जबाबदारी कर्मचाऱ्यांवर ढकलण्याचा प्रयत्न

म्हापसा : ‘बर्च बाय रोमिओ लेन’चे मालक सौरभ लुथरा व गौरव लुथरा हे पोलीस चौकशीला सहकार्य करीत नाहीत. क्लबची संपूर्ण जबाबदारी ही व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली होती, असे उत्तर ते प्रत्येक प्रश्नावर देत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या तपासात अडथळे येत आहेत.
थायलंडमधून आणून अटक
दिनांक ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री बर्च नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीत ५ पर्यटक आणि २० कर्मचारी मिळून २५ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर थायलंडमध्ये पलायन केलेले संशयित आरोपी लुथरा बंधूंना गोव्यात आणून १७ डिसेंबर रोजी हणजूण पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आयोजकांवर फोडले खापर
क्लबमध्ये कार्यक्रमाच्या आयोजकांनी इलेक्ट्रॉनिक फटाके लावले होते, त्यामुळे ही आग लागली. या घटनेशी आमचा थेट संबंध नाही, अशी नकाराची रणनीती सौरभ आणि गौरव लुथरा यांनी अवलंबली आहे. क्लबचे संचालन पूर्णपणे मॅनेजमेंट बघत होते, असा दावा ते करत आहेत.
कोठडीतील वागणूक
गेले तीन दिवस संशयित इतर कैद्यांप्रमाणेच पोलीस कोठडीत वेळ घालवत आहेत. ते जमिनीवर झोपतात आणि त्यांना नियमित जेवण दिले जाते. पोलीस कोठडीत अधिकाऱ्यांकडून परवानग्या व इतर पैलूंवर कसून चौकशी सुरू असली तरी, आरोपींकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही.