दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपचा झेंडा : उत्तरेत वर्चस्व, दक्षिणेत बहुमतासाठी कसरत, विरोधकांची बिघाडी भाजपला फायद्याची

पणजी : गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत विरोधकांची मते विभागली गेल्याचा थेट फायदा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला (भाजप) झाला आहे. काही जागांवर अत्यल्प मतांच्या फरकाने भाजप उमेदवारांनी विजय मिळवल्याने दोन्ही जिल्हा पंचायतींवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकला आहे. उत्तर गोव्यात २५ पैकी १८ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे, तर दक्षिण गोव्यात ११ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून मगो आणि अपक्षांच्या पाठिंब्यावर तिथेही भाजप सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झाले आहे.
शनिवारी (दि. २०) झालेल्या मतदानानंतर सोमवारी (दि. २२) मतमोजणी पार पडली. उत्तर गोव्यात सुरुवातीपासूनच भाजपचे वर्चस्व दिसून आले. मात्र, दक्षिण गोव्यात काँग्रेस, आम आदमी पक्ष (आप) आणि अपक्षांनी भाजपला मोठी झुंज दिली. विशेषतः सासष्टी तालुक्यात काँग्रेसने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
२०२० च्या तुलनेत भाजपची पिछेहाट, काँग्रेसची झेप
२०२० च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपच्या जागा ३३ वरून २९ वर आल्या आहेत, त्यामुळे भाजपची कामगिरी काहीशी खालावली आहे. याउलट काँग्रेसने ४ वरून १० जागांपर्यंत मजल मारत आपली कामगिरी सुधारली आहे. उत्तर गोव्यात काँग्रेसने हळदोणा आणि शिरसई मतदारसंघात विजय मिळवला, मात्र सांताक्रुझ या आपल्या पारंपरिक बालेकिल्ल्यात त्यांना ‘आरजी’कडून पराभव स्वीकारावा लागला.
मतविभाजनाचा भाजपला मोठा लाभ
यावेळी भाजप आणि मगो यांच्यात युती झाली होती. भाजपने ४० तर मगोने ३ मतदारसंघांत आपले उमेदवार उभे केले होते. उर्वरित ७ मतदारसंघांमध्ये भाजपने अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला होता. आम आदमी पक्षाने आधीच आपल्या उमेदवारांची घोषणा करून विरोधकांच्या आघाडीतून काढता पाय घेतला होता.
युती फिस्कटल्यामुळे काँग्रेसला मोठा फटका
काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) या पक्षांमध्ये युतीची चर्चा शेवटपर्यंत सुरू होती. मात्र, काँग्रेस आणि आरजी यांची युती फिस्कटली. काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्यात मात्र युती झाली. यामुळे भाजप, काँग्रेस, आरजी आणि आप अशी बहुरंगी लढत सर्वच मतदारसंघांत पाहायला मिळाली. भाजपविरोधी मतांचे विभाजन झाल्याचा थेट फायदा भाजपच्या उमेदवारांना झाला. 'आप'ला केवळ एकाच मतदारसंघात विजय मिळाला, मात्र त्यांच्या उमेदवारांमुळे काँग्रेसला मोठा फटका बसला.
पक्षीय बलाबल (एकूण ५० जागा)
भाजप : २९
मगो : ३
काँग्रेस : १०
आरजी : २
गोवा फॉरवर्ड : १
आप : १
अपक्ष : ४
भाजपने मिळवली सर्वाधिक ४१ टक्के मते
जिल्हा पंचायत निवडणुकीत ६ लाख १५ हजार ५८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये भाजपने सर्वाधिक २ लाख ५० हजार १४९ मते मिळवली आहेत. एकूण ४०.६३ टक्के मिळवत भाजप आघाडीवर राहिला. यानंतर काँग्रेसने १ लाख १६ हजार ५६५ (१८.९३ टक्के), तर आरजीपीने ५६ हजार ३३१ (९.१५ टक्के) मते मिळवली आहेत. आपला एकूण ३२ हजार ९९५ मते (५.३५ टक्के) मिळवण्यात यश आले. गोवा फॉरवर्ड पक्षाने एकूण ३० हजार ५७३ मते (४.९६ टक्के) मिळवली. तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने २३ हजार ६४६ मते (३.८४ टक्के) मिळवली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने १३५९ मते (०.२२ टक्के) मते मिळवली. उर्वरित १ लाख ३ हजार ९६३ मते (१६.८८ टक्के) अपक्षांनी मिळवली आहेत.
मगो, आपच्या जागांमध्ये वाढ नाही
२०२० च्या निवडणुकीत मगो पक्षाला ३, तर आम आदमी पक्षाला १ जागा मिळाली होती. यावेळी देखील मगोला ३, तर आपला १ जागा मिळाली आहे.
गोवा फॉरवर्ड, आरजीने उघडले खाते
जिल्हा पंचायतीत गोवा फॉरवर्ड तसेच आरजीचे उमेदवार पहिल्यांदाच निवडून आले आहेत. आरजीने २ जागांवर विजय मिळवून जिल्हा पंचायतीत प्रवेश केला. तर गोवा फॉरवर्डने १ जागेवर विजय मिळवून आपले अस्तित्व सिद्ध केले.
अपक्षांचा आकडा घटला
२०२० च्या जिल्हा पंचायत निवडणुकीत ७ अपक्षांना विजय मिळाला होता. यावेळी उत्तर गोव्यात २ आणि दक्षिण गोव्यात २ मिळून एकूण ४ अपक्षांना विजय मिळाला आहे.
केरी मतदारसंघात भाजपचे नीलेश परवार यांनी १३,२६४ मते मिळवून मोठा विजय नोंदवला. तर होंडाचे भाजप उमेदवार नामदेव च्यारी यांनी ११,७५१ मते मिळाली. पाळीचे भाजपचे सुंदर नाईक यांना १०,९१४ मते मिळाली. तर नगरगाव मतदारसंघात भाजपाचे प्रेमनाथ दळवी ११,३६९ मतांनी विजयी झाले. हे चारही उमेदवार राज्यातील सर्वाधिक मताधिक्य घेणाऱ्या उमेदवारांपैकी एक ठरले आहेत.