झेडपी निवडणूक : संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांत नाराजी

पणजी : शनिवार दि. २० डिसेंबर रोजी ५० जिल्हा पंचायत मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात आले. त्यासाठी पोलीस खात्यातील उपनिरीक्षक आणि साहाय्यक उपनिरीक्षक मिळून १०० जणांची सेक्टर अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांना वाहने न दिल्याने स्वखर्चाने स्वत:ची वाहने वापरावी लागली. याबद्दल सेक्टर अधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
सेक्टर अधिकाऱ्याचे काम प्रत्येक बूथवर जाऊन मतदानापूर्वी स्थितीबाबत माहिती नियंत्रण कक्षाला देणे अनिवार्य होते. तसेच मतदानादिवशी मतदान केंद्रावर जाऊन स्थितीबाबत तसेच काही कायदा व सुव्यवस्थेचा संदर्भात माहिती देणे आवश्यक होते. याशिवाय पोलीस नियंत्रण कक्ष संबंधित सेक्टर अधिकाऱ्याकडून दर एक- दोन तासात माहिती घेत होते. त्यासाठी या अधिकाऱ्यांना प्रत्येक बूथवर जाण्याची आवश्यकता होती. त्यासाठी या अधिकाऱ्यांना पोलीस खात्याकडून किंवा निवडणूक आयोगाकडून कोणतीच प्रकारची वाहन व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांना आपल्या किंवा सहकाऱ्याच्या दुचाकीने आणि स्वयंखर्चाने जाणे भाग पाडण्यात आले. या संदर्भात संबंधितांनी वरिष्ठांकडे प्रश्न उपस्थित केला असता, त्यांना उडवाउडवी उत्तरे देण्यात आली. प्रत्येक सेक्टर अधिकाऱ्याला किमान दहा बूथ देण्यात आले होते. त्यामुळे सेक्टर अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच यात मोठ्या प्रमाणात गौडबंगाल असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.