एकेकाळी बार्देशमधील हडफडे कृषीप्रधान आणि पारंपरिक व्यवसायात गुंतलेल्या गोमंतकीयांचा गाव होता, परंतु कळंगुटपाठोपाठ हणजूण, वागातोरप्रमाणे सागरी पर्यटनाचे प्रस्थ हडफडेतील किनारपट्टी नियमन क्षेत्रात बेकायदेशीरपणे विस्तारत गेले.

पर्यटन क्षेत्रावर अधिकाधिक अवलंबून असलेल्या गोव्याच्या अस्तित्वालाच या व्यवसायाने इथल्या अर्थाजनाला चालना देताना त्याचे सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय प्रदूषणाचे सर्वतोपरी सीम्मोलंघन केलेले आहे आणि त्याचे असह्य चटके इथल्या स्थानिकांना पेडणे ते काणकोणपर्यंत जाणवत आहेत. भारत देशाच्या अन्य राज्यांच्या तुलनेत भौगोलिकदृष्ट्या एखाद्या बिंदूप्रमाणे आकार असलेला गोवा, मुक्तीनंतर पर्यटकांच्या गळ्यातील ताईत ठरलेला आहे. त्यामुळे कोकण काशीचे वैभव असो, अथवा पूर्वेकडच्या रोमचा लौकिक पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांपेक्षा, इथे मौजमस्ती, जुगार, वेश्या, ड्रग्ज या कारणांसाठी खास येणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.
रुपेरी वाळू आणि निळ्याशार सागरी पाण्याची भूमी लाभलेला गोवा, मुक्तीनंतर अल्पावधीतच देश-विदेशातील पर्यटकांसाठी स्वर्ग म्हणून इथे आलेल्या हिप्पींनी नावारूपास आणला. फेसाळ लाटांची निरंतर गाज ऐकत, रुपेरी वाळूत विमुक्तपणे पहुडलेले हिप्पी मनःशांतीसाठी गोव्याकडे वळले, परंतु कालांतराने ‘दम मारो दम’ म्हणणाऱ्या अमली पदार्थ खरेदी, विक्री, सेवन करणाऱ्यांसाठी गोवा आश्रयस्थान ठरले आणि त्यामुळे सागरी पर्यटनाबरोबर गुन्हेगारी जगतातील बड्या व्यक्तींसाठी गोवा आकर्षण बिंदू ठरला आणि त्यामुळे सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय प्रदूषणाने स्थानिक जनतेला बळी पडावे लागले आहे.
प्रारंभी पोर्तुगीज सत्तेखाली तीन शतकांहून अधिक काळ असणाऱ्या जुन्या काबिजादीतील तिसवाडी, बार्देश आणि सासष्टी हे तालुके सागरी पर्यटनामुळे, इथे येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीखातर हॉटेल, रेस्टॉरन्ट, बार आणि कालांतराने पब तसेच नाईट क्लबच्या उभारणीसाठी अनुकूल ठरले. स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रतिनिधींनी आणि सत्तास्थानी असणाऱ्या राजकारण्यांनी सागर किनाऱ्याशी संलग्न प्रदेशात उपलब्ध जमिनी म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी मानली आणि त्यामुळे पर्यटकांना साधनसुविधा पुरवण्याच्या नावाखाली अंदाधुंदीच्या कारभाराला चालना देण्यातच समाधान मानले.
सागरी नियमन क्षेत्राची आणि पर्यावरणीय संवेदनशिलतेची पायमल्ली करून गोव्यातील सागराच्या किनाऱ्याशी संलग्न असणाऱ्या खाजन शेत जमीन, खारफुटी क्षेत्रात त्याचप्रमाणे मिठागरात आज हॉटेल्सची बेकायदेशीरपणे बांधकामे जेव्हा उभी राहत होती, त्या विरोधात न्यायालयीन याचिका दाखल करून सरकारी यंत्रणेला त्या विरोधात कारवाई करण्यास भाग पाडणाऱ्या मोजक्याच जागृत व्यक्ती आणि संस्था यांचे प्रमाण नगण्यच आहे. त्यामुळे राज्यातील किनारपट्टी क्षेत्राची परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे. गोव्याची भूमी प्राचीन काळापासून कोकण काशीच्या लौकिकास पात्र ठरली होती, याचा उदोउदो एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ड्रग्ज, कॅसिनो, डिस्को डान्सच नव्हे तर चक्क धांगडधिंगाण्यालाही आश्रय देण्यातच सत्ताधिशांनी समाधान मानले आणि त्यामुळे दारू आणि अमली पदार्थ सेवन करून सार्वजनिक रस्त्यांवर पादचाऱ्यांना यमसदनी पाठवणाऱ्यांची इथे चलती वाढत असताना, सार्वजनिक रस्ता वाहतूक सुरक्षेची त्रेधातिरपिट उडालेली दरदिवशी पहायला मिळत आहे.
त्याचप्रमाणे घरफोडी, खून, बलात्कार, अन्य प्राणघातक गुन्हे करणारे दिवसाढवळ्या राज्यात उजळ माथ्याने वावरत आहेत. त्यामुळेच तिसवाडी, बार्देश, सासष्टी महालांतील बेशिस्त आणि अराजक हॉटेल्स, रेस्टॉरन्ट, पब आणि डान्स क्लब यांचे लोण आज सामाजात झपाट्याने पेडणे, काणकोणसारख्या तालुक्यांत पसरलेले आहे. जुन्या काबिजादीतील बहुतांश युरोपस्थित गोमंतकीयांची जुनी घरे, बंगले भाडेपट्टीवर किंवा विकत घेऊन रेस्टॉरन्ट, पब आणि डान्स क्लब कार्यान्वित करून तेथे नशाबाज ध्वनिप्रदूषणाला निमंत्रण देऊन बेधुंद नाचण्यातच समाधान मानत आहेत. खाओ, पियो, मजा करो याच्यासाठी जणुकाही माहेरघर ठरलेला गोवा आज कॅसिनो, पब आणि डान्स क्लबसाठीही विदेशींबरोबर देशी पर्यटकांसाठी आकर्षण ठरलेला आहे.
त्यामुळे गोवा म्हणजे नशापुरीच म्हणून प्रकर्षाने समोर येत आहे आणि त्यामुळे नशाबाजीला इथे मुक्तद्वार आहे, अशीच भावना बळावत चालली आहे. सोनाली फोगट या राजकीय क्षेत्रातील महिलेचा गोव्यात झालेला संश्यास्पद मृत्यूची दुर्घटना आणि त्या संदर्भात कर्लीज बीच शॅकचे संबंधित एडविन नुनीस यांना झालेली अटक आणि तत्पूर्वी स्कार्लेट किलिंग या तरुणीच्या झालेल्या हत्येचे प्रकरण असो अथवा रेव्ह पार्ट्या, सनबर्नच्या आकर्षणापायी येणाऱ्या नशाबाजांच्या सराईत टोळ्या यामुळे गोव्याची नशापुरी, भोगभूमी म्हणूनच सर्वत्र चलती आहे. यापूर्वी दी संडे गार्डियन या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रात गोल्डन ट्रायंगलच्या ड्रग्ज सर्किटमध्ये गोवा-दिल्ली-इस्राइल हा महत्त्वपूर्ण अमली पदार्थांची ने-आण-विक्रीचा त्रिकोण म्हणून उल्लेख आल्याने, गोव्याची नशापुरी म्हणूनच ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेली आहे, ही आजची खरी शोकांतिका आहे.
डिसेंबर आणि जानेवारी या काळात नाताळ, इंग्रजी नववर्ष त्याचप्रमाणे सनबर्न आणि तत्सम पार्ट्यांमध्ये खास सहभागी होण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये विदेशींबरोबर देशी पर्यटकांची संख्या गेल्या काही वर्षांपासून गोव्यात सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर गोव्यातील बार्देश तालुक्यातील हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबमध्ये रविवारी ७ डिसेंबरच्या रात्री फायरगनच्या माध्यमातून केलेल्या आतषबाजीमुळे लागलेल्या भीषण अगीत २५ जणांचा बळी गेल्याने आणि क्लबचे मुख्य सूत्रधार लुथरा बंधू सहजपणे थायलंडच्या फुकेटमध्ये पळून जाण्यात यशस्वी झाल्याने, या प्रकरणाची काळी बाजू अधोरेखित झालेली आहे. सध्या लुथरा बंधूंवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याविरोधात मनुष्यवधाला कारणीभूत ठरल्याच्या गुन्ह्यासंदर्भात कारवाई करण्याचे सरकारने स्पष्ट केलेले आहे. एकेकाळी बार्देशमधील हडफडे कृषीप्रधान आणि पारंपरिक व्यवसायात गुंतलेल्या गोमंतकीयांचा गाव होता, परंतु कळंगुटपाठोपाठ हणजूण, वागातोरप्रमाणे सागरी पर्यटनाचे प्रस्थ हडफडेतील किनारपट्टी नियमन क्षेत्रात बेकायदेशीरपणे विस्तारत गेले. एकेकाळी जेथे शेती, मिठागरे, दलदलीच्या आणि पाणथळीच्या जागा अस्तित्वात होत्या, तेथेच पर्यटकांच्या विशेषतः नशाबाजांच्या सोयीखातर नाईट क्लब, पब उभे राहत गेले. त्यामुळे अग्निशमन आणि विद्युत सुरक्षितता याबरोबर आपत्ती व्यवस्थापनाच्या कायदेकानून यांनाच चक्क सुरुंग लावून नशा पर्यटनाला हडफडेप्रमाणे अन्य किनारपट्टी परिसरात वाढ झालेली पहायला मिळते. यापूर्वी लुथरा बंधूंचा वागातोर येथील रोमियो लेन शॅक जमीनदोस्त करण्याचा आदेश डिसेंबर २०२३ मध्ये उच्च न्यायालयाने दिलेला होता. परंतु अशा धनिकांच्या बेकायदेशीर कृत्यांकडे सरकारी यंत्रणेने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याने, पर्यावरणीय नियमावलीबरोबर सागरी नियमन क्षेत्राचे अस्तित्व दुर्बल झालेले आहे. आज सागरी पर्यटन जेथे जेथे चालू आहे, तेथे अमली पदार्थांची खरेदी, विक्री, सेवन यांच्याबरोबर मद्यपानाचा आस्वाद घेत धांगडधिंगाणा घालणाऱ्या नृत्यरजनीच्या जल्लोषावेळी गैरकृत्ये सुरूच आहेत.
हडफडे येथील अग्नी प्रलयाच्या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा प्रकर्षाने गोव्यातील सागरी पर्यटन क्षेत्राची सुरक्षाविरहित, बेकायदेशीर, अराजक आणि भेसूर बाजू समोर आलेली आहे. सामाजिक, सांस्कृतिक प्रदूषणाबरोबर गोव्यातील निसर्ग आणि पर्यावरणाच्या अस्तित्वाला कवडीमोल ठरवून, सागरी पर्यटनाच्या गोंडस नावाखाली, जो धांगडधिंगाणा बेशिस्तीने चालू आहे, तो या सागर आणि सह्याद्री यांच्या कुशीत वसलेल्या गोव्याच्या सुंदर भूमीच्या वर्तमान आणि भविष्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे गोव्याच्या निसर्ग आणि पर्यावरणाच्या अस्तित्वाची दखल घेऊन, राज्याच्या वर्तमान आणि भविष्याला जपणारी पिढी कार्यतत्पर होण्याची नितांत गरज आहे.

प्रा. राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५