४२ उमेदवारांचे भवितव्य ठरणार : १ लाख ५९ हजार मतदार बजावणार हक्क

मडगाव : सासष्टी तालुक्यातील नऊ जिल्हा पंचायत मतदारसंघांसाठी शनिवार, दि. २० रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत ४२ उमेदवारांचे भवितव्य मतदानपेटीत बंद होईल. सासष्टीत ८३,९८४ महिला आणि ७५,१६८ पुरुष असे मिळून एकूण १,५९,१५३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
राय आणि नुवेमध्ये चुरस
रायमध्ये काँग्रेसने ही जागा युतीतील गोवा फॉरवर्डला दिल्याने मतदार काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. येथे एकूण सहा उमेदवार रिंगणात आहेत. नुवे मतदारसंघात ‘आप’ने शेवटच्या क्षणी काँग्रेस इच्छुक लुईस बार्रेटो यांना तिकीट दिले आहे, तर माजी आमदार बाबाशान यांनीही लुईस यांना पाठिंबा दिल्याने येथे मोठी चुरस निर्माण झाली आहे.
तिकीट नाकारल्याने बंडखोरी
कोलवा आणि बाणावली मतदारसंघात काँग्रेसने तिकीट नाकारल्याने बंडखोरी झाली आहे. कोलवामध्ये चारवेळा विजयी झालेल्या नेली रॉड्रिग्ज यांनी, तर बाणावलीमध्ये माजी सदस्य मारिया रिबेलो यांनी काँग्रेसने तिकीट नाकारल्याने अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. यामुळे या दोन्ही ठिकाणी काँग्रेससमोर आव्हान उभे राहिले आहे.
वेळ्ळी, दवर्लीत बहुरंगी सामने
वेळ्ळी मतदारसंघात सहा उमेदवारांत लढत होईल, तर दवर्लीत चार उमेदवार रिंगणात आहेत. दवर्लीमध्ये भाजपने माजी सदस्य परेश नाईक यांच्याऐवजी सत्यविजय नाईक या नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. गिर्दोलीत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये आणलेले संजय वेळीप रिंगणात आहेत.
राजकीय समीकरणे
सासष्टीत भाजपने ३, राष्ट्रवादी काँग्रेसने ३, तर आम आदमी पक्ष व काँग्रेस यांनी नऊपैकी ८ जागांवर उमेदवार दिले आहेत. काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युती असल्याने एक जागा फॉरवर्डसाठी सोडली आहे. आरजीने ४ ठिकाणी तर १५ अपक्ष उमेदवार नशीब आजमावत आहेत.
मतदारसंघनिहाय मतदार संख्या
बाणावली (२०,११९), दवर्ली (१९,९१८), कुडतरी (१९,८००), वेळ्ळी (१७,५४९), कोलवा (१७,५३१), राय (१६,९२५), गिर्दोली (१६,३६०), नावेली (१५,६७८) आणि नुवे (१५,२७३). प्रशासनाने शुक्रवारी सर्व साहित्यासह कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर रवाना केले आहे.