जीसीझेडएमए, बार्देश मामलेदारांची संयुक्त कारवाई

म्हापसा : हणजूण समुद्रकिनाऱ्यावरील वादग्रस्त ठरलेले ‘कर्लिस’ रेस्टॉरंट अखेर सील करण्यात आले आहे. गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (जीसीझेडएमए) बार्देश मामलेदार कार्यालयाच्या साहाय्याने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. आता रेस्टॉरंटचे शिल्लक बांधकाम पाडण्याची कार्यवाही जीसीझेडएमएकडून केली जाईल.
कायदेशीर कारवाई आणि सील
मिळालेल्या माहितीनुसार, हणजूणमधील सर्व्हे क्रमांक ४२/९, ४२/१०, ४२/११, ४५/१९ आणि ४५/४१ यामध्ये असलेल्या रेस्टॉरंटच्या सर्व व्यावसायिक जागा सील करण्याचे आदेश जीसीझेडएमएने जारी केले होते. त्यानुसार शुक्रवारी (दि. १९) दुपारी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बार्देश मामलेदार, जीसीझेडएमएचे अधिकारी, पंचायत तलाठी आणि हणजूण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. अधिकाऱ्यांनी रेस्टॉरंटच्या संबंधित वास्तूची ओळख पटवून पर्यावरण संरक्षण कायदा कलम ५ आणि नियम ४ अंतर्गत त्या सील केल्या.
डेब्रिज हटवण्याचे काम सुरू
रेस्टॉरंटच्या सर्व्हे क्रमांक ४२/१२ मधील बांधकाम पाडण्याचे काम अतिक्रमण पथकाने यापूर्वीच पूर्ण केले आहे. सध्या तेथील डेब्रिज हटवण्याचे काम सुरू आहे. वरील सर्व्हे क्रमांकांमधील उर्वरित बांधकाम सील करण्याची सूचना बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांना केली होती.
सोनाली फोगट प्रकरण आणि न्यायालयीन लढाई
ऑगस्ट २०२२ मध्ये कर्लिस क्लबमध्ये भाजप नेत्या सोनाली फोगट यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद केला. या प्रकरणानंतर राज्य सरकारने जीसीझेडएमएच्या आदेशानुसार कर्लिस क्लबवर अतिक्रमण हटाव मोहीम राबवली होती. त्यावेळी सर्व्हे क्रमांक ४२/१० मधील दुमजली रेस्टॉरंट पाडण्यात आले. या कारवाईला रेस्टॉरंटच्या सहमालक लिनेट न्यूनीस यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. हे प्रकरण पुन्हा हरित लवादाकडे वर्ग झाले होते. सुनावणीअंती हरित लवादाने पूर्वीचा आदेश कायम ठेवल्याने ही पुढील कारवाई झाली.