
जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहराच्या पश्चिम भागात झालेल्या एका भीषण गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या अंधाधुंध गोळीबारात ३ निष्पाप मुलांसह ११ जणांचा मृत्यू झाला असून, अन्य २० जण गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रक्तरंजित घटना एका वाईन शॉपजवळ घडली. हा परिसर सोन्याच्या खाणींच्या जवळ असून तिथे अवैधपणे मद्यविक्री केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. हल्लेखोरांनी रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करून गोळीबार केला. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यामागील नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. गौतेंग प्रांताच्या पोलीस प्रवक्त्या ब्रिगेडियर ब्रेंडा मुरीडिली यांनी सांगितले की, हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

गौतेंगचे कार्यवाहक पोलीस आयुक्त फ्रेड केकाना यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय आणि प्रांतीय गुन्हे शोध पथकांना पाचारण केले आहे. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेतील वाढत्या गुन्हेगारीचा हा विदारक चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, ६ डिसेंबर रोजीही प्रिटोरिया जवळील एका हॉस्टेलवर झालेल्या हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू झाला होता.

संयुक्त राष्ट्रांच्या अंमली पदार्थ आणि गुन्हेविषयक कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, दक्षिण आफ्रिका हा जगातील सर्वाधिक हत्या दर असलेल्या देशांपैकी एक आहे. येथे प्रति एक लाख लोकसंख्येमागे हत्येचे प्रमाण ४५ इतके प्रचंड आहे. चालू वर्षात एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान पोलिसांनी अवैध मद्यविक्री केंद्रांविरुद्ध मोठी मोहीम राबवून १२ हजार ठिकाणे बंद केली आहेत, तरीही अशा स्वरूपाच्या हिंसक घटना थांबताना दिसत नाहीत. या ताज्या गोळीबारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.