गांभीर्याने पाठपुरावा व्हायला हवा

लुथरा बंधूंना थायलंडमधून पकडून आणले म्हणून इथेच हे प्रकरण थांबत नाही. ज्या लोकांचा बळी गेला आहे, त्यांना न्याय मिळायला हवा. त्यासाठीच लुथरा बंधूंना कठोर शिक्षा होईपर्यंत या प्रकरणाचा शासनाकडून गांभीर्याने पाठपुरावा व्हायला हवा.

Story: संपादकीय |
17th December, 10:37 pm
गांभीर्याने पाठपुरावा व्हायला हवा

रोमिओ लेनच्या बर्च क्लबला आग लागून २५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर फरार झालेल्या क्लबच्या मालकांना, ताब्यात घेण्यात अखेर गोवा पोलिसांना यश मिळाले आहे. विशेष म्हणजे, इथे क्लब जळत असतानाच आणि किती मृत्युमुखी पडले त्याची माहितीही बाहेर आलेली नसताना, गौरव आणि सौरभ लुथरा या दोन्ही बंधूंनी दिल्लीतून थायलंडला पळून जाण्याचा कट रचला. ज्या रात्री क्लबला आग लागली, त्याच रात्री १.१७ च्या दरम्यान त्यांनी विमानाची तिकिटे मिळवली. नेमके त्यावेळी क्लब पेटत होता. आत लोक अडकून पडले आहेत आणि ते वाचणार नाहीत, याची कल्पना लुथरा बंधूंना होती. कारण अनेक परवाने नसतानाही या क्लबचे बांधकामही बेकायदा होते. बेकायदा पद्धतीने व्यवसाय सुरू होता. त्यामुळे आपली आता धडगत उरली नाही, हे कळून चुकल्यामुळे दोघेही देश सोडून पळाले. थायलंडमधील फुकेटमध्ये जाऊन राहिले. त्यांच्याकडे अन्य कुठल्या देशाचा पासपोर्ट नव्हता. अन्यथा ते तिथेही पळून गेले असते.

गोव्याच्या इतिहासात आग लागून अशा प्रकारची दुर्घटना प्रथमच घडली आहे. पंचवीस लोकांचा जळून आणि गुदमरून मृत्यू झाल्यामुळे जगभरातील प्रसारमाध्यमांचे लक्ष गोव्याकडे गेले. दुर्घटना घडल्यापासून राष्ट्रीय माध्यमांमध्ये हीच बातमी सुरू आहे. लुथरा बंधूंना मात्र त्याचे फार सोयरसुतक नव्हते. ते आरामात देश सोडून पळाले. हा क्लब गोव्याच्या प्रशासनाच्या चुकांमुळेच सुरू होता. अनेकांनी परवाने देताना ताळतंत्र पाळले नाही. सरकारने लगेच सारवासारव करत दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि एका पंचायत सचिवाला निलंबित केले. या क्लबला मोकळे रान करून देण्यात अनेकांचा हात आहे, मात्र आतापर्यंत फक्त तिघांनाच घरी पाठवले आहे. थायलंडला पळून गेलेल्या लुथरा बंधूंना केंद्र सरकारच्या मदतीने दिल्लीत आणले गेले. त्यासाठी त्यांचे पासपोर्ट रद्द केले. सीबीआय, इंटरपोलची मदत घेण्यात आली. थायलंड पोलिसांनी दोघांही भावांना तिथे ताब्यात घेऊन भारतीय यंत्रणेकडे प्रत्यार्पण केले. गेले दहा दिवस सरकार लुथरा बंधूंच्या मागावर होते. अखेर गोवा पोलिसांनी त्यांना अटक करून आता पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळवली आहे. यापुढे सरकार कशा पद्धतीने युक्तिवाद करणार ते दिसणार आहे.

सरकारी यंत्रणांमुळेच लुथरा बंधू बेकायदा क्लब चालवू शकले, त्यामुळे ते दोघे अडचणीत येतीलच, पण सरकारी यंत्रणाही न्यायव्यवस्थेच्या कचाट्यातून सुटतील असे दिसत नाही. पोलीस फक्त लुथरा बंधूंवरच खटला चालवतात, की ज्या सरकारी खात्यांकडून हलगर्जीपणा झाला, त्या खात्यांविरुद्धही खटला चालवतात, ते पहावे लागेल. अटक फक्त क्लबशी संबंधित लोकांनाच झाली आहे. आधी एक सहमालक, काही व्यवस्थापक, काही कर्मचारी आणि लुथरा बंधू असे एकूण आठजण आतापर्यंत अटकेत आहेत. आगीला या क्लबचे व्यवस्थापन जबाबदार आहे. गैरव्यवस्थापनाचे हे बळी आहेत. या दुर्घटनेने गोव्याच्या पर्यटन क्षेत्राचे नुकसान होत आहे. कालपर्यंत टूलकिट वापरून गोव्याच्या पर्यटन क्षेत्रातील गैरव्यवस्थापनाबाबत लोक टीका करायचे. या दुर्घटनेने त्यांच्या हाती आयते कोलीत दिले. आता गोव्याची बदनामी जगभर होत आहे. प्रसारमाध्यमे गोव्यातील पर्यटन क्षेत्रातील बेकायदा व्यवसायावर बोलत आहेत. ही स्थिती सुधारण्यासाठी बेकायदा व्यवसायांवर सर्वात आधी नियंत्रण यायला हवे. लुथरा बंधूंना कठोर शिक्षा होईल, पण त्याचबरोबर त्यांचा हा बेकायदा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी ज्यांनी मदत केली, त्यांनाही अद्दल घडली पाहिजे. मग ते सरकारी अधिकारी असतील तर त्यांनाही शिक्षा व्हायला हवी. प्रशासनातील भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदून काढण्याचे धाडस कोणी करणार नाही, पण जी दुर्घटना घडली आहे त्याच्या मुळाशी जाण्याचे सौजन्य तरी दाखवायला हवे. या दुर्घटनेत २५ लोकांचा बळी गेला आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी हे प्रकरण सरकारने गांभीर्याने घ्यायला हवे. लुथरा बंधूंवर मनुष्यवधाचे खटले चालायला हवेत. या घटनेला जे लोक जबाबदार आहेत, त्या सर्वांना कठोर शिक्षा होईल याची हमी सरकारने द्यायला हवी. लुथरा बंधूंना थायलंडमधून पकडून आणले म्हणून इथेच हे प्रकरण थांबत नाही. ज्या लोकांचा बळी गेला आहे, त्यांना न्याय मिळायला हवा. त्यासाठीच लुथरा बंधूंना कठोर शिक्षा होईपर्यंत या प्रकरणाचा शासनाकडून गांभीर्याने पाठपुरावा व्हायला हवा.