पोलिसांच्या कसून चौकशीत सत्य उघड

म्हापसा : गृहपाठ पूर्ण न झाल्याने शिक्षक ओरडतील या भीतीपोटी एका १४ वर्षीय इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याने स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला. अभ्यासाच्या दडपणापासून सुटका मिळावी, या उद्देशातून आपण हे नाटक केल्याची कबुली मुलाने पोलिसांसमोर दिली. गुरुवारी १८ डिसेंबर रोजी हा प्रकार घडला.
काय होता मुलाचा बनाव?
सकाळी शाळेत जाताना वाटेत अचानक तीन बुरखाधारी व्यक्ती समोर आल्या. त्यांनी तोंडावर पावडर फुंकारली, तेव्हा आपण घाबरलो आणि जीव वाचवण्यासाठी तिथून पळालो. काही वेळाने भोवळ आल्याने रस्त्याशेजारी झोपलो. नंतर जाग आली तेव्हा एका दुकानातून आई-वडिलांशी संपर्क साधला, अशी थरारक पण खोटी कथा मुलाने पोलिसांना आणि पालकांना सांगितली होती.
मित्रांसोबत मॉलची सफर
पालकांनी मुलाला घेऊन पोलीस स्थानक गाठले असता, पोलिसांनी केलेल्या चौकशीत सत्य समोर आले. मुलाने शाळेचे असाइनमेंट पूर्ण केले नव्हते आणि ते जमा करण्याची शेवटची तारीख होती. शिक्षकांच्या ओरडण्याच्या भीतीने त्याने शाळेत न जाता हा कल्पनाविलास रचला. प्रत्यक्षात हा विद्यार्थी आपल्या तीन वर्गमित्रांसोबत बसने पर्वरीला गेला होता. तिथे एका मॉलमध्ये ते फिरले आणि दुपारच्या वेळी घरी परतले होते.