दुपारपर्यंत चित्र स्पष्ट : ७०.८१ टक्के विक्रमी मतदानामुळे निकालाची उत्सुकता

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत ७०.८१ टक्के इतके विक्रमी मतदान झाल्याने निकालाबाबत राज्यभरात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता १५ ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल. बार्देश, सासष्टी आणि फोंडा तालुक्यांत प्रत्येकी दोन ठिकाणी मतमोजणीची व्यवस्था केली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली.
सुरक्षा आणि यंत्रणा सज्ज
मतमोजणीसाठी ६०० कर्मचारी आणि १,२०० पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात केला आहे. प्रत्येक केंद्रावर १० ते १२ टेबलांवर मतमोजणी होईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडीसाठी हालचाली सुरू होतील. उत्तर व दक्षिण गोवा मिळून ५० मतदारसंघांत २२६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजप, मगो, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप, आरजी आणि राष्ट्रवादी या पक्षांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
महिला मतदारांचा उत्साह निर्णायक
सामान्यतः जिल्हा पंचायत निवडणुकीत ६० ते ६५ टक्के मतदान होते. मात्र यंदा टक्केवारी वाढल्याने मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. विशेष म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांचे मतदान प्रमाण अधिक असल्याचे चित्र आहे. उत्तर व दक्षिण गोव्यातही महिलांची संख्या जास्त राहिल्याने त्यांचा कौल या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे.
मतमोजणी केंद्र आणि संबंधित मतदारसंघ
| तालुका / केंद्र | मतमोजणी ठिकाण | मतदारसंघ |
|---|---|---|
| पेडणे | मल्टीपर्पज क्रीडा स्टेडियम, पेडणे | हरमल, मोरजी, धारगळ, तोरसे |
| बार्देश (१) | क्रीडा संकुल (बॉक्सिंग हॉल), पेडे | शिवोली, कोलवाळ, हळदोणा, शिरसई, हणजूण |
| बार्देश (२) | क्रीडा संकुल (बॅडमिंटन हॉल), पेडे | कळंगुट, सुकूर, रेईश मागूश, पेन्ह द फ्रान्स |
| तिसवाडी | डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम, ताळगाव | सांताक्रूझ, ताळगाव, चिंबल, खोर्ली, सेंट लॉरेन्स |
| डिचोली | नारायण झांट्ये सभागृह, सर्वण | लांटबार्से, कारापूर-सर्वण, मये, पाळी |
| सत्तरी | कदंब बस स्थानक सभागृह, वाळपई | होंडा, केरी, नगरगाव |
| फोंडा (१) | सरकारी आयटीआय सभागृह, फर्मागुढी | उसगांव-गांजे, बेतकी-खांडोळा, कुर्टी, वेळींग-प्रियोळ |
| फोंडा (२) | वर्कशॉप (आयटीआय), फर्मागुढी | कवळे, बोरी, शिरोडा |
| सासष्टी (१) | माथानी साल्ढाणा संकुल (उत्तर), मडगाव | राय, नुवे, कोलवा, वेळ्ळी, बाणावली |
| सासष्टी (२) | माथानी साल्ढाणा संकुल (दक्षिण), मडगाव | दवर्ली, गिरदोली, कुडतरी, नावेली |
| मुरगाव | एमपीटी सभागृह, वास्को | सांकवाळ, कुठ्ठाळी |
| धारबांदोडा | सरकारी कार्यालय संकुल, तामसोडो | सावर्डे, धारबांदोडा |
| सांगे | सरकारी क्रीडा संकुल, सांगे | रिवण |
| केपे | सरकारी क्रीडा संकुल, बोरीमळ | शेल्डे, बार्से |
| काणकोण | सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय | खोला, पैंगीण |