली
* भाजपने दवर्ली, नावेली आणि गिर्दोलीमध्ये शर्थीचे प्रयत्न केले आहेत, तर 'आप'ने बाणावलीतील पकड मजबूत करण्यावर भर दिला आहे.
* गोवा फॉरवर्डने प्रथमच जिल्हा पंचायत निवडणुकीत नशीब आजमावले असून दक्षिण गोव्यातील किमान ३ जागा जिंकण्याचा दावा केला आहे.
* नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली असून अपक्ष उमेदवारांमुळे मतविभागणीची भीती व्यक्त होत आहे.
* युतीची बोलणी फिस्कटल्यानंतर आरजीपीनेही आपले उमेदवार रिंगणात उतरवून अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.