
उत्तराखंडातील पौडी गढवालमध्ये बिबट्याच्या दहशतीमुळे तब्बल ५५ शाळा बंद कराव्या लागल्या. या परिस्थितीत शिक्षण चालू ठेवण्यासाठी या सर्व शाळांमध्ये ऑनलाइन अध्यापन हा एकमेव पर्याय उरला होता. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र या बिबट्याला आता ठार करण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
गेल्या काही काळापासून उत्तराखंडाच्या पर्वतीय भागांमध्ये बिबट्या आणि अस्वल यांची दहशत आहे. पौडीला लागून असलेल्या चवथ येथे अलीकडेच बिबट्याने एका तरुणाचा बळी घेतला. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर गावात गवत कापत असलेल्या एका महिलेला बिबट्याने अचानक झडप घालून गंभीर जखमी केले होते. हल्ल्यात महिलेच्या मानेला खोल जखमा झाल्या असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
बिबट्यांची वाढलेली संख्या पाहता शिक्षण विभाग सावध झाला आणि आसपासच्या ५५ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. एका व्यक्तीचा बळी घेतलेल्या या बिबट्याला अखेर शिकार पथकाने ठार केले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. त्याच्या दहशतीमुळे परिसरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. गढवालचे डीएफओ अभिमन्यू सिंह यांनी बिबट्याला ऑपरेशनदरम्यान ठार केल्याचे सांगितले. गढवाल मंडलात बिबट्या आणि अस्वलांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शालेय मुलांपासून ते लग्नसमारंभांपर्यंत प्रत्येक क्रियाकलाप धोक्यात आला आहे. पर्वतीय भागांत अनेक कार्यक्रम खुले मैदान किंवा शेतात होतात. परंतु वन्यप्राण्यांच्या भीतीने अशा कार्यक्रमांवरही सावली पडली आहे.
वन्यजीवांचे हल्ले सतत वाढत आहेत. त्यामुळे लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात लोक जमण्यासही घाबरत आहेत. पौडी, चमोली, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी या सर्व जिल्ह्यांमध्ये बिबट्या आणि अस्वलांच्या हालचाली वाढत असल्याने वनविभागाने त्यांची क्विक रिऍक्शन टीम सतत अलर्टवर ठेवली आहे.
संध्याकाळ होताच अनेक गावे ओस पडतात. लोक बाहेर न पडता घरातच थांबणे पसंत करतात. जंगलात जाण्याचे प्रमाणही कमी झाले असून त्यामुळे पशुधनाच्या चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. चमोली जिल्ह्यात मुलांनी अस्वलापासून बचाव करण्यासाठी अनोखा उपाय शोधला आहे. शाळेत येताना-जाता ते सतत शिट्ट्या वाजवत आणि आवाज करत जातात. काही काळापूर्वी चमोलीमध्ये अनेक ठिकाणी अस्वलांची सक्रियता वाढल्याने मुलांना शाळेत जाणे कठीण झाले होते.
अनेक ग्रामीण भागात मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी ४ ते ५ किलोमीटर लांब जंगलातून चालत जावे लागते. त्यामुळे पालक सतत चिंतेत असतात. काही ठिकाणी पालकांनी स्वतः मुलांचे गट बनवून त्यांना शाळेत सोडण्याची जबाबदारी घेतली आहे, तर काही ठिकाणी मुलांनीच गट बनवून एकत्र शाळा ये-जा करण्यास सुरुवात केली आहे.