वास्तविक हडफडे आग दुर्घटनेवरून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सरकारला सळो की पळो करण्याची गरज होती, पण ते सोडून सरसकट सगळेच विरोधक एकमेकांवर आरोप करण्यात व टोलेबाजी करण्यात व्यग्र आहेत.

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी होऊ घातलेली विरोधी पक्षांची आघाडी अखेर बारगळली आहे. भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याची भाषा केली, पण त्यासाठी काय करावे, याची जाण कोणालाही नसावी, हे गोव्याचे दुर्दैव आहे. ही विरोधी आघाडी साकारावी म्हणजे पुढील वर्षी होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीतही ती कायम राहील असे अनेकांना वाटत होते, नव्हे बहुसंख्य गोमंतकीयांची ती इच्छा होती. म्हणून ही आघाडी कधी साकारते याकडे गोमंतकीय समाज डोळे लावू बसला होता. पण अहंकारात बुडालेल्या नेत्यांमुळे या आघाडीचा बोजवारा उडाला आणि जनतेची निराशा झाली. त्यामुळे आता जिल्हा पंचायत निवडणूक बहुरंगी झाली व त्यात भाजप एकीकडे, काँग्रेस व गोवा फॉरवर्ड यांची युती दुसरीकडे तसेच आप, आरजी अशी चौरंगी लढत आज होणार आहे. त्याशिवाय अपक्षांचाही मोठा भरणा आहे. विरोधी आघाडी नेमकी का होऊ शकली नाही, यापेक्षा विरोधी पक्ष त्या प्रकरणी एकमेकांवर जे आरोप करत आहेत त्यामुळे सध्या तरी लोकांची मोठी करमणूक होताना दिसत आहे. एकंदर घडामोडी पाहिल्या तर ज्यासाठी ही आघाडी होणार होती, त्या हेतूचाच विसर या लोकांना पडला हे उघड आहे. भाजपचा वारू रोखण्यासाठी ही मंडळी एकत्र येऊन आघाडी करणार होती व त्यासाठी त्यांनी दोन-तीन वेळा वेगवेगळ्या कार्यक्रमांत एकत्र येऊन व व्यासपीठांवर एकमेकांचे हात उंचावून ललकाऱ्याही दिल्या होत्या. पण नंतर त्याच नेत्यांनी नंतरच्या प्रचारात जाहीरपणे एकमेकांची उणे-दुणे काढली. त्यामुळे त्यांनी लोकांचा विश्वास गमावला व भाजपला एकप्रकारे पुढे चाल दिली व त्याचे भान मात्र त्यांना राहिले नाही.
गत लोकसभा निवडणुकीत भाजपविरुध्द सगळे विरोधी पक्ष एकत्र आले होते व त्यामुळे उत्तरेत नसला तरी दक्षिण गोव्यात काँग्रेस उमेदवार निवडून आला, असा समज या लोकांनी करून घेऊन हेच धोरण विधानसभा निवडणुकीत अवलंबिण्याचे त्यांनी ठरविले होते. पण त्यानंतर झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा झालेला दारुण पराभव त्याच्या आड आला. दिल्लीतील पराभव काँग्रेसमुळे झाला, असा समज करून घेऊन आपने काँग्रेसबरोबरचे संबंध तोडले व त्यातून गोव्यात उभय पक्षांच्या संबंधात बिघाड झाला व आपने एकला चलो धोरण अवलंबिले. त्याने जिल्हा पंचायत निवडणुकीत सर्व जागा लढविण्याचे जाहीर करून त्या दिशेने पावलेही उचलली व या आघाडीला पहिला अपशकून झाला. पण आप वगळता आरजीसह अन्य पक्ष एकत्र येतील, अशा घडामोडी होत होत्या. मोपा विमानतळावरील टॅक्सीवाल्यांच्या प्रकरणात योगायोगाने आरजी व फॉरवर्ड नेते एकत्र आले व या प्रयत्नांना दिशा मिळाली. त्यानंतर फातोर्डातील दिवाळी कार्यक्रम व नंतर युरी आलेमांव यांचा वाढदिवस या सोहळ्यात तिन्ही पक्षांचे नेते मुद्दाम वा योगायोगाने एकत्र आले व त्यांनी हात उंचावून दिलेले संकेत यामुळे विरोधी आघाडीची स्वप्ने पाहणाऱ्यांना दिलासा मिळाला. पण या पक्षांचे प्रमुख नेते कधीच आघाडीची पुढील दिशा वा पवित्रा ठरविण्यासाठी एका टेबलावर आले नाहीत, की त्यांनी निश्चित बोलणीही केली नाहीत व तेच नंतर अडचणीचे ठरले.
ही आघाडी साकारण्यासाठी एकत्र बसून चर्चा करणे, जागा वाटून घेणे या प्राथमिक गोष्टी होत्या, पण आघाडीचे सगळे सोपस्कार हवेतील बार ठरले. केवळ पत्रकार परिषदा घेऊन वा समाजमाध्यमांवर ट्वीट करून ते होत नसते, पण येथे प्रत्यक्षात तेच घडले. सगळेच एकमेकांना गृहित धरून पुढे जात राहिले. जागा वाटून घेण्यापूर्वीच काहींनी विशिष्ट मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर करून प्रचारही सुरू केला. केवळ एकाच नव्हे तर अनेक मतदारसंघांत ते घडले व तेथेच विघ्न आले. तशातच फॉरवर्डने माजी आमदार इजिदोर फर्नांडिस यांना पक्षात दिलेला प्रवेश व त्यासाठी केलेला शो याला आरजीने आक्षेप घेतला व त्यातून अविश्वासाचे वातावरण तयार झाले व अशा प्रकारे आघाडी साकारण्यापूर्वीच बिघाडी तयार झाली व नंतर आरजीने त्यातून अंग काढून घेतले. त्यामुळे अखेर उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत संपल्यानंतर काँग्रेस व फॉरवर्डची मिळून आघाडी झाली. वास्तविक त्या आघाडीला तसा काहीच अर्थ नाही. मिकी पाशेको यांनी मागे म्हटल्याप्रमाणे फॉरवर्ड व आरजी यांनी काँग्रेसमध्ये विलीन होणे, हा चांगला पर्याय होता. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तो पर्याच चांगला आहे. आता आरजी नसला तरी फॉरवर्डला हा पर्याय विचारात घेण्यासारखा आहे. कारण गोव्याच्या राजकारणाची पुढील दिशा आता स्पष्ट झाली आहे. दोन्ही पक्षांची ध्येयधोरणेही एकमेकांना पूरक अशीच आहेत. दुसरीकडे भाजपला समर्थ पर्याय काँग्रेसच देऊ शकेल, पण त्यासाठी फॉरवर्डला ठाम निर्णय घ्यावा लागेल, एकाकी काँग्रेसला ते शक्य होणार नाही. त्या पक्षाबरोबर मतदार आहेत पण तसे कडवे नेते नाहीत. सरदेसाईंकडे तो कडवेपणा आहे पण त्यासाठी त्यांना काँग्रेसची साथ गरजेची आहे. त्या पक्षाची एकंदर अवस्था पाहता फॉरवर्डमध्ये राहून ती त्यांना मिळणार नाही. म्हणून सरदेसाई यांना काय तो निर्णय घ्यावा लागेल.
आघाडी बिघडल्यानंतर सर्व पक्षांनी एकमेकांवर जी टीका वा आरोप केले आहेत ते पाहता भविष्यातील त्यांची भूमिका स्पष्ट झालेली आहे. विशेषतः आरजीने सरदेसाई वा अमित पाटकर यांच्यावर केलेले आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यांना त्यांनी उत्तरेही दिलेली असून ती पलटवार स्वरुपाची आहेत. सर्वसामान्य मतदारांच्या मते या आरोपांना काहीच अर्थ नाही. वास्तविक गोव्यात अलीकडे हडफडेसारखी जी गंभीर स्वरुपाची दुर्घटना घडली, ती घेऊन राष्ट्रीय प्रसारमाध्यमे ती चघळत आहेत त्यामुळे गोव्याच्या प्रतिमेला तडा गेला आहे. वास्तविक त्यावरून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सरकारला सळो की पळो करण्याची गरज होती, पण ते सोडून सरसकट सगळेच विरोधक एकमेकांवर आरोप करण्यात व टोलेबाजी करण्यात व्यग्र आहेत. कोणीच हडफडे प्रकरणाला महत्व देत नाहीत. त्यामुळे विरोधकांबाबतच्या लोकांच्या विश्वासाला मात्र तडा गेला आहे. विधानसभा निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपलेली असताना विरोधकांकडून ही अपेक्षा नव्हती खरी.

- प्रमोद ल. प्रभुगावकर
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)