सांगे सर्वात तळाशी : साखळी दुसऱ्या तर मुरगाव तिसऱ्या स्थानी

पणजी : स्वच्छतेच्या बाबतीत पणजी महानगरपालिका देशातील आघाडीच्या शहरांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आली आहे. राज्यातील शहरी भागांपैकी फक्त पणजी शहरातच १०० टक्के घराघरांतून कचरा संकलन केले जाते आणि त्यावर १०० टक्के प्रक्रिया केली जाते, अशी माहिती शहरी विकास खात्याच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अहवालातून समोर आली.
पणजीला सेव्हन स्टार रेटिंग
स्वच्छ सर्वेक्षण अहवालात राज्यातील १४ पालिकांची क्रमवारी जाहीर करण्यात आली. यात पणजी पहिल्या, साखळी नगरपालिका दुसऱ्या, तर मुरगाव नगरपालिका तिसऱ्या क्रमांकावर राहिली. पणजी शहरात कचरा संकलन आणि प्रक्रिया १०० टक्के असून, घरातच ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्याचे प्रमाण ९० टक्के आहे. कचरा मुक्त शहर म्हणून पणजीला ‘७-स्टार रेटिंग’ मिळाले आहे.
कचरा प्रक्रियेत अनेक नगरपालिका नापास
अहवालानुसार कुडचडे-काकोडा, केपे, पेडणे, काणकोण आणि सांगे या नगरपालिकांमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे प्रमाण चक्क शून्य टक्के असल्याचे उघड झाले आहे. सांगे नगरपालिका या यादीत सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे. फोंडा नगरपालिकेत केवळ ३० टक्के संकलन होत असले तरी प्रक्रिया १०० टक्के होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
नगरपालिकांनुसार सविस्तर आकडेवारी
| नगरपालिका | संकलन | प्रक्रिया | वर्गीकरण (ओला/सुका) |
|---|---|---|---|
| साखळी | ७२% | ९८% | ६% |
| मुरगाव | ४०% | ५% | २३% |
| फोंडा | ३०% | १००% | ११% |
| मडगाव | ५५% | ३२% | ३३% |
| डिचोली | ३७% | ६६% | ३२% |
| वाळपई | ७०% | ४४% | ३३% |
| म्हापसा | ५५% | ६८% | ३४% |
| कुंकळ्ळी | ३६% | ४४% | ३६% |
| इतर पालिका* | - | ०% | - |